कोरोनाची क्रीडा जगतास धास्ती

किशोर पेटकर
सोमवार, 9 मार्च 2020

क्रीडांगण
 

सुरुवातीस केवळ चीनपुरता मर्यादित असलेल्या कोरोना विषाणूचा विळखा आता जगभरात पसरू लागला आहे. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, इराण या आशियायी देशांबरोबरच युरोपातील इटलीतही कोरोनाने बळी घेतले आहेत. ब्रिटन, जर्मनी, रशिया, स्वित्झर्लंड, क्रोएशिया, ऑस्ट्रिया या देशांतही कोराना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडल्याने जागतिक आरोग्य संघटना हवालदिल झाली आहे. सारे जग आता या जीवघेण्या व्हायरसमुळे धास्तावले आहे. त्याचे पडसाद जागतिक क्रीडा जगतातही उमटू लागले आहेत. कोरोना विषाणूचा नायनाट करणारे औषध अजून सापडलेले नाही. जागतिक आरोग्य संघटना अटोकाट प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांना फटका बसू लागला आहे. चीनमधील कितीतरी स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम क्रीडा स्पर्धेच्या अर्थकारणावर होत आहे. जपानमधील टोकियो शहरात येत्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर संकट आले आहे. टोकियो ऑलिंपिक आयोजन समिती स्पर्धा ठरलेल्या कालावधीत होण्याबाबत आशावादी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीही त्यांची पाठराखण करत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृतांची संख्या वाढतच आहे, विषाणूची धग आणि तीव्रता जगभरात जाणवत आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा लांबणीवर टाकणे किंवा स्पर्धा इतर देशांत घेण्याबाबत चर्चा झडू लागली आहे, ती कितपत व्यवहार्य आहे हे सांगणे कठीण आहे, मात्र कोरोना व्हायरसमुळे धास्तावलेले सूर उमटू लागलेत.

ऑलिंपिक रद्द करणे सोपे नव्हे
 ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची व्याप्ती खूप मोठी असते. ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय एका झटक्यात घेता येत नाही. स्पर्धेचे यजमानपद खूप अगोदर जाहीर होते, त्यानंतर तयारी इत्यादी बाबींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे सदस्य डिक पौंड यांच्यानुसार, ऑलिंपिक रद्द झाल्यास त्याचा आर्थिक फटका जगभरातील राष्ट्रीय क्रीडा संघटनांना बसणार आहे. टीव्ही कंपन्या, पुरस्कर्ते यांचे करारही भलेमोठे असतात. त्यामुळे ऑलिंपिक रद्द करण्याचा निर्णय सोपा नसतो. पौंड हे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे दीर्घानुभवी आणि जुनेजाणते पदाधिकारी आहेत. टोकियो ऑलिंपिकचा शुभारंभ २४ जुलैला होईल. तोपर्यंत कोरोना व्हायरसला प्रतिबंध झालेला असेल आणि विषाणूची व्याप्ती वाढणार नाही अशी आशा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस आहे. कोरोनाचे विषाणू फैलावतच राहिल्यास टोकियो ऑलिंपिक संयोजनाबाबत आंतरराष्ट्रीय समितीला गांभीर्याने विचार करावा लागेल. ऑलिंपिकच्या इतिहासात केवळ युद्ध सोडले, तर दर चार वर्षांनी जगातील हा सर्वांत मोठा क्रीडा महोत्सव नित्यनेमाने झालेला आहे. त्यात खंड पडलेला नाही. कोरोना विषाणूने अक्राळविक्राळ रूप धारण केल्यामुळे टोकियो ऑलिंपिक संयोजक चिंतित आहे. लंडनमध्ये २०१२ मध्ये ऑलिंपिक स्पर्धा झाली होती. टोकियो स्पर्धेसाठी असमर्थ ठरल्यास लंडन सक्षम असेल याबाबतचा सूर लंडन महापौरपदाच्या उमेदवारांनी छेडला. त्यावर टोकियोतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ब्रिटिश ऑलिंपिक समितीला महापौरपदाच्या उमेदवारांच्या वक्तव्याशी अलिप्त भूमिका घ्यावी लागली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सावध पवित्रा घेतला आहे. आगीत तेल ओतणार नाही, असे बाक यांनी नमूद केले आहे. काही का असेना, कोरोना व्हायरस रोखला गेला नाही, तर टोकियो ऑलिंपिकचे संयोजन संकटात असेल. याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेला मे महिनाअखेरपर्यंत निर्णय घ्यावाच लागेल. जागतिक आरोग्य प्रशासन कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीत खेळाडूंनी स्वतःच्या आरोग्याऐवजी टोकियो ऑलिंपिक सहभागाच्या स्वप्नपूर्तीस प्राधान्य देऊ नये, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान जलतरणपटू इयान थॉर्पने व्यक्त केले आहे.

युरो फुटबॉलबाबतही चिंता
 जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे चीनमधील कितीतरी क्रीडा स्पर्धांवर परिणाम होताना दिसत आहे. १९ एप्रिलला शांघाय येथील फॉर्म्युला वन मोटर रेसिंगमधील चायनीज ग्रांप्री ठरलेल्या तारखेस होणार नाही. चीनमधील नान्जिंग येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत नियोजित असलेली जागतिक इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. इटलीत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या वाढल्यामुळे तेथे होणारे युरो फुटबॉल स्पर्धेतील सामने प्रश्नांकित आहेत. युरोपातील १२ देशांच्या शहरांत १२ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या युरो फुटबॉल स्पर्धेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. १२ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक आता परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या स्पर्धेत युरोपातील २४ देशांचे संघ सहभागी होतील. पहिला सामना १२ जून रोजी रोम शहरात यजमान इटली व तुर्कस्थान यांच्यात खेळला जाईल.   

संबंधित बातम्या