एटीके-मोहन बागान एकत्र 

किशोर पेटकर
सोमवार, 13 एप्रिल 2020

क्रीडांगण
 

यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय फुटबॉलमध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. कोलकात्यातील फुटबॉलचा विचार करता, या घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. मोहन बागान हा कोलकात्यातील नावाजलेला फुटबॉल संघ. १९११ मध्ये आयएफए शिल्ड स्पर्धेच्या अंतिम लढतीत या बंगाली संघाने जिगरबाज खेळ करत मातब्बर ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंट संघाला हरविले. ब्रिटिश संघाला भारतीय संघाने पाणी पाजण्याची ती घटना ऐतिहासिक ठरली. या क्लबची परंपरा फार मोठी आहे. १८८९ मध्ये स्थापन झालेल्या या जुन्याजाणत्या क्लबने १३० वर्षे पूर्ण केली आहेत, पण भारतीय फुटबॉलमधील बदलत्या व्यावसायिकतेत मोहन बागानला टिकून राहणे कठीण ठरत होते, तरीही पूर्वपुण्याईवर त्यांनी दबदबा, लौकिक टिकवून ठेवला. भारतीय फुटबॉलची पंढरी मानली जाणाऱ्या कोलकाता नगरीसाठी मोहन बागान संघ भूषणावह आहे. आता या दिग्गज क्लबने नवा घरोबा केला आहे. सहा वर्षांपूर्वी मैदानावर आलेला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील संघ एटीके एफसी आणि मोहन बागान यांचे मनोमिलन झाले आहे. यावर्षी जूनपासून मोहन बागानचा संघ एटीके व्यवस्थापनाच्या झेंड्याखाली खेळणार आहे. २०१४ मध्ये आयएसएल स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर स्पेनमधील एटलेटिको द माद्रिद यांच्या सहकार्याने कोलकात्यात नव्या संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एटलेटिको द कोलकाता म्हणजेच एटीके संघाचा जन्म झाला. एटीके व एटलेटिको द माद्रिद व्यवस्थापनात दुरावा आला आणि उद्योगपती संजीव गोएंका यांच्या आरपी-संजीव गोएंका समूहाकडे एटीकेचे हक्क आले. आता आरपी-संजीव गोएंका समूहाने मोहन बागान क्लबचे ८० टक्के समभाग घेतले असून १ जून २०२० पासून एटीके-मोहन बागानचे विलीनीकरण प्रत्यक्षात येणार असून २०२०-२१ मोसमापासून एटीके-मोहन बागान संघ आयएसएल मैदानावर एकत्रित स्वरूपात खेळताना दिसेल.

दोन्हीही संघ विजेते
मोहन बागानने २०१९-२० मोसमातील आय-लीग स्पर्धेतील चार फेऱ्या बाकी असताना स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर १६ गुणांची आघाडी राखत मोहन बागानने आय-लीग स्पर्धा दुसऱ्यांदा, तर राष्ट्रीय साखळी स्पर्धेतील तीन विजेतीपदे मिळून एकूण पाच वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम साधला. मोहन बागानने आता गोव्याच्या धेंपो स्पोर्टस क्लबच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. धेंपो क्लबने दोन वेळा राष्ट्रीय साखळी स्पर्धा, तर तीन वेळा आय-लीग स्पर्धा जिंकली होती. २०१९-२० मोसमापासून आय-लीग स्पर्धेचे महत्त्व कमी झाले. आयएसएल स्पर्धा देशातील अव्वल श्रेणी स्पर्धा ठरली, तर आय-लीगला दुय्यम स्थान मिळाले. एटीके हा आयएसएल स्पर्धेतील मातब्बर संघ आहे. नुकतेच त्यांनी ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम साधला. आयएसएल स्पर्धेच्या सहा वर्षांच्या इतिहासात तीन वेळा विजेतेपद मिळविणारा एटीके हा एकमेव संघ आहे. कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे गोव्यात १५ मार्च रोजी रिकाम्या स्टेडियमवर आयएसएल अंतिम लढत झाली. दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीवर मात करत एटीके संघाने २०१६ नंतर आयएसएल किताब पटकाविला. योगायोग असा, की विलीनीकरणानंतर एकाच मोसमात मोहन बागानने आय-लीग, तर एटीके संघाने आयएसएल जेतेपद मिळविले. आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकल्यामुळे एफसी गोवा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आय-लीग विजेत्या मोहन बागानबरोबरच्या विलीनीकरणामुळे एटीके संघाला एएफसी कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.

हबास यांच्यावर विश्वास 
एटीके एफसी संघाला यंदा आयएलएस करंडक जिंकून देणारे अंतोनियो लोपेझ हबास हे ६२ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक आहेत. २०१४ मध्ये आयएसएल स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी एटीके संघाने हबास यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपदास गवसणी घातली होती, नंतर २०१५ मधील मोसमानंतर एटीके व हबास यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. यंदा २०१९-२० मोसमातील विजेतेपदानंतर एटीके व्यवस्थापनाने हबास यांना कायम राखण्याचे ठरविले आहे. त्यामुळे २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धेत एटीके-मोहन बागान संघ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. यासंबंधीची घोषणा संजीव गोएंका यांनी एटीकेने आयएसएल करंडक तिसऱ्यांदा उंचावल्यानंतर केली. २०१४-१५ मोसमानंतर आय-लीग विजेता ठरलेल्या मोहन बागानने किबु विकुना यांच्या मार्गदर्शनाखाली यशाची चव चाखली. विकुना हे ४८ वर्षांचे असून तेही स्पॅनिश आहेत. नव्या मोसमात एटीके-मोहन बागान संघ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार असल्याने विकुना यांच्यावर नवा संघ शोधण्याची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या