स्वच्छ बॅडमिंटनसाठी सदिच्छादूत

किशोर पेटकर
बुधवार, 6 मे 2020

क्रीडांगण

प्रत्येक खेळात मुद्दामहून खिलाडूवृत्ती विसरलेले काही खेळाडू जिंकण्यासाठी फसवणूक, हातचलाखी यांची मदत घेतात. पकडले जाण्याची शक्यता फारच असते, तरीही ते कलंकित होतात. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतात. त्यांना जिंकण्यासाठी शॉर्टकट हवे असतात. मात्र यामुळेच निलंबन होते, बंदी येते, नाचक्की होते, तरीही हे क्रीडापटू शहाणे होत नाहीत. अव्वल ठरण्याच्या ध्येयापोटी वेडेपिसे होत उत्तेजक द्रव्य सेवन करतात. बंदी असलेल्या औषधांचे सेवन करू नये हे माहीत असूनही हे क्रीडापटू अरिष्टास सामोरे जातात. विविध खेळांचे महासंघ क्रीडा क्षेत्रातील वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. खेळातील डोपिंग, फसवणूक यांच्यापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी क्रीडापटूंचे प्रबोधन करतात. जागतिक बॅडमिंटन महासंघ जगभरात स्वच्छ आणि प्रामाणिक बॅडमिंटनसाठी कटिबद्ध आहे. त्यातूनच `आय एम बॅडमिंटन` या मोहिमेअंतर्गत सदिच्छादूत म्हणून बॅडमिंटनपटूंची नियुक्ती केली जाते. भारताची जागतिक विजेती अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याकडे अलीकडेच या स्वच्छ आणि प्रामाणिक बॅडमिंटन उपक्रमाची जबाबदारी आली आहे. सिंधूसह जगभरातील अन्य बॅडमिंटनपटू जागतिक महासंघाच्या मोहिमेत सहभागी असतील. २४ वर्षीय सिंधूने जागतिक बॅडमिंटनमध्ये ठसा उमटविला आहे. महान बॅडमिंटनपटूंमध्ये तिची गणना होते. ती ऑलिंपिक रौप्यपदक विजेती आहे. केवळ भारतवासीयच नव्हे, तर जगभरातील बॅडमिंटनप्रेमी तिच्याकडे आदर्शवत नजरेने पाहतात. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने तिला सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य दिले हे स्पष्टच आहे. सिंधूने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली असून बॅडमिंटन खेळाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची संधी लाभत आहे, अशी तिची भावना आहे. 

सचोटीस प्राधान्य
क्रीडा मैदानावर जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अथक मेहनतीबरोबरच त्यागही करावा लागतो. सामना निकाल निश्चिती, म्हणजेच मॅचफिक्सिंगने क्रीडा जगताचे मोठे नुकसान केले आहे. मॅचफिक्सिंगमुळे खिलाडूवृत्तीचा आत्माच मृत होतो. क्रीडाप्रेमींवरही अन्याय होतो. हा मुद्दा पकडून जागतिक बॅडमिंटन महासंघाने पाच वर्षांपूर्वी सचोटी विभागाची स्थापना केली. बॅडमिंटनमधील कुप्रवृत्तींना पायबंद करणे हे या सचोटी विभागाचे मुख्य काम आहे. या विभागामार्फत आता सिंधूसह मिचेल ली (कॅनडा), झेंग सी वेई व हुआंग या क्विओंग (चीन), जॅक शेफर्ड (इंग्लंड), व्हालेस्को क्नॉब्लॉच (जर्मनी), चॅन हो युएन (हाँगकाँग) हे खेळाडू स्वच्छ आणि प्रामाणिक बॅडमिंटनसाठी झटणार आहेत. या खेळाडूंद्वारे होणाऱ्या प्रचार मोहिमेने संपूर्ण बॅडमिंटन जगतात खेळातील अखिलाडूवृत्तीबाबत जागरूकता निर्माण होईल, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाचे ठाम मत आहे. खेळ सचोटीने खेळल्यास लोकप्रियताही वाढते, जागतिक बॅडमिंटन महासंघाला सदिच्छादूतांमार्फत हेच काम करायचे आहे. २०१६ पासून या मोहिमेत अग्रभागी राहिलेल्यांत जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष पौल-एरिक हायर, बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन खेळाडू समितीचे प्रमुख रिचर्ड पेरॉट यांच्यासह साईना नेहवाल, व्हिक्टर एक्सेलसन, हेंड्रा सेतियावान, ख्रिस्तिना पेडरसन, चेन लाँग, मिसाकी मात्सुटोमो आणि अकाया ताकाहाशी या नावाजलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.

प्रामाणिक खेळ हा हक्क
प्रत्येक खेळाडूस स्वच्छ आणि प्रामाणिक खेळात भाग घेण्याचा हक्क आहे, हे जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष पौल-एरिक हायर यांचे मत आहे. हल्लीच्या काळात जागतिक पातळीवरील बॅडमिंटनपटू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी ठरल्याची उदाहरणे आहेत. काहींनी बंदी असलेली, अयोग्यरीतीने शारीरिक क्षमता वाढविणारी औषधे अनवधानाने घेतली, तर काहींनी जाणूनबुजून. अधिक पैशांच्या मोहाने सामना निकाल निश्चिती होते. चोरी पकडण्याची भीती असूनही चोरी केली जाते, त्यात एकदा सहिसलामत सुटल्यास खेळाडूंचे मनोधैर्य वाढते. मग इतर खेळाडूंही या वाईट प्रवृत्तीच्या नादी लागतात. विशेषतः युवा क्रीडापटू या फसव्या मोहजाळ्यात फसण्याची दाट शक्यता असते. कारण नवोदित खेळाडूंपाशी अनुभवाची वानवा असते. त्यामुळे युवा क्रीडापटू चुकीच्या  मार्गाने जाण्याचा संभव जास्त असतो. नवोदित क्रीडापटूंना जाळ्यात ओढण्यासाठी, त्यांना चुकीची वाट दाखविणारे महाभाग सर्वत्र विखुरलेले असतात. ते फक्त संधीची वाट पाहतात, सावज टिपण्यासाठी टपून बसलेले असतात. हे लोक क्रीडा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही टेहळणी करताना दिसतात. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात क्रीडापटूंना सावध पावले टाकावी लागतात. त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवेच. सदिच्छादूत नियुक्त केलेले बॅडमिंटनपटू उदयोन्मुख खेळाडूंत प्रबोधन करणार आहेत, जेणेकरून बॅडमिंटमधील फसवणूक, गैरप्रकार आणि उत्तेजक द्रव्य सेवनविरोधातील जागृती वाढली जाईल. जागतिक पातळीवरील `आय एम बॅडमिंटन` मोहीम राबविण्यामागचा हाच मुख्य उद्देश आहे. 

संबंधित बातम्या