महिला हॉकीपटूंचे चक दे इंडिया!

किशोर पेटकर
सोमवार, 27 एप्रिल 2020

क्रीडांगण
 

कोरोना विषाणू महामारीचे देशव्यापी लॉकडाऊन सर्वांसाठीच सक्तीचे ठरले. यामुळे साऱ्यांची जीवनशैलीच बदलून गेली. कोरोना विषाणू महामारीशी मुकाबला करताना देशवासीयांनी लॉकडाऊनच्या माध्यमातून कमालीचे धैर्य दाखविले, मात्र स्थलांतरीत मजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा कालावधी खूपच खडतर ठरला. पोटापाण्याचा प्रश्न गहन झाल्यामुळे महापलायनासारखे प्रसंगही उदभवले. या गरीबांच्या मदतीसाठी भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू सरसावल्या. त्यांनी आपल्यापरीने मदतीचा हातभार लावण्याचा कौतुकास्पद प्रयत्न हॉकी इंडियाच्या साथीत उचलला. त्यामुळे भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल, उपकर्णधार सवितासह साऱ्याजणी कौतुकास पात्र ठरल्या आहेत. भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे, आता ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर पडली आहे, त्यामुळे संघाला तयारीसाठी वाढीव कालावधी मिळाला आहे, पण लॉकडाऊनमुळे संघ बंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रावर अडकून पडला. बंदिस्त कालावधीचा सदुपयोग करण्याच्या हेतूने साऱ्या महिला हॉकीपटू एकवटल्या. हाती काम नाही, त्यामुळे खिशात पैसा नाही, दोन वेळच्या अन्नाची शाश्वती नाही, अशा परिस्थितीत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना मदत करण्याच्या हेतूने महिला हॉकीपटूंनी ऑनलाइन `फन फिटनेस चॅलेंज` उपक्रम सुरू केला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला. सुमारे एक हजार गरीब कुटुंबांसाठी अन्न आणि स्वच्छता साहित्य पुरविण्यासाठी फिटनेस चॅलेंज उपक्रमातून निधी गोळा करण्याचा संकल्प महिला हॉकीपटूंनी प्रत्यक्षात आणला. केवळ गरीबांना अन्न मिळावे हाच उपक्रमाचा उद्देश नाही, तर लोक जीवनशैलीत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सक्रिय राहावेत हाही हेतू बाळगत महिला हॉकीपटूंनी `फिट इंडिया`चा संदेशही दिला आहे.

खेळाडूंना गरिबीची जाणीव
भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंचे बालपणीचे आयुष्य खडतर आणि संघर्षमय ठरले आहे. गरिबीचे चटके त्यांनी सोसले आहेत. त्यामुळेच राणीच्या नेतृत्वाखाली महिला हॉकीपटू गरिब मजुरांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आपुलकीने पुढे आल्या. स्वतः राणी हिने बालपणी गरिबीचा आघात झेलला आहे. तिचे वडील हरियानातील शाहबाद येथे गाडा ओढण्याचे काम करत होते. घरची परिस्थिती तुटपुंजी, तरीही राणीने मोठ्या जिद्दीने हॉकीत कारकीर्द केली. ही २५ वर्षीय प्रतिभाशाली हॉकीपटू आपले हलाखीचे दिवस विसरलेली नाही. सारा देश लॉकडाऊनमध्ये असताना, राणीचे तिच्या वडिलांशी बोलणे झाले. त्यावेळी वडिलांनी तिला संघर्षमय जीवनाची आठवण करून दिली. त्यांनी राणीला सांगितले, की `तू हॉकी खेळली नसती आणि आम्हाला गरीबीतून वर काढले नसते, तर आज अन्नासाठी संघर्ष करणाऱ्या कितीतरी गरीब लोकांची जी स्थिती आहे, तीच आमचीही असती.` वडिलांचे शब्द ऐकून राणीच्या मनात कालवाकालव झाली. ती बेचैन झाली. कारण उपाशीपोटी राहणे म्हणजे काय हे राणीला पूरेपूर माहीत आहे. आज हॉकीमुळे भारतीय महिला संघातील गरीब मुलींना आरामदायी जीवन जगण्याचा मार्ग गवसला आहे, पण सारेच नशीबवान नसतात. त्यामुळे राणीने आपल्या सहकाऱ्यांना प्रेरित करत हॉकी इंडियाच्या सहकार्याने `फन फिटनेस चॅलेंज` उपक्रम सुरू केला. 

स्वच्छतेवरही भर
भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू सध्या मैदानावर घाम गाळून, अथक मेहनतीमुळे सधन झाल्या आहेत. समाधानाची बाब म्हणजे, यश, कीर्ती, पैसा यांची हवा त्यांच्या डोक्यात भिनलेली नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. क्रीडापटूंकडे सारा देश मोठ्या आशेने पाहत असतो. देशाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी करावी हीच अपेक्षा असते. खेळात हार-जीत असतेच. प्रत्यक्ष जीवनातही हेच चित्र आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे मानव झुकलेला आहे. त्यात गरिबांची खूपच फरफट झालेली आहे. त्यांची सोय करताना महिला हॉकीपटू फिटनेस चॅलेंज उपक्रमाद्वारे जमा केलेला निधी दिल्लीस्थित उदय प्रतिष्ठान या बिगरसरकारी संस्थेकडे सुपूर्त करण्यात येईल आणि त्याचा वापर ठिकठिकाणचे रुग्ण, झोपडपट्टीतील रहिवासी, स्थलांतरित मजूर यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल. अन्नधान्य पुरविण्याव्यतिरिक्त निधीचा वापर साबणे आणि स्वच्छताविषयक साहित्य पुरविण्यासाठीही करण्यात येईल. कारण कोरोना विषाणू महामारीत स्वच्छतेला अतीव महत्त्व असल्याचे साऱ्यांनीच जाणले आहे. पैशांअभावी गरिबांना अन्नधान्याची व्यवस्था करता येत नाही, त्यांच्यासाठी स्वच्छताविषयक साहित्य विकत घेणे खूपच दूरचे आहे. कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी अजून औषध आलेले नाही, स्वच्छता हाच सध्या योग्य उपाय ठरला आहे. भारताच्या महिला हॉकीपटूंनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, मैदानाबाहेरही बाजी मारली.

संबंधित बातम्या