युरोपातील फुटबॉलमध्ये नवी पहाट

किशोर पेटकर
शुक्रवार, 29 मे 2020

क्रीडांगण
 

कोरोना विषाणू महामारीमुळे काळवंडलेल्या युरोपातील फुटबॉल मैदानावर अखेर नवी पहाट उगवली आणि आशेचे किरण सर्वदूर पसरले. जर्मनीतील नावाजलेल्या बुंडेस्लिगा फुटबॉल स्पर्धेने दोन महिन्यांच्या सक्तीच्या निलंबनानंतर पुनरागमन केले. जर्मन सरकारचे खंबीर पाठबळ लाभल्यामुळेच आरोग्यविषयक कडक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करत जर्मन फुटबॉल लीगने नव्या उमेदीने स्पर्धेस पुन्हा सुरुवात केली. जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मेर्केल यांनी खंडित जर्मन लीग स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. कोरोना विषाणू महामारीमुळे साऱ्या जगातील क्रीडा मैदाने ओस पडलेली असताना, बुंडेस्लिगा सुरू होत असल्याने ही स्पर्धा खूपच प्रकाशझोतात आली असून साऱ्यांनीच या स्पर्धेची दखल घेतली. इंग्लंडमधील प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा, इटलीतील सेरी ए या स्पर्धांचा विचार करता, बुंडेस्लिगा लोकप्रियतेच्या बाबतीत मागेच असते. कोविड-१९ महामारीचा मुकाबला करताना जर्मनीने धैर्य दाखविले. त्याचे प्रतिबिंब तेथील फुटबॉल मैदानावर उमटत आहे. कोरोना विषाणूच्या धास्तीत असलेल्या जगभरात बुंडेस्लिगाच्या पुनरागमनाचे जोरदार स्वागत झाले, पण साशंकता कायम आहे. धोका टळलेला नाही. वाट अजूनही काटेरीच आहे. स्पर्धेस पुन्हा सुरू होण्यास काही दिवस बाकी असताना, बुंडेस्लिगाच्या द्वितीय विभागातील डायनॅमो ड्रेस्डेनचे दोघेजण कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह ठरले, त्यामुळे संपूर्ण संघाचेच १४ दिवस विलगीकरण करण्यात आले. बुंडेस्लिगातील प्रत्येक संघाला आचारसंहिता काटेकोरपणे पाळावी लागत आहे. लीगमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव आणि लागण होऊ नये याची दक्षता घेतली जातेय, त्यासाठी ५१ पानांची विशेष आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. उपाययोजना सूची तयार करताना साऱ्या बाबींचा सूक्ष्मपणे विचार करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूस पिटाळण्यासाठी
बुंडेस्लिगाने पुनरागमन करताना कोरोना विषाणूस पिटाळण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे, पण कोविड-१९वर पूर्ण विजय मिळविला असा याचा अर्थ होत नाही. जर्मनीतही इतर युरोपिय देशांप्रमाणे कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने झाला, मात्र तेथील प्रशासनाने ही साथ मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविणार नाही याची दक्षता घेतली. परिणामकारक उपायांमुळे जर्मनीने या महामारीमुळे होणारे नुकसान आटोक्यात आणण्यात यश मिळविले. बुंडेस्लिगासाठी तयार केलेल्या आचारसंहितेवरून आरोग्यविषयक सुरक्षा उपाययोजनांबाबत जर्मनी किती जागरूक आहे हे स्पष्ट झाले. बुंडेस्लिगाचे बाकी सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होतील. दोन्ही संघातील खेळाडूंसह फक्त ३०० जणांनाच सामन्यावेळी स्टेडियममध्ये प्रवेश असेल. सामन्याच्या कालावधीत चाहत्यांनी स्टेडियमजवळ गर्दी केली, तर लीगच रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चाहत्यांना आपल्या संघाची कामगिरी फक्त दूरचित्रवाणीद्वारे अनुभवायला मिळेल. बुंडेस्लिगा सुरू असताना खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफसह संबंधितांची आठवड्यातून दोनदा चाचणी होईल. एखादा पॉझिटिव्ह सापडल्यास नियमानुसार विलगीकरण निश्चित असेल. संघाचा प्रवास असताना बसमध्ये दोघाजणांत किमान दीड मीटरचे अंतर पाळणे सक्तीचे आहे, ड्रेसिंग रूममध्येही समाज अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मैदानावर खेळण्याव्यतिरिक्त खेळाडूंच्या चेहऱ्यावर मास्क बंधनकारक असेल. निर्जंतुकीकरणावर खूपच भर आहे. मैदानावर गोल केल्यानंतर खेळाडूंत जल्लोष अजिबात नसेल, यशाच्या आवेगाने एकमेकांना अलिंगनही देणे व्यर्ज्य आहे. फक्त कोपर स्पर्श करून आनंद व्यक्त करण्यास मुभा आहे. कोरोना विषाणूमुळे आगळेच फुटबॉल मैदानावर अवतरले आहे.

पुनरागमनामागे अर्थकारणही
 कडक उपाययोजनांत बुंडेस्लिगा पुन्हा सुरू झाली. यामागे निव्वळ फुटबॉलप्रेमच नाही, तर प्रचंड आर्थिक उलाढालही आहे. त्यामुळेच कोरोना विषाणू संकटाचे सावट असूनही बुंडेस्लिगा सुरू करण्याचे धाडस जर्मन फुटबॉल लीगने दाखविले. काळजी, चिंता आहेच, पण दूरचित्रवाणी हक्काद्वारे मिळणाऱ्या अंदाजे ३२ कोटी डॉलर मिळकतीवर जर्मन फुटबॉल लीगला पाणी सोडायचे नव्हते. नुकसान टाळण्यासाठी बुंडेस्लिगाने मुसंडी मारली. त्यांच्या या धैर्यामुळे आता प्रीमियर लीग, ला लिगा, सेरी ए या स्पर्धांनाही आशा वाटू लागली आहे. लीग पुन्हा सुरू करण्यावरून इटली सरकार आणि तेथील व्यावसायिक क्लब यांत संघर्ष होत आहे. कोरोना विषाणूची युरोपात सर्वाधिक झळ इटलीस बसली. कोरोनावर लस मिळत नाही, तोवर इटलीतील फुटबॉल स्थगित ठेवण्यास प्राधान्यक्रम मिळत आहे, मात्र आर्थिक नुकसानीमुळे तेथील क्लबना हा विचार पटत नाही. अर्थकारण ध्यानात ठेवून इंग्लंड, स्पेनमधील लीग सुरू करण्याबाबत चाचपणी होत आहे, पण तेथील सरकार तेवढे सकारात्मक नाही. कोरोना विषाणूच्या प्रलयात बुंडेस्लिगाने मार्ग दाखविला आहे, वाटचाल कितपत यशस्वी ठरतेय याकडेही जगाचे लक्ष आहे.

संबंधित बातम्या