लिजंडची चटका लावणारी एक्झिट

किशोर पेटकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

क्रीडांगण
 

बास्केटबॉलच्या एनबीए कोर्टवरील कोबे ब्रायंट हे लिजंड नाव. या महान खेळाडूची शैली विलक्षण आणि गारुड करणारी. त्याने बास्केटबॉलला २० वर्षांच्या एनबीए कारकिर्दीत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. लॉस एंजलिस लेकर्स संघाचा हा महान अष्टपैलू खेळाडू बास्केटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत होता. विशेषतः लेकर्सच्या पाठीराख्यांसाठी तो वापरत असलेली ८ आणि २४ क्रमांकाची जर्सी पूजनीय होती. ब्लॅक माम्बा हे टोपणनाव त्याने स्वतःच घेतले होते. त्याची बास्केटबॉल कोर्टवरील आक्रमकता, चपळता, अचूक फेक, तसेच बचावातील दक्षतेमुळे कोबे याच्या लोकप्रियतेने आगळीच उंची गाठली होती. तब्बल दोन दशके या जबरदस्त शैलीच्या खेळाडूने लेकर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या असामान्य गुणवत्तेच्या प्रतिभाशाली बास्केटबॉलपटूची जगाच्या कोर्टवरील एक्झिट चटका लावणारी ठरली. त्याचे निधन अकाली ठरले, हृदयद्रावक. कोबे ब्रायंटच्या अपघाती निधनाचे वृत्त वाचून सारेच हळहळले. अवघ्या ४१ व्या वर्षी या दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना. सोबतीस आवडती लेक जियाना होती. या तेरा वर्षीय लेकीने वडिलांसमवेत इहलोकीचा निरोप घेतला. जियाना वडिलांसमवेत बास्केटबॉल कोर्टवर झळकत असे. तिलाही वडिलांचा लौकिक जपायचा होता, पण काळास ते मंजूर नव्हते. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वासमवेत एक कळीही लोपली. कोबे, त्याची मुलगी, सहकारी बास्केटबॉल प्रशिक्षक, त्याचे कुटुंब मिळून एकूण नऊ जणांचा कॅलिफॉर्नियातील हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यू साऱ्यांनाच हेलावणारा ठरला.

महान खेळाडू
 कोबे ब्रायंट हे बास्केटबॉल कोर्टवरील देदीप्यमान यश संपादन केलेले महान नाव १९९६ मध्ये प्रकाशझोतात आले. वयाच्या १८ व्या वर्षी एनबीए स्पर्धेत खेळणारा तरुण खेळाडू हा कीर्तिमान कोबे याने मिळविला. त्याचे वडील ज्यो (जेलीबीन) ब्रायंट हेसुद्धा माजी एनबीए खेळाडू, पण कोबेने वडिलांच्या लौकिकाची शिडी वापरली नाही. स्वतः अथक मेहनत घेत, त्याने मायकेल जॉर्डनला आदर्शवत मानले. आदर्श खेळाडूप्रमाणे जगविख्यात होण्याचा निर्धार त्याने शालेय वयातच केला होता आणि वयाच्या १८ व्या वर्षी प्रत्यक्षात आणला. २०१४ मध्ये कोबे याने जॉर्डनच्या एनबीए गुणांचा टप्पा मागे टाकला, हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. लेकर्स फ्रँचाईजीला कोबे याच्या अलौकिक क्षमतेने प्रभावित केले, त्यामुळेच त्याला चार्लोट हॉर्नेट्सकडून आपल्या संघात घेतले. नवोदित कोबे याला लेकर्स संघाने करारबद्ध केले, तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, पण एका महान बास्केटबॉलपटूचा तो नुकताच उदय होता. ६ फूट ६ इंच उंचीच्या कोबेयाचा चाहता वर्ग फार मोठा होता. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर अन्य देशांतही त्याच्या अफलातून खेळाने मोहिनी टाकली होती. तो संघात असताना लेकर्सने पाच वेळा एनबीए किताब जिंकला. अमेरिकेच्या संघाने दोन वेळा (२००८ बीजिंग व २०१२ लंडन) ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले. एनबीए स्पर्धेच्या इतिहासात कोबे याने ३३,६४३ गुण नोंदविले. दोन वेळा तो एनबीएच्या अंतिम लढतीत सर्वोत्तम खेळाडू ठरला. बास्केटबॉल कोर्टवरील त्याच्या खेळाची उंची अनन्यसाधारण ठरली. कोबे ब्रायंट याने बास्केटबॉल कोर्टवर कितीतरी जणांना प्रेरणा दिली. त्याचा आदर्श बाळगून नवी मुले खेळू लागली. कोबेच्या अफलातून विलक्षण खेळाने लेकर्सचे घरचे मैदान असलेले स्टॅपल्स सेंटरही अजरामर ठरले.

जर्सीचीही निवृत्ती
 कोबे ब्रायंटच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर आता लॉस एंजलिस लेकर्स संघाने तो वापरत असलेली ८ व २४ क्रमांकाची जर्सी निवृत्त करून आपल्या थोर खेळाडूस आगळी श्रद्धांजली वाहिली आहे. फिलाडेल्फियात जन्मलेल्या कोबे याच्यासाठी बास्केटबॉल सर्व काही होते. कारकिर्दीतील अखेरच्या एनबीए मोसमात तो ६६ सामने खेळला. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यातही त्याचा धडाका कायम राहिला. त्या मोसमात त्याने १७.६ च्या सरासरीने गुण नोंदविले. १३ एप्रिल २०१६ रोजी कोबे एनबीए स्पर्धेतील शेवटचा सामना खेळला. ती लढत त्याने ६० गुण नोंदवून संस्मरणीय ठरविली. २००३ मध्ये कोलोरॅडोत त्याच्यावर लैंगिकविषयक आरोप झाले, पण वर्षभरातच ते मागे घेण्यात आले. बलात्काराचे आरोप झाले, मात्र संबंध सहमतीने होते हे त्याचे म्हणणे होते. या प्रकरणी कोबे याने माफीनामा सादर केला. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर २००१ मध्ये त्याचे व्हॅनेसा हिच्याशी लग्न झाले. कोबे-व्हॅनेसा दांपत्यास चौघीही मुली. मोठी १७ वर्षांची नतालिया, त्यानंतर जियाना, बियांका सात वर्षांची, तर सर्वांत छोटी कॅप्री सात महिन्यांची, दुर्दैवाने तिला आपल्या वडिलांची फोटोतील छबीच पाहावी लागणार आहे. जियाना वडिलांसमवेत बास्केटबॉल कोर्टवर बागडायची. तिला वडिलांचा भारी लळा होता. निवृत्तीनंतर कोबेच्या बास्केटबॉलविषयक चित्रपटास २०१८ मध्ये ऑस्करही मिळाले. बास्केटबॉलमुळे अफाट कीर्ती संपादन केलेला कोबे मुलीसमवेत युवा बास्केटबॉल सामन्यास जाताना अपघातग्रस्त झाला हा एक विचित्र योगायोगच मानावा लागेल.   

संबंधित बातम्या