जगभरातील फुटबॉल ठप्प

किशोर पेटकर
सोमवार, 27 एप्रिल 2020

क्रीडांगण
 

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ, मात्र कोरोना विषाणू महामारीमुळे हा सुंदर खेळ ठप्प झालेला आहे. युरोपातील फुटबॉलचे अर्थकारणही कोलमडले आहे. युरोपातील फुटबॉल मोसम पूर्ण होणार, की नाही याचीही शाश्वती नाही. स्पेनने एक पाऊल पुढे टाकत, ला-लिगा मोसम अर्ध्यावरच रोखण्याची तयारी केली आहे. जगात कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहाकार माजविलेल्या देशांपैकी स्पेन एक आहे. तेथे २०१९-२० मोसमातील बाकी सामने होतील, की नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळेच स्पर्धा रद्द करावी लागल्यास, प्रत्येकी २७ सामने खेळलेल्या संघांतून सध्याचे पहिले चार संघ चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय स्पेन फुटबॉल महासंघाने घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची वाढ पाहता, स्पेनमध्ये मे महिनाअखेरपर्यंत परिस्थिती नियंत्रणाखाली येण्याची शक्यता नाही. यावर्षीची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा यापूर्वीच एका वर्षाने लांबणीवर टाकली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होईल. युरोपातील १२ देशांतील शहरांत स्पर्धा खेळली जाणार आहे. मात्र, युरोपातील सर्वच देशांत कोरोना विषाणूचा कहर आहे. जर्मनीतील बुंदेस्लिगा, इंग्लंडमधील प्रीमियर लीग, इटलीतील सेरी-ए, फ्रान्समधील लीग-१ आदी प्रमुख स्पर्धा वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. काही देश बंद दरवाजाआड स्टेडियमवर सामने घेण्याचा युक्तिवाद करत आहेत, पण प्रत्यक्ष फुटबॉल मैदानावर सोशल डिस्टन्सिंग साधण्याबाबत चुप्पी साधली जाते. फुटबॉल हा एकमेकांशी संपर्क येणारा खेळ आहे, त्यामुळे बंद दरवाजाआड खेळण्याचे नियोजन अनाकलनीय. युरोपातील फुटबॉल क्षेत्र कोरोना विषाणूमुळे पूर्णतः डबघाईस आलेले आहे. फुटबॉल मोसम अर्ध्यावर रोखण्यावाचून अन्य पर्यायच नाही. स्पेनने तयारी दर्शविली आहे, आता बाकी युरोपियन देशांतील फुटबॉल महासंघांना त्या दृष्टीने नियोजन करावे लागेल. कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला आहे, तरीही तेथे अजून फुटबॉल पूर्ववत झालेले नाही.

भारतात अकाली मोसमअखेर
भारतातही फुटबॉलमधील मोसम अकाली ठरला आहे. ३१ मेपर्यंत २०१९-२० मोसम संपविणे अखिल भारतीय फुटबॉल महासंघासाठी आवश्यक होते, पण ते शक्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशातील लीग समितीने मोसम अर्ध्यावरच थांबविण्याची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीस केली आहे. त्यावर शिक्कामोर्तब होणे हे आता औपचारिकता असेल. १४ मार्च रोजी भारतीय फुटबॉलमधील शेवटचा सामना खेळला गेला, आता तिथपासूनच देशातील फुटबॉल मोसमाची अखेर होईल. आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या चार फेऱ्या बाकी असताना कोलकात्याच्या मोहन बागान संघाने १६ लढतीतून ३९ गुण मिळवून विजेतेपद निश्चित केले होते, पण बाकी संघांची क्रमवारी ठरली नव्हती. आता मोहन बागान व्यतिरिक्त अन्य दहा संघांना बक्षीस रक्कम समप्रमाणात विभागून मिळेल. यंदा संघाची पदावनतीही टळली आहे. मात्र, द्वितीय विभाग लीग स्पर्धा घेण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची डोकेदुखी कायम आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या निर्देशानुसार त्यांना कमी कालावधीची स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. सब-ज्युनियर, ज्युनियर, एलिट लीग, १७ वर्षांखालील मुलींची खेलो-इंडिया स्पर्धा मिळून देशांतर्गत फुटबॉलमधील अंदाजे ५०० सामने बाकी आहेत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत, सर्व लढती आता रद्द होतील आणि २०२०-२१ मोसम नव्याने सुरू होणार आहे. 

`जीवनापेक्षा सामना मोलाचा नाही`
जगातील कोरोना विषाणूच्या भीषण विळख्याचा उल्लेख करून फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ''जीवनापेक्षा सामना मोलाचा नाही'' अशी प्रतिक्रिया अलीकडेच दिली. कोरोना विषाणूवर विजय मिळविणारे औषध अजून सापडलेले नाही. या जीवघेण्या विषाणूच्या धास्तीने सारे जग लॉकडाऊन झाले. त्या पार्श्वभूमीवर फुटबॉल सामने खेळणे म्हणजे खेळाडू, प्रेक्षक यांचे आरोग्य संकटात टाकण्यासारखेच आहे. त्यामुळेच जोखीम पत्करून सामना खेळविण्यास जागतिक फुटबॉल संघटनेचे प्रमुख तयार नाहीत. स्पर्धा रद्द झाल्यामुळे जगातील विविध देशांतील राष्ट्रीय फुटबॉल महासंघाना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याचे फिफाचे नियोजन आहे. नुकसानीमुळे धास्तावलेल्या फुटबॉल महासंघाना दिलासा मिळेल. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृतांचा आकडाही वाढतोय, तरीही जर्मनीत मे महिन्यात बुंदेस्लिगा स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्याची चाचपणी होत आहे. इन्फॅन्टिनो यांना हा प्रयोग मान्य नाही. जीवनाला धोका पोचविणारा सामना, स्पर्धा, लीग कवडी मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ''जर परिस्थिती १०० टक्के सुरक्षित नसेल, तर स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची सक्ती करणे बेजबाबदारपणाचे आहे,` असे सांगत इन्फॅन्टिनो यांनी संबंधित फुटबॉल संघटनांना इशाराच दिला आहे.

संबंधित बातम्या