हॅमिल्टन व मर्सिडीजचा दबदबा

किशोर पेटकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

फॉर्म्युला वन रेसिंगच्या २०१९ मधील मालिकेत पुन्हा एकदा मर्सिडीज संघाच्या ३४ वर्षीय लुईस हॅमिल्टन याचा दबदबा पाहायला मिळाला. सहाव्यांदा जगज्जेतेपद मिळविताना त्याने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचा किताब राखला. सहकारी ड्रायव्हर व्हॉल्टरी बोटास याचे आव्हान मागे सारत त्याने २१ शर्यतींच्या मालिकेत वरचष्मा राखला. जगज्जेतेपद मिळविताना हॅमिल्टनने ४१३ गुण नोंदविले, तर बोटास याने ३२६ गुणांची नोंद केली. गुणांतील तफावत पाहता, हॅमिल्टनचा मोसमातील भन्नाट वेग लक्षात येतो. मालिकेतील दोन शर्यती बाकी असताना अमेरिकेतील शर्यतीत दुसरा क्रमांक मिळून हॅमिल्टनने जगज्जेतेपद निश्चित केले. अबुधाबीतील शेवटची शर्यत जिंकून त्याने वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. २०१९ मधील पहिल्या आठ शर्यतीत मर्सिडीज संघाच्या ड्रायव्हरने अग्रक्रम राखला. व्हॉल्टरी बोटास याने मोसमाचा प्रारंभ विजयाने करताना ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जिंकली. त्यानंतर अझरबैझान ग्रांप्रीचा अपवाद वगळता लुईस हॅमिल्टन यानेच अग्रक्रम मिळविला. मर्सिडीज संघाच्या आधिपत्यास अखेर ऑस्ट्रियन ग्रांप्रीत छेद गेला. रेड बुल रेसिंगच्या मॅक्स व्हेर्स्तापन मोसमातील नववी शर्यत जिंकली. बेल्जियन, इटालियन आणि सिंगापूर ग्रांप्रीत फेरारीच्या ड्रायव्हरची सरशी झाली. त्यानंतर मर्सिडीज संघाने पुन्हा मुसंडी मारत एकूण ७३९ गुणांसह कन्स्ट्रक्सर्स विजेतेपद मिळविले. त्यांनी फेरारीस (५०४) खूपच मागे टाकले. फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये मर्सिडीजच्या गाड्या खूपच वेगाने धावताना दिसतात. सलग सहाव्या वर्षी हा संघ कन्स्ट्रकर्स गटात अव्वल ठरला. 

नव्या चेहऱ्याची चमक
मर्सिडीजचा ब्रिटिश ड्रायव्हर हॅमिल्टनने मोसमातील ११ शर्यतींत बाजी मारली. त्याचा सहकारी बोटास चार शर्यतींत विजेता ठरला. व्हेर्स्तापनने तीन शर्यती जिंकल्या. याव्यतिरिक्त फेरारीचा २२ वर्षीय नवा चेहरा चार्ल्स लेक्लर्क याचे ड्रायव्हिंग मोसमात उल्लेखनीय ठरले. त्याने संघातील अनुभवी ड्रायव्हर सेबॅस्तियन व्हेटेल याला मागे टाकले. २०१८ मध्ये फॉर्म्युला वन ट्रॅकवर पदार्पण केलेल्या या फ्रेंच ड्रायव्हरने २०१९ मधील मोसमात पहिली शर्यत जिंकण्याची किमया साधली. लेक्लर्क बेल्जियन ग्रांप्रीत विजेता ठरला. मोसमातील चार शर्यतीत त्याने वेगवान लॅप नोंदविलेली. अनुभवागणिक हा युवा ड्रायव्हर प्रगती साधण्याचे संकेत आहेत. भन्नाट ड्रायव्हिंगचा वेग कायम राखत त्याने इटालियन ग्रांप्रीतही बाजी मारली. सलग तिसऱ्या शर्यतीत सिंगापूर ग्रांप्रीत लेक्लर्कने पोल पोझिशन मिळविली, पण त्याचा सहकारी सेबॅस्तियन व्हेटेल विजेता, तर फ्रेंच ड्रायव्हर उपविजेता ठरला. लेक्लर्कने एकूण दहा शर्यतीत पोडियम फिनिश मिळविले. जागतिक मालिकेत लेक्लर्कला चौथा, तर व्हेटेलला पाचवा क्रमांक प्राप्त झाला. मॅक्लारेन-रेनॉ संघाचा २५ वर्षीय स्पॅनिश ड्रायव्हर कार्लोस सेंझ यानेही लक्षवेधी ड्रायव्हिंग केले. ब्राझील ग्रांप्रीत त्याने पोडियम फिनिश मिळविले. त्या शर्यतीत त्याला तिसरा क्रमांक मिळाला.

व्हेटेलसाठी मुसंडी अशक्य
फेरारीचा ३२ वर्षीय जर्मन ड्रायव्हर सेबॅस्तियन व्हेटेल हा माजी जगज्जेता. २०१० ते २०१३ अशी सलग चार वर्षे तो फॉर्म्युला वन रेसिंगमधील विश्वविजेता होता. त्यानंतर हॅमिल्टनच्या मर्सिडीज गाडीने जबरदस्त वेग पकडल्याने व्हेटेल पिछाडीवरच पडला. २०१९ च्या मोसमात त्याला सहकारी ड्रायव्हर लेक्लर्क वरचढ ठरला. चार जगज्जेतेपदात व्हेटेल आणि रेड बुल संघाचा अप्रतिम मेळ साधला होता, पण नंतर फेरारी संघात दाखल झाल्यानंतर व्हेटेलची गाडी प्रतिस्पर्ध्यांना शह देऊ शकली नाही. टायर, इंजिन आदी तांत्रिक बाबींमुळे मर्सिडीजची गाडी फेरारीच्या गाडीस खूपच सरस ठरल्यामुळे कौशल्यसंपन्न असूनही व्हेटेल अव्वल ठरू शकला नाही हे सत्य आहे. २०१७ आणि २०१८ मध्ये त्याला हॅमिल्टननंतर जागतिक मालिकेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१९ मध्ये तर त्याची चक्क पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. तो एकच शर्यत जिंकू शकला. यावरून व्हेटेलचा मंदावलेला वेग लक्षात येतो. 

संबंधित बातम्या