निर्धाव षटकांचा बादशहा

किशोर पेटकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

क्रीडांगण
 

पन्नास-साठच्या दशकातील भारताचे महान फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ४ एप्रिलला त्यांनी ८७ वा वाढदिवस साजरा केला असता, असो. फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या आजच्या युगातील क्रिकेटसाठी बापू नाडकर्णी यांची ओळख तशी पुसटशी, तरीही क्रिकेट इतिहासाच्या पानात डोकावताना त्यांची महानता ठळकपणे दिसते. त्यांच्या कंजुषी फिरकी गोलंदाजीविषयी भरभरून वाचायला मिळते. सलगपणे मेडन ओव्हर्स टाकणारा हा डावखुरा फिरकी गोलंदाज निर्धाव षटकांचा बादशहा या बिरुदानेच मिरवला गेला. खेळपट्टीच्या एका टोकाहून अथकपणे एकामागून एक अशी निर्धाव षटके टाकण्याची ख्याती बापू यांच्यापाशी होती. त्यांनी लौकिकास तडा जाऊ दिला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान इत्यादी देशांविरुद्ध खेळताना त्यांनी डावखुऱ्या फिरकीची जादू प्रदर्शित केली. प्रतिस्पर्धी फलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर मनमोकळेपणे फटकेबाजी करू शकत नव्हते. फटकेबाजीच्या नादात विकेट गमावण्याचा धोका होता. कारण, बापू फक्त एक टप्पा पकडून अचूकपणे गोलंदाजी टाकायचे. त्यात ते वाकबगार होते. त्यांचा टप्पा चुकत नसे. त्यामुळे फलंदाजासमोर बचावात्मक पवित्र्याशिवाय पर्याय राहत नसे. चेंडूची दिशा आणि टप्पा यांच्यावर त्यांचे जबरदस्त नियंत्रण होते. त्यांच्या भात्यातील आर्मर व लेगस्पिनने फलंदाजांची परीक्षा घेतल्याचे उल्लेख सापडतात.        

सडसडीत बांधा, भरपूर उंची हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू. उंचीची त्यांना अचूकटप्पी गोलंदाजी टाकण्यात मदत होत असे. चेंडूला ते फारशी उंची देत नसत. परिणामी फलंदाजांना फटका मारण्यास मुभा नसायची. असे सांगतात, की आपल्या गोलंदाजीवर धावा निघाल्या की बापू निराश व्हायचे. त्यामुळे फलंदाजाला बांधून ठेवत गोलंदाजी टाकण्यावर त्यांचा भर असायचा. आजच्या फटकेबाज क्रिकेटमध्ये त्यांची लगाम लावणारी फिरकी गोलंदाजी पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरले असते.

नाशिक ते मुंबई...
बापू यांचे मूळ नाव रमेशचंद्र. जन्म नाशिकमधील. बापू शालेय क्रिकेट नाशिकमध्ये, तर महाविद्यालयीन क्रिकेट पुण्यात खेळले. सुरुवातीस त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, पण नंतर नोकरीनिमित्त मुंबईत गेले आणि पक्के मुंबईकर झाले. रणजी क्रिकेटमध्ये ते मुंबई संघाचा आधारस्तंभ होते. मुंबईकडून खेळताना त्यांनी दोन द्विशतके केलेली आहेत. ते निव्वळ फिरकी गोलंदाज नव्हते, तर उपयुक्त डावखुरे फलंदाजही होते. १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत त्यांनी कमाल केली. पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ५२ धावा केल्या, त्यामुळे कर्णधार पतौडी खूश झाले आणि दुसऱ्या डावात त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले. बापू यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्यांचे हे कसोटीतील एकमेव शतक ठरले. अष्टपैलू ही बिरुदावली त्यांच्यासाठी सार्थ ठरते. ४१ कसोटी क्रिकेट सामन्यांत १,४१४ धावा, ८८ बळी ही त्यांची मैदानावरील कमाई. एक शतक, सात अर्धशतके नोंदवून त्यांनी भारताच्या फलंदाजीस सहाराही दिला. १९५५-५६ च्या मोसमात दिल्लीतील फिरोझशाह कोटला मैदानावर त्यांनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी पदार्पणाचा दबाव न घेता अर्धशतक केले. ६० च्या दशकात त्यांची कामगिरी बहरली, मात्र हे दशक संपत असताना त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवू लागला. १९६८ मध्ये न्य़ूझीलंड दौऱ्यात ऑकलंड कसोटीत खेळल्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, भारतीय संघाचे प्रशिक्षक, निवड समितीचे अध्यक्ष, समालोचक इत्यादी भूमिकाही त्यांनी जबाबदारीने पेलल्या.

विक्रमी स्पेल...
बापू नाडकर्णी हे नाव उच्चारताच १९६४ मधील त्यांच्या मद्रास कसोटीतील विक्रमी स्पेलची आठवण काढली जाते. केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील ते गोलंदाजीतील महान पृथक्करण आहे. इंग्लंडच्या नावाजलेल्या फलंदाजांची कोंडी करताना बापू यांनी डावखुऱ्या फिरकीवर ३२-२७-५-० असे विलक्षण गोलंदाजी पृथक्करण नोंदविले. त्यांपैकी सलग २१.५ षटके निर्धाव होती, याचाच अर्थ बापू यांनी ओळीने १३१ चेंडूंवर एकही धाव दिली नाही व विक्रम नोंदविला. गोलंदाजीत धावांची कंजुषी हे बापूंचे वैशिष्ट्य होते. शिवाय बळी घेण्यातही त्यांचा हातखंडा होता. निर्धाव षटके टाकणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. १९६०-६१ च्या मोसमात पाकिस्तानविरुद्ध कानपूर कसोटीतील डावात ३२-२४-२३-० व दिल्ली कसोटीतील डावात ३४-२४-२४-१ असे थक्क करणारे गोलंदाजी पृथक्करण राखले होते. १९६४-६५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मद्रासच्या कसोटीत त्यांनी अफलातून कामगिरी प्रदर्शित केली. पहिल्या डावात १८-६-३१-५, तर दुसऱ्या डावात ५४.४-२१-९१-६ अशी कामगिरी करत सामन्यात १० हून जास्त विकेट घेण्याचा पराक्रम साधला. १९६७ च्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांना डावलण्यात आले, पण जिद्दी बापूंनी जोरदार कमबॅक करताना न्यूझीलंड दौऱ्यात वेलिंग्टन कसोटीत डावात ४३ धावांत ६ गडी टिपले. त्यांची ही कारकिर्दीत डावातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. त्याच दौऱ्यानंतर त्यांनी कसोटी क्रिकेटला पूर्णविराम दिला.

संबंधित बातम्या