क्रिकेटमध्ये लाळेला प्रतिबंध

किशोर पेटकर
सोमवार, 1 जून 2020

क्रीडांगण
 

तोंडातील लाळ ही बहुउपयोगी, शारीरिक कारणास्तव ती हवीच असते. क्रिकेटमध्ये गोलंदाजांनाही लाळेचा भारी उपयोग होतो. चेंडूच्या लकाकीसाठी गोलंदाज किंवा क्रिकेटपटू लाळेचा वापर सर्रासपणे करताना पाहणे हे नित्याचेच, पण त्यात आता खंड पडणार आहे. कारण, कोरोना विषाणूच्या धास्तीने क्रिकेट मैदानावर लाळेच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीने केली आहे. भारताचे माजी कर्णधार, महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हे या समितीचे प्रमुख आहेत. स्वतः खेळत असताना चेंडूवर त्यांनीही लाळेचा वापर केलेला आहे, पण आता केवळ त्यांनाच नव्हे, तर आयसीसीलाही याच लाळेची भीती वाटत आहे. आयसीसीचे वैद्यकीय सल्लागार समितीचे प्रमुख पीटर हारकोर्ट यांच्या अहवालाने क्रिकेटची शिखर संस्था सावध झाली आहे. कोरोनाचे विषाणू थुंकीमार्फत संक्रमण करू शकतात, असे मत हारकोर्ट यांनी मांडले आहे. सामना सुरू असताना एखाद्या खेळाडूने थुंकी लावलेला चेंडू दुसरा खेळाडू किंवा गोलंदाज हाताळतो. दुसरा खेळाडू थुंकी लावलेला चेंडू स्वतःच्या पँटवर किंवा टी-शर्टवर घासत असतो. सामन्यात असे वारंवार घडत असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला थुंकी लावणे अतिशय धोकादायक असल्याचे हारकोर्ट यांना वाटते व त्यांनी तसा अहवाल वैद्यकीय सल्लागार या नात्याने आयसीसीला सादर केला. साथीच्या महामारीने जगभरात घातलेला धुमाकूळ पाहून आयसीसीनेही तातडीने पावले उचलली आणि कुंबळे यांच्या समितीने लाळेच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली. चेंडूला लकाकी आणण्यासाठी अवैध मार्गांचा उपयोग झालेला आहे. बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेटमध्ये खेळाडूंवर कारवाईही झाली. मात्र, चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करणे हे वैध मानले जाते, शतकी इतिहास असलेल्या या खेळात लाळेचा वापर अधिकृत होता, पण आता त्यात खंड पडणार आहे. थुंकीद्वारे कोरोना विषाणू फैलावतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच क्रिकेटपटूंच्या आरोग्याबाबत आयसीसी दक्ष आहे. जागतिक आरोग्य संस्थेनुसार (डब्ल्यूएचओ), कोविड-१९ विषाणू लोकांमध्ये प्रामुख्याने श्वसनातील थेंबाद्वारे आणि संपर्क मार्गाने प्रसारित होतो. त्यामुळेच चेंडूवरील लाळेमुळे कदाचित कोविड-१९चा संसर्ग वाढीस लागण्याची भीती आयसीसीला वाटत आहे.

घामाला पसंती
अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट समितीने लाळेला प्रतिबंध करताना, चेंडूच्या लकाकीसाठी शरीरावरील घामाचा वापर करण्यास मान्यता दर्शविली आहे. गोलंदाज स्विंगसाठी चेंडूला लकाकी देण्यास प्राधान्यक्रम देतो. सामन्यातील चेंडू जुना झाला, की स्विंगसाठी लाळ किंवा घामाचा वापर हमखास होतो. आता फक्त घामाचा वापरच अधिकृत असेल. आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीचे हारकोर्ट यांच्या अभ्यासानुसार, घामातून कोविड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अजिबात नाही. त्यामुळे मैदानावर चेंडूच्या लकाकीसाठी गोलंदाज व खेळाडूंनी घामाचा वापर केल्यास ते आरोग्याला धोकादायक नसल्याचा अहवाल आहे. त्यामुळेच लाळेला नकार, तर घामाला होकार मिळाला आहे. मार्च महिन्यापासून जागतिक क्रिकेट खंडित आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे, पण वाटेत कोरोना विषाणू नामक अक्राळविक्राळ राक्षस उभा आहे. त्याच्या संक्रमणापासून खेळाडूंचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधक उपाय हवेच. जागतिक आरोग्य संस्थेच्या निर्देशानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. कोरोना विषाणूचा कहर कमी झाल्यानंतर क्रिकेट पुन्हा मैदानावर अवतरणार आहे, पण त्यानंतर पूर्वी इतकी सहजता क्रिकेट स्टेडियमवर कमीच अनुभवयाला मिळेल. कदाचित काही महिने बंद दरवाजाआडही क्रिकेट अपेक्षित आहे. `सध्या आपण अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करत आहोत. सुरक्षित वातावरणात क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही हे हंगामी बदल सुचवत आहोत. खेळ आणि खेळाशी संबंधित असलेले सर्व जण सुरक्षित रहावेत हाच हेतू आहे,` असे कुंबळे यांनी नमूद केले आहे. यावरून क्रिकेट पुन्हा सुरू झाले, तर ते सुरक्षा कवच घेऊनच मैदानावर येईल हे स्पष्टच आहे.

गोलंदाजांची अडचण
चेंडूच्या लकाकीसाठी लाळेचा वापर करणे जगभरातील गोलंदाजांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे पुन्हा क्रिकेट सुरू झाल्यानंतर लाळेच्या वापराची जुनी सवय कशी रोखावी याबाबत विशेषतः वेगवान गोलंदाजांची अडचण आहे. काहींनी जाहीरपणे त्याची वाच्यता केली आहे. जुना चेंडू स्विंग करण्यासाठी कितीतरी अनधिकृत प्रयोग केले गेले, पण लाळेला अटकाव नव्हता. आता पुढील कालावधीत जुन्या चेंडूला लकाकी आणण्यासाठी गोलंदाज व खेळाडूंना घामाचाच सक्तीने वापर करावा लागेल. नेहमीनुसार जिभेला बोटे लावून लाळ न वापरण्याची सवय मोडण्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतील. 

संबंधित बातम्या