श्रीसंतचे पुनरागमन....

किशोर पेटकर
बुधवार, 1 जुलै 2020

क्रीडांगण

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा जोमात असताना, सात वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट स्पॉट फिक्सिंगच्या बाँबगोळ्याने कमालीचे हादरले होते. फिक्सिंगच्या आरोपांमुळे क्रिकेट, क्रिकेटपटू पुन्हा संशयित ठरले, सभ्य गृहस्थांच्या या खेळावर शिंतोडे उडाले. आयपीएलमधील कथित स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मे २०१३ मध्ये आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सच्या तिघा क्रिकेटपटूंना अटक केल्यानंतर, हे स्पॉट फिक्सिंग प्रकरण अधिकच रंगतदार ठरले. माजी कसोटी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्यासह अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या खेळाडूंना अटक झाल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्व कमालीचे ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडल्या. श्रीसंतने आपण निर्दोष असल्याचा दावा केला, पण त्याच्यावरील कारवाई टळली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंगची कीड चिरडण्याच्या उद्देशाने कठोर शिक्षा करण्याचे ठरविले. तिन्ही क्रिकेटपटूंवर सप्टेंबर २०१३ मध्ये बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदी लादली. राजस्थान रॉयल्सनेही खेळाडूंचे करार तोडले. केरळच्या श्रीसंतची गुणवान क्रिकेटपटू ही छबी पूर्णपणे काळवंडली गेली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत गेले. चौकशीअंती श्रीसंतला स्पॉटफिक्सिंगमध्ये निर्दोष मानले गेले. या वेगवान गोलंदाजाने बीसीसीआयकडे बंदीविरोधात दाद मागितली. गतवर्षी बीसीसीआयने श्रीसंतला दिलासा दिला. त्याच्यावरील क्रिकेट बंदी सात वर्षांवर आणली आणि येत्या १३ सप्टेंबरमध्ये तो शिक्षेतून मुक्त होणार आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे कारकिर्दीवर उडालेला चिखल पुसल्यानंतर आता श्रीसंत पुन्हा क्रिकेट खेळण्यास सज्ज होत आहे. केरळच्या रणजी संघातून पुनरागमन करण्याची त्याची मनीषा असून त्याला संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. साहजिकच ३७ वर्षीय वेगवान गोलंदाजाच्या पुनरागमनाविषयी आतापासून क्रिकेटविश्वास उत्सुकता आहे.

पूर्वीचा वेग राखणार?
 वेगवान आणि भेदक गोलंदाजीसाठी श्रीसंत उमेदीच्या काळात ओळखला गेला. मैदानावर तो कौशल्याला आक्रमकतेचीही जोड देत असे. गेली सात वर्षे तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. परिणामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळताना श्रीसंत पूर्वीचा वेग आणि आक्रमकता राखू शकेल का? या प्रश्नाचेही उत्तर त्याच्या पुनरागमनात शोधले जाईल. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर रणजी करंडक स्पर्धा नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकते, त्यामुळे पुनरागमनाच्या तयारीसाठी श्रीसंतला पुरेसा वेळ मिळू शकतो. आपण तंदुरुस्तीबाबत जागरूक असून मेहनतीस डावललेले नाही, पुनरागमनासाठी प्रेरित असल्याचे श्रीसंतचे म्हणणे आहे. तब्बल सात वर्षे क्रिकेट मैदानापासून दूर राहिल्यामुळे थेट रणजी करंडक स्पर्धेत खेळताना श्रीसंतवर शारीरिक मर्यादा असतीलच, शिवाय त्याने वयाची पस्तीशीही पार केलेली आहे. आपल्यावरील बंदीच्या कालावधीत क्रिकेट भरपूर बदलले आहे, ही बाब त्याने स्वतःच मान्य केलेली आहे. श्रीसंत परिश्रमी आणि जिद्दी आहे, त्यामुळे तो दिखाव्यासाठी पुनरागमन करतोय असेही म्हणता येणार नाही. तो आपल्या टीकाकारांना खोटे पाडू शकतो, पण त्यासाठी प्रत्यक्ष क्रिकेट सुरू होण्याची आणि श्रीसंत गोलंदाजी टाकण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

चर्चेतील व्यक्तिमत्त्व
 श्रीसंतचे व्यक्तिमत्त्व नेहमीच चर्चेत राहणारे आहे. क्रिकेट मैदानावर त्याच्या कौशल्यपूर्ण गोलंदाजी इतकीच, त्याची आक्रमकता, आक्रस्ताळेपणा याचीही दखल घ्यावी लागली. पुनरागमनात त्याची स्वभाव वैशिष्ट्ये बदलेली असतील का? पूर्वी श्रीसंतने वादही ओढवून घेतले आहेत. बारा वर्षांपूर्वी, आयपीएल सामन्यानंतर हरभजन सिंगने त्याला लगावलेली थप्पड चांगलीच गाजली होती. मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजास बाद केल्यानंतर श्रीसंतचा जल्लोष, विचित्र हातवारे मनोरंजक आणि अतिउत्साही ठरले. आता क्रिकेटमधील सेकंड इनिंगही चर्चिली जावी यासाठी श्रीसंत प्रयत्नशील राहील. क्रिकेट बंदीच्या काळातही त्याने स्वतःवर झोत राखला. काही चित्रपटांत भूमिका वठविल्या, टीव्हीवरील रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला. राजकीय मंचावर येत, चार वर्षांपूर्वी केरळ विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढविली होती, तेव्हा तो पराभूत झाला, पण लढण्याची ऊर्मी उल्लेखनीय ठरली. स्वतःवरील स्पॉट फिक्सिंगचा चिखल साफ झाला आहे, पण डागाचे धब्बे काही प्रमाणात राहतील याची जाणीव श्रीसंतलाही असेल. क्रिकेट पुनरागमनात श्रीसंतला पुढे जाताना स्पॉट फिक्सिंग, संशय, अटक, शिक्षा, निलंबन, आजीवन बंदी इत्यादी वेदनादायी आठवणींसह मार्गक्रमण करावे लागेल. कटू अनुभवातून तो भरपूर शिकला असेल, अधिक परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या कणखर झाला असेल, याची आशा बाळगता येईल. 

संबंधित बातम्या