बायर्न म्युनिकचा धडाका

किशोर पेटकर
बुधवार, 1 जुलै 2020

क्रींडागण

कोरोना विषाणूने युरोपात प्रवेश केल्यानंतर, जर्मनीत धोक्याची घंटा वाजली. कोविड-१९ चा जर्मनीत फैलाव झाला, पण दक्ष प्रशासनामुळे मृतांची संख्या आणि विषाणूचा प्रसार रोखण्यात यश आले. त्यामुळे युरोपातील क्रीडाजगत ठप्प असताना, व्यावसायिक फुटबॉलमधील क्लब लीग स्पर्धा पुन्हा सुरू करणे जर्मनीला सर्वप्रथम शक्य झाले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बुंडेस्लिगा ही अव्वल जर्मन फुटबॉल लीग आरोग्यविषयक कडक उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आचरणासह कार्यरत झाली. स्टेडियमच्या बंद दरवाजाआड फुटबॉलमधील चढाओढ रंगली, जोडीला फुटबॉलप्रेमींचा ओसंडून वाहणारा पाठिंबा नव्हता, पण खेळाडूंचा उत्साह कायम होता. विशेष बाब म्हणजे, बुंडेस्लिगा पुन्हा सुरू झाल्यानंतर स्पर्धेत महामारीचा अडथळा आला नाही. सारे काही अतिशय काटेकोर आणि नियोजनबद्ध ठरले. रिकाम्या स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत धडाका राखत बायर्न म्युनिक संघाने सलग आठवे बुंडेस्लिगा विजेतेपद निश्चित केले. स्पर्धेच्या दोन फेऱ्या बाकी असताना जवळचा प्रतिस्पर्धी बोरुसिया डॉर्टमंडवर १० गुणांची आघाडी राखत बायर्न म्युनिकने अव्वल स्थान अबाधित राखले. २०१२-१३ पासून सलगपणे बुंडेस्लिगा जिंकण्याचा मान जर्मनीतील नावाजलेल्या संघाने मिळविला. एकंदरीत त्यांनी तिसाव्यांदा जर्मन लीग जिंकण्याचा पराक्रम साधला आहे, जो विक्रमच आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर सुरू झालेल्या बुंडेस्लिगात बायर्न म्युनिकने लागोपाठ विजय मिळवत अग्रस्थान भक्कम राखले. लॉकडाउनमुळे सक्तीच्या विश्रांतीस सामोरे गेलेल्या खेळाडूंच्या कामगिरीत पूर्वीचाच जोश पाहायला मिळाला, त्यांची तंदुरुस्ती वाखाणण्याजोगी ठरली. बायर्न म्युनिकच्या खेळाडूंनी सफाईदार खेळ करत प्रतिस्पर्धी संघ धक्कादायक निकाल नोंदविणार नाहीत याची दक्षता घेतली.

नव्या प्रशिक्षकांची चुणूक
 निको कोवाच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना बायर्न म्युनिक संघ २०१९-२० मोसमात बुंडेस्लिगा करंडक पटकावण्याबाबत साशंकता होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या बलाढ्य संघाला एईनट्रॅक्ट फ्रँकफर्टकडून १-५ असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला, तेव्हा बायर्न संघ गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर घसरला होता. या कामगिरीमुळे निको कोवाच यांना गाशा गुंडाळावा लागला. प्रशिक्षक या नात्याने त्यांच्या १६ महिन्यांच्या कारकिर्दीला बायर्नच्या व्यवस्थापनाने पूर्णविराम दिला. त्यानंतर हान्सी फ्लिक यांची संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आणि नंतर एप्रिलमध्ये त्यांचा करार २०२३ पर्यंत वाढविण्यात आला. ५५ वर्षीय अनुभवी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली बायर्न म्युनिकची कामगिरी बहरली आणि त्यांनी विजेतेपदाच्या दिशेने घोडदौड सुरू केली. बुंडेस्लिगा विजेतेपद निश्चित केलेल्या बायर्न म्युनिकने जर्मन कप स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली आहे. युरोपियन चँपियन्स लीगमधील ते पाच वेळचे माजी विजेते आहेत, यंदा पुन्हा युरोपातील अव्वल क्लब स्पर्धेत श्रेष्ठत्व मिळविण्याची त्यांना संधी आहे. जर्मनीच्या राष्ट्रीय संघात साहाय्यक प्रशिक्षकपद सांभाळलेले फ्लिक हे बायर्न म्युनिकचे माजी खेळाडू आहेत. ते संघात असताना म्युनिकच्या संघाने १९८५-८६ ते १९८९-९० या कालावधीत चार वेळा बुंडेस्लिगा करंडक पटकाविला होता, आता प्रशिक्षक या नात्याने फ्लिक या स्पर्धेत विजेते ठरले आहेत. 

रिकाम्या स्टेडियमवर जल्लोष!
 पोलंडचा स्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोस्की याने नोंदविलेल्या मोसमातील ३१व्या लीग गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने वेर्डर ब्रेमन संघाला नमविले. त्यामुळे दोन सामने बाकी राखून बुंडेस्लिगा विजेतेपद राखणे फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला शक्य झाले. यंदाच्या बुंडेस्लिगातील त्यांचा हा सलग अकरावा विजय ठरला. बायर्न म्युनिक संघाला रिकाम्या स्टँड्सना साक्षी मानत विजेतेपदाचा जल्लोष करणे भाग पडले. विरोधाभास पाहा, गतमोसमातील बुंडेस्लिगा विजेतेपद निश्चित केले, तेव्हा बायर्न म्युनिकच्या यशात वाटेकरी होण्यासाठी अलियान्झ अरेनावर जवळपास ७५ हजार फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. यावेळी वेर्डर ब्रेमनच्या ४२ हजार प्रेक्षक क्षमतेच्या वेसर स्टेडियमवर बायर्नच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा भर पावसात स्टेडियमवर भयाण शांतता होती, स्टेडियमवरील अगदी मोजक्या अधिकारी वर्गाचाच अपवाद होता. स्टेडियमवर बायर्न म्युनिक खेळाडूंच्या जल्लोषाचाच आवाज घुमला. या संघाचे अनुभवी शिलेदार डेव्हिड अलाबा व थॉमस म्युलर यांच्यासाठी हे नववे बुंडेस्लिगा विजेतेपद ठरले. बायर्न म्युनिकने १९३१-३२ या मोसमात पहिल्यांदा जर्मन लीग जिंकली होती. त्यानंतर स्पर्धेतील तीस मोसम त्यांनी करंडकासह गाजविले आहे. एकविसाव्या शतकातील वीस मोसमांत १४ वेळा करंडकासह जल्लोष करताना बायर्न म्युनिकने जर्मन फुटबॉलमधील वर्चस्व अधोरेखित केले आहे.   

संबंधित बातम्या