महिला टेनिसमध्ये नवे चेहरे

किशोर पेटकर
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

क्रीडांगण
 

जागतिक पुरुष टेनिसमध्ये अजूनही रॉजर फेडरर-राफेल नदाल-नोव्हाक जोकोविच या त्रिकुटाचाच दबदबा आहे. ग्रँड स्लॅम विजेतीपदे त्यांच्यात विभागून जात आहेत. फेडरर ३८ वर्षांचा आहे आणि अजूनही ग्रँड स्लॅम टेनिस कोर्टवर दमदार खेळ करताना दिसतोय. नदाल ३३ वर्षांचा आहे आणि मातीच्या कोर्टवरील शहेनशाह आहे. जोकोविच ३२ वर्षांचा आहे आणि नुकतीच त्याने आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रियन डॉमनिक थीम हा २६ वर्षीय टेनिसपटू जोकोविचचा अंतिम लढतीतील प्रतिस्पर्धी होता, वयाने तरुण असूनही थीमला जोकोविचचा धडाका रोखणे शक्य झाले नाही. पुरुष गटात त्रिकुटाची मत्तेदारी असताना महिला टेनिसमध्ये नवे चेहरे प्रकाशमान होत आहेत. त्यांच्या हाती ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे करंडक दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीत रशियात जन्मलेली अमेरिकन सोफिया केनिन हिने विजेतेपद पटकाविले. या २१ वर्षीय खेळाडूचे हे पहिले ग्रँड स्लॅम यश ठरले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा वर्षांत यंदा पाचवी नवी विजेती पाहायला मिळाली. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने २०१५ व २०१७ मध्ये मेलबर्न पार्कवर विजेतेपदाचा झेंडा फडकाविला. २०१६ मध्ये जर्मनीची अँजेलिक केर्बर, २०१८ मध्ये डेन्मार्कची कॅरोलिन वॉझ्नियाकी, २०१९ मध्ये जपानची नाओमी ओसाका, तर यंदा सोफिया केनिन विजेती ठरली. साहजिकच महिला टेनिस मोजक्याच खेळाडूंभोवती केंद्रित नाही हे स्पष्ट आहे. ३८ वर्षीय सेरेना विल्यम्स अजूनही टेनिस कोर्टवर सक्रिय आहे, पण नव्या दमाच्या खेळाडू तिला भारी ठरताहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या सेरेनाचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. चीनच्या २७ व्या मानांकित वँग क्वियांग हिने तिचा पाडाव केला. 

सोफिया आता अव्वल अमेरिकन
 ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत सोफिया केनिन हिने स्पॅनिश खेळाडू गार्बिन मुगुरुझा हिला दोन तास तीन मिनिटांच्या खेळात ४-६, ६-२, ६-२ असे हरविले. या कामगिरीमुळे सोफिया आता अव्वल अमेरिकन महिला टेनिसपटू ठरली आहे. पूर्वी हा मान सेरेनाकडे होता. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लवकर गारद झाल्यामुळे सेरेना जागतिक मानांकनात नवव्या स्थानी घसरली, तर मेलबर्नमधील विजेतेपदामुळे सोफिया कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या क्रमांकावर आली आहे. यापूर्वी ज्युनिअर गटात सोफियाने अमेरिकेची अव्वल टेनिसपटू हा मान मिळविला आहे, पण सीनियर गटात तिने प्रथमच असा पराक्रम साधला आहे. व्यावसायिक झाल्यानंतर चार वर्षांतच या जिद्दी मुलीने मोठे यश साकारले आहे. आता यापुढे कामगिरीत सातत्य आणि लौकिक राखण्यासाठी तिला प्रयत्नशील राहावे लागेल. गार्बिन मुगुरुझा ही २६ वर्षीय टेनिसपटू सोफियापेक्षा वयाने आणि अनुभवाने सरस. गार्बिनने फ्रेंच ओपन २०१६, तर विंबल्डन स्पर्धा २०१७ मध्ये जिंकली होती, पण सध्या तिचे मानांकन घसरले आहे. युवा सोफियाविरुद्ध गार्बिनचा टिकाव लागला नाही. पहिला सेट गमावल्यानंतर सोफियाने नंतरच्या दोन्ही सेट्समध्ये स्पॅनिश खेळाडूस निष्प्रभ केले. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत गारद झालेल्या सोफियाने यंदा खूपच प्रगतशील खेळ केला. त्याची बक्षिशी तिला विजेतेपदाच्या करंडकाच्या रूपात मिळाली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी ती १८ वी अमेरिकन महिला टेनिसपटू ठरली.

बॉल गर्ल ते चँपियन...
 टेनिस सामन्यांतील बॉल गर्ल ते ग्रँड स्लॅम चँपियन हा सोफियाचा प्रवास प्रेरक आणि स्पृहणीय आहे. वडील अॅलेक्झांडर (अॅलेक्स) केनिन हे तिचे प्रशिक्षक. मुलीच्या कारकिर्दीस त्यांनीच यशस्वी दिशा दाखविली आहे. सोफियाचा जन्म १४ नोव्हेंबर १९९८ रोजी रशियातील मॉस्को येथे झाला. केनिन कुटुंबीय अमेरिकन झाले, सोफियाच्या टेनिस गुणवत्तेला नव्या देशात बहर आला. वयाच्या पाचव्या वर्षी तिने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने माजी अव्वल खेळाडू किम क्लायस्टर्स हिच्या सामन्यात बॉल गर्ल म्हणून जबाबदारी पार पाडली. रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा हिला सोफिया प्रेरणास्त्रोत मानते. मारियाने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली, तेव्हा ती २० वर्षांची होती. आता सोफिया २१ व्या वर्षी अजिंक्य ठरली. दशकभरापूर्वी जागतिक मानांकनात अव्वल राहिलेल्या मारियाने कारकिर्दीत पाच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन, अमेरिकन ओपनमध्ये ३२ वर्षीय मारिया विजेती ठरली. मेलबर्न पार्कवर जेतेपद मिळविलेल्या सोफियाची नुकतीच कुठे सुरुवात आहे, ती तंदुरुस्ती राखत कितपत मजल मारतेय हे पाहणे औत्सुकपूर्ण असेल. 

संबंधित बातम्या