असभ्य जगज्जेते...

किशोर पेटकर
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

क्रीडांगण
 

क्रीडा मैदानावर ज्युनिअर गट हा कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो. याच वळणावर क्रीडापटू शिस्त, मेहनत, चिकाटी, दृढ निश्चय या बळावर आपली कारकीर्द पुढे नेण्याचा संकल्प करतो, पण ज्युनिअर पातळीवर क्रीडापटू बेशिस्त, असभ्य वागू लागले, की शंकेची पाल चुकचुकते. नादान क्रिकेटपटू कोणता आदर्श राखणार हाच प्रश्न उपस्थित होतो. दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रूम येथे बांगलादेशच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने विश्वकरंडक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी साधली, पण त्यांच्या खेळाडूंचे मैदानावरील वर्तन अतिशय असभ्य, असंस्कृत ठरले. जगज्जेतेपदाच्या उन्मादात ते बेभान झाले, खिलाडूवृत्तीच विसरले. साहजिकच बांगलादेशच्या जगज्जेतेपदावर डाग आला, त्यांचे यश काळवंडले. यश पचवणे बांगलादेशी क्रिकेट संघाला जमले नाही. परिणामी भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार प्रियम गिल याला प्रतिस्पर्धी संघाच्या बेशिस्त वर्तनास गलिच्छ संबोधणे भाग पडले. बांगलादेशी ज्युनिअर क्रिकेटपटूंनी विजयानंतर उच्छाद केला, सामना सुरू असताना टोमणेबाजीच्या माध्यमातून अतिशय हीन वर्तणूक प्रदर्शित केली. त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने काही भारतीय ज्युनिअर क्रिकेटपटूही वाहवत गेले. परिणामी तिघा बांगलादेशी क्रिकेटपटूंबरोबरच दोघा भारतीय क्रिकेटपटूंवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कारवाई करावी लागली. बांगलादेशने ज्युनिअर जगज्जेतेपदानंतर सभ्यतेची मर्यादा पार ओलांडली. त्यामुळे भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांनाही क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे का हा प्रश्न विचारावा लागला. बांगलादेशी, तसेच काही भारतीय क्रिकेटपटूंच्या अस्वीकार्ह वर्तनाची कोणीही पाठराखण करणार नाही. कपिल यांनी सुचविल्याप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ज्युनिअर क्रिकेटपटूंसाठी कडक आचारसंहिता राबविणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने ज्युनिअर क्रिकेटपटूंची असंस्कृती फोफावणार नाही यासाठी वेळीच कडक उपाययोजना करायला हवी. 

जबाबदारी सर्वांचीच
 भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वकरंडक अंतिम सामना सुरू झाल्यापासून बांगलादेशी क्रिकेटपटूंची मैदानावर खिजवणारी शेरेबाजी सुरू होती. भारतीय सलामीवीर फलंदाजी करत असताना बांगलादेशी पहिल्या चेंडूपासून स्लेजिंग करत होते. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहताना बांगलादेशच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे हिणकस वर्तन चीड आणत होते. अमर्याद स्लेजिंग करणाऱ्या बांगलादेशींना रोखले गेले नाही. भारत व बांगलादेश यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धच असल्याचे वातावरण तयार झाले होते, त्यात सामना पाहण्यास आलेले बेधुंद, खिलाडूवृत्तीची जाण नसलेले बांगलादेशी समर्थक खतपाणी घालत होते. अंतिम सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याला उपरती झाली, पण यष्टिरक्षक या नात्याने मैदानावर असताना कर्णधारपद वापरून आपल्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना असभ्य स्लेजिंगपासून दूर ठेवणे अकबरला जमले नाही. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या युवा क्रिकेटपटूंपर्यंत बांगलादेशी क्रिकेटपटूंद्वारे वाईट संदेश गेला. जीत असो वा हार, ती सभ्यपणे स्वीकारणे हे प्रत्येक खेळाडूचे कर्तव्य असते. खेळाचा सन्मान राखणे हाच मोठा विजय असतो. क्रिकेटला तर सभ्य गृहस्थांचा खेळ मानले जाते, पण मैदानावरील क्रिकेटपटूंची असमर्थनीय कृती पाहून वारंवार मान शरमेने झुकते.  

भारताची संधी हुकली
 आता प्रत्यक्ष खेळाकडे वळू, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामना वगळता, पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला. अंतिम सामन्यात प्रतिकूल परिस्थितीत मुंबईचा यशस्वी जैसवाल निर्धाराने खेळला. त्याच्या झुंजार ८८ धावांमुळे भारताला १७७ धावांची मजल मारता आली. नंतर लेगस्पिनर रवी बिष्णोई याच्या जादूई फिरकीमुळे बांगलादेशची कमी धावांचे विजयी लक्ष्य गाठताना दमछाक झाली. पाचव्यांदा ज्युनिअर जगज्जेतेपद मिळविणे भारतीय संघाला शक्य झाले नाही. महंमद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२), पृथ्वी शॉ (२०१८) या ज्युनिअर जगज्जेत्या कर्णधारांच्या पंगतीत स्थान मिळविण्याची प्रियम गर्गची संधी हुकली. मात्र काही खेळाडूंनी लक्ष वेधले, आपण भविष्यकालीन गुंतवणूक असल्याचे सिद्ध केले. १८ वर्षीय डावखुरा यशस्वी जैसवाल स्पर्धेत प्रगल्भपणे खेळला. त्याने एक शतक व चार अर्धशतके नोंदवत ६ सामन्यांत १३३.३३ च्या सरासरीने ४०० धावा केल्या. यशस्वी हा उत्तर प्रदेशमधील मेहनती, जिद्दी मुलगा. क्रिकेट प्रतिभेला खतपाणी घालण्यासाठी मुंबईत आला. अर्धपोटी सामने खेळला, डासांचे चावे सहन करत उपाशी झोपला, मैदानाच्या बाजूस असलेल्या कोंदट तंबूत राहिला, पाणीपुरी विकण्यातही कमीपणा मानला नाही. फक्त सफल क्रिकेटपटू होण्याचे ध्येय बाळगून त्याने हालअपेष्टा सोसल्या. त्याचे फळ त्याला आता मिळू लागलेय, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे हे निश्चित.    

संबंधित बातम्या