प्रतीक्षा स्पर्धांच्या पुनरागमनाची

किशोर पेटकर
शुक्रवार, 19 जून 2020

क्रीडांगण
 

कोविड-१९ लॉकडाउननंतर देश टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील क्रीडा मैदाने कधी गजबजणार याची उत्सुकता आहे. सर्वाधिक जास्त प्रतीक्षा आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पुनरागमनाची आहे. मात्र, क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार सावध आहे. मानक परिचालन सूचना (एसओपी) नियमावलीची अंमलबजावणी करत शरीरसंपर्क नसलेल्या खेळांच्या सरावास मुभा आहे, पण त्याने अजून जोर पकडलेला नाही. प्रत्येकजण साशंक आहे. देशातील कोराना विषाणू बाधितांची वाढती संख्या पाहता, क्रीडा स्पर्धा किंवा स्टेडियमवर जनसंमेलनास इतक्या लवकर परवानगी मिळण्याची शक्यता धूसरच आहे. स्पर्धा सुरू झाल्याच, तरी युरोपातील फुटबॉल लीगप्रमाणे बंद दरवाजाआड रिकाम्या स्टेडियममध्ये सामने होऊ शकतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांनी कोरोना विषाणूवर लस मिळाल्यानंतरच देशातील क्रिकेट पूर्ववत होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. कोविड-१९ मुळे २०२० मधील आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची पाळी आली, तर बीसीसीआयच्या तिजोरीवर त्याचा आर्थिकदृष्ट्या दूरगामी प्रतिकुल परिणाम होण्याचे संकेत आहेत. क्रिकेटपटूंच्या आरोग्याबाबत गांगुली धोका पत्करण्यास तयार नाहीत, त्यामुळे २०२०-२१ मधील देशांतर्गत मोसमही उशिराच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

आयओए अध्यक्ष आशावादी
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा आशावादी आहे. देशातील क्रीडा स्पर्धांचे ऑक्टोबरपासून पुनरागमन शक्य असल्याचे त्यांना वाटते. एका वेबिनार संमेलनात बोलताना त्यांनी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. आयओएचे प्रमुख या नात्याने बत्रा यांना देशातील क्रीडाक्षेत्राची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आला, तर येत्या पाच महिन्यांत देशात क्रीडा स्पर्धांची चाहूल अनुभवायला मिळेल, असे बत्रा यांनी सूचित केले आहे. आरोग्य तपासणीनंतर, एकंदरीत ऑक्टोबरपासून शरीरसंपर्क नसलेल्या खेळांच्या स्पर्धा सुरू झाल्या, तरी त्या रिकाम्या स्टेडियममध्ये होतील हे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने आयओए काही विभागीय केंद्रांची स्पर्धांसाठी चाचपणी करत आहे. सारे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, क्लबचे कर्मचारी यांची योग्य पद्धतीने चाचणी घेऊन बंद दरवाजाआड सामने खेळविणे शक्य आहे, हे जर्मनीतील फुटबॉल लीगने सिद्ध केले आहे. भारतात शरीरसंपर्क नसलेल्या खेळांसाठी एसओपी लागू आहे, पण शरीरसंपर्क खेळासाठी अजून उपाययोजना झालेली नाही. खेळाडूंना मैदानावर खेळायचे आहे. स्पर्धा-सरावात व्यस्त राहणारे क्रीडापटू लॉकडाउनमुळे कंटाळले आहेत. कारण घरी केलेला सराव आणि मैदानावरील सराव यात मोठा फरक आहे हे सारेच जाणतात. स्पर्धांना परवानगी मिळण्यापूर्वी, खेळाडूची शारीरिक क्षमतेची चाचणीही आवश्यक असेल. मुलभूत भार ते मध्यम भार आणि नंतर अधिक भार पेलण्यासाठी खेळाडूंना टप्प्याटप्प्याने वाटचाल करावी लागेल आणि पूर्ण क्षमता गाठण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात, असे बत्रा यांना वाटते.
   
पुरस्कर्त्यांचे पाठबळ लक्षणीय
खेळ आणि क्रीडापटूंच्या प्रगतीत पुरस्कर्त्यांचे पाठबळ लक्षणीय ठरते. जोपर्यंत कोरोना विषाणूचा आरोग्य आणि आर्थिक बाबतीत प्रभाव कायम राहील, तोपर्यंत येत्या वर्षभरात ऑलिंपिक खेळांना नवे खासगी पुरस्कर्ते मिळणे कठीण असेल, असे मत नरिंदर बत्रा यांनी व्यक्त केले आहे. पुरस्कर्त्यांबाबत क्रीडा क्षेत्रासाठी भावी काळ आव्हानात्मक असेल हे त्यांना सुचवायचे आहे. सध्याच्या बहुतेक पुरस्कर्त्यांचे करार दीर्घकालीन आहेत. त्यामुळे पुढील वर्षीपर्यंत लांबलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत क्रीडापटूंना चिंता करण्याचे कारण नसेल. मात्र, त्यानंतर काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी उपाययोजना आवश्यक ठरेल. याकामी संबंधित खेळांच्या राष्ट्रीय महासंघांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल. मोठी आर्थिक तूट असल्यास खासगी पुरस्कर्ते खुल्या दिलाने मदतीसाठी पुढे येतील का हेसुद्धा पाहावे लागेल. बत्रा यांनी देशातील क्रीडापटूंना चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे, कारण केंद्र सरकारने टोकियो ऑलिंपिक आणि त्यानंतरही पाठिंब्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. २०२१ मध्ये टोकियोमधील ऑलिंपिक स्पर्धा, नंतर २०२२ मध्ये बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, चीनमधील हँगझोऊ येथे होणारी आशियायी क्रीडा स्पर्धा यासाठी तयारी करणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पाठीवर केंद्र सरकारच्या मदतीचा हात असेल, तसेच केंद्राकडून आश्वासन असल्याने आयओए सुखावली आहे. केंद्र सरकारकडून क्रीडा मैदानावर घाम गाळण्यासाठी निधी उपलब्ध असल्यामुळे भारतीय क्रीडापटूंसमोर आशेचा किरण आहे.

संबंधित बातम्या