जोकोविचचा अतिशहाणपणा

किशोर पेटकर
सोमवार, 6 जुलै 2020

क्रीडांगण

कोरोना विषाणूने नमते घेतलेले नाही. या महामारीची भीती घालवून आवश्यक उपाययोजनांसह सामाजिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे. विषाणूचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर जगातील अव्वल मानांकित पुरुष टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने केलेला अतिशहाणपणा अंगलट आला, त्यामुळे त्याला जाहीर माफीही मागावी लागली. युरोपात फुटबॉल लीग सुरू झाल्या आहेत, बंधने शिथिल होत आहेत, याचा अर्थ असा नव्हे, की सारे काही पूर्वपदावर आले आहे. फुटबॉल लीग रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविताना काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे. साऱ्या खेळाडूंची चाचणी होत आहे. मात्र, जोकोविचने कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांना जास्त महत्त्व न देता प्रदर्शनीय टेनिस मालिकेस प्राधान्य दिले. एड्रिया टूर ही कोविड-१९ ला आमंत्रण देणारी टेनिस स्पर्धा ठरली. ३३ वर्षीय जोकोविचसह काही टेनिसपटू कोरोना विषाणूचे बाधित असल्याचे चाचणीत सिद्ध झाले. याशिवाय जोकोविचची पत्नी आणि इतरांनाही कोरोना विषाणूने ग्रासले. बाधित टेनिसपटू व्हिक्टर ट्रॉईकी याची सहचारिणी गरोदर आहे, तिलाही बाधा झाली. जोकोविच हा १७ ग्रँड स्लॅम विजेता प्रमुख टेनिसपटू आहे. कोविड-१९ चे गांभीर्य जाणूनही त्याने स्पर्धा घेण्याची घाई केली. एड्रिया टूरमध्ये कोविड-१९ विषयक प्रतिबंधक उपाययोजनांची पायमल्ली झाल्याबद्दल जोकोविचवर टीकाही झाली. त्याने आपल्या भावासह ही प्रदर्शनीय टेनिस मालिका आयोजित केली होती. असे सांगतात, की ही स्पर्धा खेळविताना संबंधित भागातील सरकारी शिष्टाचाराचे पालन झाले, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीचे उल्लंघन झाले. सर्बियातील पहिल्या टप्प्यानंतर प्रदर्शनीय स्पर्धेचा दुसरा टप्पा क्रोएशियात झाला, पण बाधित आढळल्यामुळे बाकी स्पर्धा स्थगित करावी लागली. माँटेनेग्रो व बोस्निया-हर्झेगोव्हिना येथे होणारे टप्पे रद्द करण्यात आले, निदान तेवढे शहाणपण सुचले.

नियम पाळण्याकडे कानाडोळा
कोरोना विषाणू महामारीत मोठ्या जनसंमेलनावर निर्बंध आहेत. बेलग्रेड येथे जोकोविचच्या स्पर्धेत सुमारे चार हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. प्रदर्शनीय स्पर्धेच्या काळात प्रेक्षकांसह खेळाडूंनीही सामाजिक अंतर नियम पाळण्याचे भान राखले नाही. खेळाडू प्रेक्षकांशी संवाद साधत होते. सामाजिक अंतराचे भान राखता खेळाडू वावरत होते. नोव्हाक जोकोविचचा भाऊ जॉर्जी हा एड्रिया टूरचा संचालक आहे. त्यामुळे सध्यातरी टेनिस वर्तुळात जोकोविच बंधू खलनायक ठरले आहेत. महामारी अजून अस्तित्वात आहे याकडे कानाडोळा केल्याबद्दल अन्य टेनिसपटूंनी टीका केली आहे. ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक किर्गिओस याने महामारीत स्पर्धा घेणे हा मोठा विनोद असल्याचे म्हटले आहे. टेनिस हा शरीरस्पर्श खेळप्रकारात येत नाही, तरीही एक-दोन नव्हे, तर चौघे टेनिसपटू आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. साहजिकच भुवया उंचावतात. शरीरस्पर्श नसलेल्या खेळामुळे कोरोना विषाणू पसरला याचाच अर्थ स्पर्धेच्या कालावधीत खबरदारीची सारी नियमावलीच बासनात बांधून ठेवण्यात आल्याचे सिद्ध होते. खेळाडू एकमेकांशी हातमिळवणी करत होते, आलिंगन देत होते, हे सारे कोरोना विषाणू प्रतिबंधक नियमावलीच्या विरोधात आहे. या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी जोकोविच बंधूंनी घ्यायला हवी अशी मागणी टेनिसपटूंकडून झाली आहे, ती योग्यच ठरते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बेलग्रेडमध्ये स्पर्धा संपल्यानंतर नाइट क्लबमध्ये पार्टी झाली. त्यात खेळाडू झिंगले, सामाजिक अंतर नियम पायदळी तुडवून भन्नाट नाचल्याचीही माहिती समोर आली. गलथान आयोजनाचाच हा भाग असून तो खेळाडूंना चांगलाच महागात पडला. 

नाठाळ वृत्ती
 महामारीचा फटका बसलेल्या टेनिसमधील कमी मानांकनाच्या खेळाडूंसाठी निधी उभा करण्याच्या शुद्ध हेतूने एड्रिया टूर प्रदर्शनीय स्पर्धा जोकोविच बंधूंनी आयोजित केल्याचे सांगितले जाते. कोविड-१९ विषयक शिष्टाचार पाळून चांगल्या कामासाठी प्रदर्शनीय स्पर्धा घेतली हे सत्कर्म मानले, तरीही महामारी अजूनही उग्र रूपात असताना स्पर्धेचे आयोजन करण्याची घाईच झाली. स्पर्धा घेताना कागदोपत्री शिष्टाचाराचा मान पाळला, पण ओघात नियमांचा विसर पडला. जागतिक टेनिसपटू मागील मार्चपासून स्पर्धात्मक टेनिस कोर्टवर नाहीत. ऑगस्टमध्ये टेनिस स्पर्धा पूर्ववत होण्याचे मानले जाते, पण अजूनही संदिग्धता आहे. स्वतः कोरोनाबाधित झाल्यानंतर नोव्हाक जोकोविचला, विषाणू अजूनही जागृत असल्याची जाणीव झाली. कोरोना विषाणूशी जग लढा देत असताना जोकोविच `जोकर`प्रमाणे वागला. कोरोना विषाणूस थोपविणारी लस आल्यास आपण घेणार नसल्याचे वक्तव्य जोकोविचने एप्रिलमध्ये केले. मे महिन्यात त्याने स्पेनमधील वास्तव्यात टेनिस क्लबवर सराव करून लॉकडाउन नियम मोडले होते. त्याच्या नाठाळ वृत्तीवर टीकाही झाली. 

संबंधित बातम्या