रणजी `चँपियन` सौराष्ट्र

किशोर पेटकर
सोमवार, 13 एप्रिल 2020

क्रीडांगण
 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९३४-३५ मोसमापासून राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळलेले असामान्य गुणवत्तेचे भारतीय फलंदाज रणजितसिंहजी यांच्या नावे स्पर्धा खेळविण्याचा निर्णय झाला. ते रणजी या टोपणनावाने परिचित होते, तेच नाव स्पर्धेसाठी वापरण्याचे ठरले. रणजी हे काठियावाड प्रांतातील नवानगर संस्थानाचे महाराज. आताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्रमध्ये नवानगर संस्थानाचा उल्लेख सापडतो. स्वातंत्र्यानंतर राजेशाही कालबाह्य झाली, पण रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून महाराज रणजितसिंहजी यांची स्मृती तेवत राहिली. रणजी यांच्या भूमीतील सौराष्ट्र संघाने यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकून, नवानगरच्या माजी महाराजांना आगळी मानवंदना दिली. रणजी यांचे १९३३ मध्ये निधन झाले आणि त्यानंतर वर्षभरात त्यांच्या नावे स्पर्धा सुरू झाली होती. इतिहासात डोकावता, नवानगर संस्थानाने १९३६-३७ मोसमात रणजी करंडक पटकाविला होता. त्यानंतर आताचे सौराष्ट्र असलेल्या तत्कालीन वेस्टर्न इंडिया प्रांताने १९४३-४४ मध्ये विजेतेपद मिळविले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सौराष्ट्राने १९५०-५१ मोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा पदार्पण केले आणि तब्बल ७० वर्षानंतर राष्ट्रीय चँपियन होण्याचा मान मिळविला. सौराष्ट्राची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत खेळण्याची ही चौथी वेळ होती. २०१२-१३ व २०१५-१६ मध्ये मुंबईविरुद्ध पराभूत झाल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१८-१९ मोसमात त्यांनी पुन्हा अंतिम फेरी गाठली, पण विदर्भाचे वर्चस्व राहिल्यामुळे त्यांचे विजेतेपद पुन्हा निसटते. यंदा, २०१९-२० मोसमात त्यांनी करंडकावर पकड घट्ट राहील याची दक्षता घेतली. राजकोटमधील खांडेरी येथील घरच्या मैदानावर त्यांनी अंतिम लढतीत ऐतिहासिक रणजी करंडकावर नाव कोरले. बंगालवर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात करून रणजी करंडक `घरी` आणण्याची किमया साधली. अनिर्णित राहिलेल्या लढतीत पहिल्या डावातील ४४ धावांची आघाडी निर्णायक ठरली.

देशांतर्गत क्रिकेटमधील नवी ताकद
दशकभराच्या कालावधित सौराष्ट्रने भारतीय क्रिकेटमधील भरपूर प्रगती साधल्याचे दिसून येते. सौराष्ट्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये ताकद निर्माण होत असल्याचे जाणवते. भारताच्या कसोटी क्रिकेट संघातील हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजारा हा सौराष्ट्रमधील, डावखुरा फिरकीपटू-अष्टपैलू रवींद्र जडेजा याचे क्रिकेटही सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या छत्रछायेखालीच बहरले. सध्याच्या संघाचा कर्णधार वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानेही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष निरंजन शाह यांना तेथील क्रिकेटच्या विकासाचे श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी सौराष्ट्रमधील क्रिकेट साफ दुर्लक्षित होते, तेव्हा पश्चिम विभागातील कमजोर संघ हीच त्यांची ओळख होती. नंतर प्लेट गटातही हा संघ कमकुवत राहिला, मात्र राजकोट आणि परिसरात दर्जेदार साधनसुविधा तयार होताच, सौराष्ट्रातील क्रिकेटने प्रचंड झेप घेतली. आठ मोसमात चार वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम साधला. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडे आदराने पाहिले जाते. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खांडेरी स्टेडियम उत्तम साधनसुविधांसाठी ओळखले जाते. तेथील क्रिकेटपटूही प्रेरक कामगिरी करताना दिसत आहेत. 

सुरेख सांघिक कामगिरी
रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्रसाठी सांघिक कामगिरी सुरेखपणे जुळून आली. त्यामुळे त्यांना गटसाखळीतून विजेतेपदापर्यंत मजल मारता आली. चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा भारतीय संघातून खेळल्यामुळे बहुतेक वेळा अन्य खेळाडूंनी सौराष्ट्र संघाचा भार वाहिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमुळे रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून अंतिम लढत खेळू शकला नाही. त्याची उणीव धर्मेंद्रसिंह जडेजा याने भरून काढली. बंगालविरुद्धच्या अंतिम लढतीच्यावेळी पुजारा जायबंदी झाला, पण सौराष्ट्र संघाचा आत्मविश्वास आणि मनोबल कोसळले नाही. संघाचा उपकर्णधार डावखुरा अर्पित वासवाडा याने उपांत्य व अंतिम लढतीत शतक ठोकून संघाची फलंदाजी पेलली. अनुभवी शेल्डन जॅक्सन यानेही धावांचा रतीब टाकला. चिराग जानी, हार्विक देसाई यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. इतर खेळाडूंनीही आपल्यापरीने वाटा उचलला. सर्वाधिक प्रभाव पाडला तो कर्णधार जयदेव उनाडकट याने. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत धारदार मारा केला. त्याने एकूण ६७ गडी बाद केले आणि एका रणजी क्रिकेट मोसमात सर्वाधिक बळी घेण्याचा वेगवान गोलंदाजाचा नवा उच्चांक साकारला. भारताचे माजी गोलंदाज करसन घावरी हे रणजी करंडक विजेत्या सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते, त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावताना संघाला प्रेरित केले. ६९ वर्षीय घावरी यांचे साहाय्यक सौराष्ट्राचे माजी रणजीपटू नीरज ओडेदरा यांचे योगदानही लाखमोलाचे ठरले.

संबंधित बातम्या