प्रीमियर लीगच्या अर्थकारणास धक्का

किशोर पेटकर
बुधवार, 6 मे 2020

क्रीडांगण
 

जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा ही इंग्लंडच्या प्रीमियर लीगची ओळख आहे. मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, चेल्सी, लिव्हरपूल, अर्सेनल हे स्पर्धेतील नावाजलेले संघ आहेत. एकूण २० संघांमध्ये स्पर्धा खेळली जाते. मैदानावर चुरस अनुभवायला मिळतेच, त्याचवेळी पैशांची उधळणही अनुभवायला मिळते. खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी संघ व्यवस्थापन तिजोरीवरील पकड सैल सोडतात. इतर युरोपियन देशांतील क्लब व्यवस्थापनाच्या अर्थकारणास प्रीमियर लीगमधील क्लब जबरदस्त टक्कर देतात. विशेषतः स्पेन आणि इंग्लंडमधील संघांत खेळाडू करारबद्ध करण्यासाठी नेहमीच चढाओढ असते. मात्र, कोरोना विषाणू महामारी आणि त्यामुळे उद्‌भवलेले लॉकडाऊन यामुळे प्रीमियर लीगचे आर्थिक गणित बिघडणार आहे. कोविड-१९ महामारीमुळे इंग्लिश प्रीमियर लीग स्थगित आहे. स्पर्धा पुन्हा सुरू होण्याबाबत स्पष्ट संकेत नाहीत. मोसम पूर्ण झाला नाही, तर अनेक क्लबचे अर्थकारण कोसळणार हे स्पष्टच आहे. त्याचा परिणाम खेळाडूंच्या ट्रान्सफर (हस्तांतरण) प्रक्रियेवर होऊ शकतो. मोठ्या रकमेचे करार करण्यात धन्यता मानणाऱ्या क्लब व्यवस्थापनास निधीची कमतरता जाणवण्याचे संकेत आहेत. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पैशांची मोठी उलाढाल होते. मागील चार मोसमात विविध प्रीमियर लीग क्लब यांनी खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी तब्बल एक अब्ज पौंड (१.३ अब्ज अमेरिकन डॉलर) रकमेची उधळण केली होती. टेलिव्हिजन करारामुळेही क्लबांची संपत्ती फुगायची. खेळाडूही मौजमस्तीत असायचे, पण आता कोरोना विषाणूमुळे युरोपात मंदीची लाट पसरू शकते, असे अर्थतज्ज्ञांचे कयास आहेत, त्याचा फटका इंग्लंडमधील श्रीमंत लीगलाही बसू शकतो. 

खेळाडूंचे मूल्य घसरणार
प्रीमियर लीग स्पर्धा बेमुदत स्थगित आहेत. मे महिन्यात स्पर्धा सुरू होण्याबाबत शक्यता नाही. जूनच्या मध्यास स्पर्धा पूर्वरत सुरू होऊ शकते असा सूर उमटतो, पण त्यात ठोस काहीच नाही. ब्रिटिश प्रशासन कोविड-१९ महामारीबाबत खूपच गंभीर आहे. लॉकडाऊन निर्बंधामुळे मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्यावर ब्रिटनमध्ये बंदी आहे. त्यामुळे लंडन मॅरेथॉनच्या आयोजकांना शर्यत ४ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकावी लागली आहे. स्टेडियमवरील जमावबंदी टाळण्यासाठी बंद दरवाजाआड रिकाम्या स्टेडियमवर उर्वरित प्रीमियर लीग खेळविण्याची सूचनाही होत आहे. ब्रिटनमधील जमावबंदी कायम राहिल्यास प्रीमियर लीग सामने बंद दरवाजाआड खेळविणे हाच पर्याय राहील. तसे झाल्यास सर्व संघांना गेट कलेक्शनला मुकावे लागेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रीमियर लीगमधील संघाचे प्रमुख पुरस्कर्ते असलेल्या हवाई वाहतूक आणि जुगार कंपन्यांना कोविड-१९ च्या शटडाऊनमुळे मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक महसुलावर अंकुश येऊ शकतो. प्रीमियर लीग क्लबला येत्या काही महिन्यांतील वेतन भरपाई त्रासदायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर विविध संघातील महागड्या फुटबॉलपटूंच्या मूल्यात घरसण होणार आहे. मोसम संपल्यानंतर नव्या मोसमासाठी खेळाडू करार प्रक्रियेवेळी फुटबॉलपटूंची घसरलेली मूल्य रक्कम उघडकीस येईल. काही क्लब वेतनकपातीसाठी प्रयत्नशील आहेत. तर काही क्लबनी स्टाफला वेतनकपात सुचविली आहे. 

दिवाळखोरीचा धोका
कोविड-१९ महामारीमुळे ब्रिटनचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था नक्कीच हेलकावे खाणार हे जाणकारांचे मत आहे. तसे झाल्यास प्रीमियर लीगमधील क्लबांसमोर निश्चितच दिवाळखोरीचा धोका असेल. प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड संघाचा माजी कर्णधार गॅरी नेव्हिल याने ट्रान्सफर रकमेवर प्रतिबंध लादण्याची सूचना केली आहे. लीगमधील खालच्या स्तरावरील क्लबसाठी हे प्रतिबंध धोक्याची घंटा ठरू शकते. कारण खेळाडूंच्या ट्रान्सफर शुल्काद्वारे मिळणारा निधी खालच्या लीगमधील संघ आपला खर्च भरून काढण्यासाठी वापरतात. ट्रान्सफर शुल्कावर प्रतिबंध आल्यास हे क्लब तोट्यात येतील. फुटबॉलमधील अर्थकारणविषयक तज्ज्ञांच्या मते, आर्थिक मंदीत चांगल्या खेळाडूंनाही अतिसामान्य रक्कम मिळण्याची शक्यता आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये सध्या अनिश्चितता भरपूर असल्याच्या कारणास्तव क्लबांसमोर दिवाळखोरी आणि ट्रान्सफर नियोजन ठप्प होण्याचा धोका असल्याचा सूर सध्या उमटत आहे. २०१९-२० मोसम पूर्ण झाला नाही, तर प्रीमियर लीगचे आर्थिक नियोजन विस्कळित होईल. त्याचे दूरगामी परिणाम केवळ इंग्लंडमधीलच नव्हे, तर जागतिक फुटबॉलवरही होतील. स्पेनमधील ''ला लिगा'' स्पर्धाही पूर्ण न होण्याची परिस्थिती आहे. ही स्पर्धासुद्धा महागडी आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या युरोपातील देशांत स्पेनचा क्रम वरचा आहे. स्पॅनिश फुटबॉल संघांनाही आर्थिक मंदीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. इंग्लंड आणि स्पेनमधील फुटबॉल संघांचे अर्थकारण गडगडल्यास युरोपातील व्यावसायिक फुटबॉलचा आर्थिक वेग कमालीचा मंदावू शकतो. 

संबंधित बातम्या