महिलांचे मिशन टी-२० वर्ल्ड कप

किशोर पेटकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

क्रीडांगण
 

महिलांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता, पण संघ अंतिम फेरीपूर्वीच गारद झाला. विंडीजमध्ये झालेल्या स्पर्धेत इंग्लंडने भारताला उपांत्य लढतीत ८ विकेट्स राखून हरविले होते. भारताचा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपल्यामुळे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांचा दबदबा दिसतो. विंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा खेळही दमदार असतो. या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वकरंडक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा थरार रंगेल. त्या स्पर्धेत भारतही संभाव्य विजेत्यांच्या यादीत असेल. २०१६ मध्ये मायदेशी झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताला बाद फेरी पार करता आली नव्हती. तेव्हा विंडीजविरुद्ध मोहाली येथे भारताचा डाव ११५ धावांत गारद झाला होता. महत्त्वाच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट दबाव घेतो हे काही निकालावरून जाणवते. २०१७ मध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक जिंकण्याची महिलांना नामी संधी होती, पण इंग्लंडविरुद्ध संघ ताण सहन करू शकला नाही आणि विश्वकरंडक निसटला. हा मुद्दा संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पकडला आहे. दबाव घेण्याऐवजी, आम्ही खेळाचा आनंद लुटणे योग्य ठरेल. आम्हाला कौशल्याच्या मदतीने नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे, असे भारताची कर्णधार ऑस्ट्रेलियास रवाना होण्यापूर्वी मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हणाली. मागील अपयश विसरून नव्या उमेदीने खेळणे आवश्यक असल्याचे हरमनप्रीतने सुचविले आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तिरंगी मालिकेत खेळणार आहे. या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे तगडे संघ प्रतिस्पर्धी असल्यामुळे भारतीय महिला संघाच्या विश्वकरंडक तयारीची आणि ताकदीची चाचपणी करता येईल.

युवा खेळाडूंवर विश्वास
डब्ल्यू. व्ही. रमण हे भारताचे माजी कसोटीपटू. त्यांच्याकडे महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद आहे. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा युवा महिला संघ टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळेल. भारतीय महिला क्रिकेटच्या सुपरस्टार मिताली राज व झुलन गोस्वामी यांनी फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोघीही यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नाहीत. निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखविला आहे. त्यांपैकी दोघीजणी खूपच युवा आहेत. शफाली वर्मा ही १५ वर्षांची, तर पश्चिम बंगालची ऋचा घोष १६ वर्षांची आहे. ऋचा हिची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे, तर हरियानाच्या शफाली हिने लहान वयातच मोठ्या व्यासपीठावर धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधले आहे. शफालीने ९ टी-२० सामने खेळले आहेत, त्यात तिने १४२.३० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज १९ वर्षांची आहे, पण या मुलीने जागतिक क्रिकेटमध्ये अनुभवासह लौकिक प्रस्थापित केला आहे. स्मृती मानधना आणि जेमिमा यांच्या फटकेबाज फलंदाजीवर भारताचे यश अवलंबून आहे. महिला क्रिकेटमध्ये टॉपर असलेली स्मृती २३ वर्षांची आहे. राधा यादव ही मुंबईकर मुलगीही गुणवान डावखुरी फिरकी गोलंदाज असून वयाच्या १९ व्या वर्षी ती भारतीय टी-२० संघाची प्रमुख गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या संघात फक्त दोघीच तिशीतील खेळाडू आहे. कर्णधार हरमप्रीत व वेगवान गोलंदाज शिखा पांडे या ३० वर्षांच्या आहेत, बाकी सर्व खेळाडू त्याखालील वयाच्या आहेत. युवा खेळाडूंनी विश्वास सार्थ ठरवून दमदार खेळ केल्यास भारतीय महिला संघ विश्वकरंडक विजेतेपदाचे स्वप्न साकारू शकेल.

फिरकी ताकद
ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात फिरकी गोलंदाजीवर भर देण्यात आला आहे. त्याचे कर्णधार हरमनप्रीत हिने समर्थनही केले आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा इतिहास लक्षात घेता फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिल्याच्या अनुषंगाने हरमनप्रीतने स्पष्टीकरण दिले. फिरकी गोलंदाजी ही आमच्या संघाची ताकद आहे, त्यामुळे संघ निवडीत या गोलंदाजांना झुकते माप मिळाले हे हरमनप्रीतने कबूल केले आहे. पूनम यादव ही संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, स्वतः हरमनप्रीत या फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून राहील. तुलनेत शिखा पांडे, पूजा वस्त्रकार व अरुंधती रेड्डी या तिघीच वेगवान-मध्यमगती गोलंदाजी टाकणाऱ्या आहेत. भारताच्या 'अ' गटात यजमान ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश हे संघ आहेत. कांगारूंच्या भूमीवर भारताचा फिरकी मारा प्रभावी ठरला, तर आगेकूच राखणे सोपे ठरेल. फलंदाजी आणि फिरकी गोलंदाज या दोहोंवर भारतीय महिलांची वाटचाल अवलंबून असेल. 

संबंधित बातम्या