टेनिससुंदरीचा गुडबाय

किशोर पेटकर
सोमवार, 9 मार्च 2020

क्रीडांगण
 

रशियाची, पण अमेरिकेत राहून टेनिस बहरलेल्या मारिया शारापोवा हिने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. सौंदर्याचे देणे लाभलेली ही टेनिससुंदरी टेनिस कोर्टवर गुणवान आणि तेवढीच शापितही ठरली. वयाच्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा जिंकून नावारूपास आली. प्रसिद्धी, पैसा यांनी तिच्या पायाशी लोळण घेतली, मात्र कारकिर्दीतील उत्तरार्ध तिच्यासाठी क्लेशदायक ठरला. चार वर्षांपूर्वी डोपिंगमध्ये ती दोषी आढळली. २०१६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या कालावधीत झालेल्या चाचणीत तिच्या शरीरात मेल्डोनियम या बंदी असलेल्या द्रव्याचे अंश सापडले. त्यामुळे तिला दोन वर्षांच्या निलंबनास सामोरे जावे लागले. त्या विरोधात मारियाने क्रीडा लवादाकडे दाद मागितली, तिच्या शिक्षेत कपात झाली आणि निलंबन १५ महिन्यांवर आले, पण डोपिंगमधील दोषी खेळाडू हा शिक्का काही पुसला गेला नाही. उजवा खांदा तिला पूर्वीपासूनच त्रास देत होता. वेदना खूपच असह्य झाल्या. खेळावर परिणाम झाला. मारियाच्या शैलीदार खेळास उतरती कळा लागली. डोपिंगमुळे निलंबनाची शिक्षा भोगून ती जिद्दीने पुन्हा मैदानावर परतली, पण खेळ काही खुलला नाही. २०१७ मध्ये पुनरागमन केल्यानंतर ही रशियन तरुणी फक्त एकच टेनिस स्पर्धा जिंकू शकली. ग्रँड स्लॅम विजेतेपद तर खूपच खडतर ठरले होते. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुरुवातीलाच तिला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक मानांकन तब्बल ३७३ क्रमांकापर्यंत घसरले. एकेकाळी अव्वल स्थानी राहिलेल्या मारियानेही जास्त ताणले नाही, खराब फॉर्म आणि शरीराचे असहकार्य यामुळे तिने अखेर निवृत्ती जाहीर केली. 

टेनिस हेच जीवन...
 टेनिसने मला जीवन दिले, त्यास मी आता दररोज मुकणार आहे, या शब्दांत भावना व्यक्त करत मारिया शारापोवाने परमप्रिय टेनिस जगताचा निरोप घेतला. रशियातील न्यागान येथे १९ एप्रिल १९८७ रोजी जन्मलेल्या या मुलीस घेऊन वडील युरी १९९४ मध्ये अमेरिकेत आले, तेव्हा मारिया अवघी सात वर्षांची होती. तिची टेनिस गुणवत्ता नैसर्गिक आणि उपजत होती. अमेरिकेत आवश्यक सुविधा मिळाल्यावर तिच्या प्रतिभेला धुमारे फुटले. २००१ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तिने व्यावसायिक महिला टेनिसमध्ये पदार्पण केले आणि तीन वर्षांतच कारकिर्दीतील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर दोन सेट्समध्ये सनसनाटी विजय मिळवून मारियाने विंबल्डन स्पर्धा जिंकली. मारियाचा जोशपूर्ण आणि नेत्रदीपक खेळ पाहून तिच्यावर फिदा झालेल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. २००४ नंतर मारिया पुन्हा कधीच विंबल्डनच्या हिरवळीवर विजेतेपदाची व्हीनस रोझवॉटर थाळी मिरविताना दिसली नाही, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच व अमेरिकन ओपन मिळून तिने ग्रँड स्लॅम विजेतीपदांची संख्या पाचवर नेली. २०१४ मध्ये तिने दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली, ते तिचे शेवटचे ग्रँड स्लॅम यश ठरले. खांद्याच्या दुखापतीचा तिचा हातावर प्रतिकूल परिणाम झाला. उजव्या हाताने हुकमी फटके मारताना त्रास वाढला. २००७ पासून दुखापतीने तिचा पिच्छा पुरविला. तरीही जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर तिने उसळी घेतली. विशेषतः मातीच्या कोर्टवर तिचा खेळ कमालीचा खुलला. खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असूनही तिने २०१२ व २०१४ मध्ये पॅरिसमध्ये बाजी मारली. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर पुनरागमनाचा काळ तिच्यासाठी अतिशय खडतर ठरला. जागतिक महिला टेनिसमध्ये तिच्या ओघवत्या टेनिस शैलीचा प्रभाव होता, पण दर्जा घसरला होता, त्यामुळेच पुनरामनानंतरच्या कालावधीत ती फक्त ४५ सामनेच जिंकू शकली.

अव्वल क्रमांकावरील सम्राज्ञी
 जागतिक महिला टेनिसमधील अव्वल क्रमांकावरील सम्राज्ञी हा बहुमान मारिया शारापोवास ऑगस्ट २००५ मध्ये सर्वप्रथम मिळाला. तेव्हा ती अवघी १८ वर्षांची होती. २००४ मधील विंबल्डन विजेतेपदानंतर २००६ मध्ये अमेरिकन ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तिने कारकिर्दीचा आलेख उंचावत नेला. कारकिर्दीत तिने एकूण २१ आठवडे जागतिक महिला टेनिसमध्ये अव्वल स्थान भूषविले. अमेरिकेत स्थायिक होऊनही ती मायदेशाला विसरली नाही. तिने रशियाचे प्रतिनिधित्व केले. २००८ मध्ये फेडरेशन कप, तर २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले. कारकिर्दीत ६४५ सामने जिंकणाऱ्या मारियाने १७१ पराभव पत्करले, त्यांपैकी जास्त पराजय कारकिर्दीच्या उत्तरार्धातील होते.  टेनिसने जग दाखविले, टेनिसमुळे स्वतःची चाचपणी करू शकले, असे सांगणाऱ्या मारियाने निवृत्तीनंतर पुढचा डोंगर स्वतःला ढकलत, चढत आणि प्रगती साधत जाण्याचे ठरविले आहे. 
 

संबंधित बातम्या