`द रेड्स`ची बाजी!

किशोर पेटकर
सोमवार, 13 जुलै 2020

क्रीडांगण

लिव्हरपूल एफसी हा इंग्लिश फुटबॉलमधील प्रतिथयश क्लब. `द रेड्स` या टोपणनावाने ओळखला जाणारा हा संघ युरोपियन फुटबॉलमध्ये काही वर्षांपूर्वी बलाढ्य गणला जात असे, परंतु मागील शतकातील नव्वदच्या दशकापासून या संघाला उतरती कळा लागली. या संघाच्या एनफिल्ड स्टेडियमवर लाल रंगातील पाठीराख्यांचा जल्लोष कायम राहिला, पण संघाला करंडक जिंकणे शक्य होत नव्हते. चाहते नव्या उमेदीने प्रत्येक मोसमात संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर येत, पण विजेतेपदाचा उन्माद असाध्य ठरला. वर्षे सरली, लिव्हरपूल संघाचे नशीब काही पालटले नाही. अखेरीस या संघाचा पडता काळ संपला. गेल्या वर्षीपासून सव्वाशे वर्षांची महान परंपरा असलेला हा संघ पुन्हा करंडक जिंकू लागला. प्रीमियर लीग विजेतेपद हे इंग्लिश क्लबसाठी खूपच प्रतिष्ठेचे असते. लिव्हरपूलने शेवटच्या वेळेस इंग्लंडमधील चँपियन क्लब हा मान १९८९-९० मोसमात मिळविला होता. तेव्हा केनी डॅलग्लिश संघाचे मार्गदर्शक होते. गतमोसमात त्यांना अगदी थोडक्यात प्रीमियर लीगमधील यश हुकले. मँचेस्टर सिटीने ३८ सामन्यानंतर ९८ गुणांची कमाई करताना लिव्हरपूलला अवघ्या एका गुणाच्या फरकाने दुसऱ्या स्थानी ढकलले होते. द रेड्स संघाने यंदा कमाल केली. जबरदस्त वर्चस्व राखताना त्यांनी सात सामने राखून प्रीमियर लीग विजेतेपद साकारण्याचा पराक्रम साधला. त्यासाठी तब्बल तीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. खरे म्हणजे, कोरोना विषाणू महामारीमुळे लिव्हरपूलचे इंग्लिश लीगमधील १९ वे विजेतेपद संकटातच होते. इंग्लंडमध्ये लॉकडाउन लागू झाले, तेव्हा प्रीमियर लीग अर्ध्यावरच स्थगित करावी लागली. त्यानंतर कोविड-१९ चा तेथे उद्रेक झाला. परिणामी प्रीमियर लीग अर्ध्यावरच रद्द करण्याची स्थिती उद्भवली, मात्र नंतर महामारीचा कहर कमी होत गेल्यामुळे, इंग्लंडमधील निर्बंधही हळूहळू शिथिल होत गेले. शंभरेक दिवस खंडित झालेली प्रीमियर लीग जूनमध्ये कडक मार्गदर्शक तत्त्वांसह रिकाम्या स्टेडियममध्ये पुन्हा सुरू झाली. गतविजेत्या मँचेस्टर सिटी, लेस्टर सिटी, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड आदी मातब्बर संघांना मोठ्या फऱकाने मागे टाकत लिव्हरपूलने गतमोसमात हुकलेल्या करंडकावर दिमाखात नाव कोरले. 

क्लोप यांचे सफल मार्गदर्शन
लिव्हरपूल एफसीच्या यशाचे सर्वाधिक श्रेय त्यांचे ५३ वर्षीय मार्गदर्शक युर्गेन क्लोप यांना जाते. या जर्मन प्रशिक्षकाचे मार्गदर्शन इंग्लंडमध्येही कल्पक आणि सफल ठरले. ऑक्टोबर २०१५ मध्ये ते प्रशिक्षकपदी रुजू झाले, तेव्हा लिव्हरपूल संघ प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात दहाव्या क्रमांकावर चाचपडत होता. त्यानंतर संघ बांधणीत काही वर्षे गेली. उपयुक्त तेवढेच महागडे खेळाडू करारबद्ध करण्यात आले. अखेरीस २०१८-१९ मोसमात सकारात्मक परिणाम दिसून आले. क्लोप यांनी लिव्हरपूलला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. गतमोसमात प्रीमियर लीग करंडक थोडक्यात हुकल्याची सल राहिली, पण अन्य तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धा लिव्हरपूलने जिंकल्या. चँपियन्स लीगमधील त्यांची कामगिरी दृष्ट लागण्याजोगी ठरली. बायर्न म्युनिक, पोर्तो, बार्सिलोना या बलाढ्य संघांचा पाडाव करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. इंग्लंडच्या टॉटेनहॅम हॉट्सपर संघाला दोन गोलांनी नमवून युरोपातील चँपियन क्लब हा मान लिव्हरपूलने सहाव्यांदा मिळविला. याशिवाय यूईएफए सुपर कप आणि फिफा क्लब विश्वकरंडकही लिव्हरपूलने क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकला. २०१९-२० मोसमात लिव्हरपूलने गतमोसमातील धडाकेबाज सूर आवळत दरारा कायम राखला. जर्मनीत प्रशिक्षक या नात्याने क्लोप यांनी ठसा उमटविला. मेन्झ ०५ या संघाचे ते सात वर्षे प्रशिक्षक होते, त्यानंतरच्या सात वर्षांत त्यांनी बोरुसिया डॉर्टमुंडला उंचीवर नेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने सलग दोन वेळा (२०१०-११ व २०११-१२) बुंडेस्लिगा ही जर्मनीतील अव्वल फुटबॉल स्पर्धा जिंकली. जर्मनीत दबदबा राखल्यानंतर क्लोप यांना वलयांकित आणि लोकप्रियतेत आघाडीवर असलेली इंग्लिश प्रीमियर लीग खुणावू लागली. लिव्हरपूल क्लबकडून त्यांना महत्त्वाकांक्षी करार मिळाला. अपेक्षापूर्तीत ते यशस्वी ठरले आहेत.

चाहत्यांचा उत्साह
लिव्हरपूल एफसीने प्रीमियर लीग विजेतेपद निश्चित केल्यानंतर, या संघाच्या लाल रंगात न्हाऊन जाणाऱ्या चाहत्यांच्या उत्साहास उधाण आले. कोरोना विषाणूची धास्ती असतानाही द रेड्स चाहत्यांनी एनफिल्डबाहेर जल्लोषासाठी हजारोच्या संख्येने गर्दी करण्याचे धारिष्ट्य दाखविले, त्यात लहानांपासून मोठ्या वयाचे पाठीराखे होते. दीर्घकालीन प्रतीक्षा संपल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. लॉकडाउन शिथिलतेचा फायदा उठवत आनंदोत्सव साजरा करताना चाहत्यांनी जोरदार आतषबाजीही केली, पण परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दक्षताही घेतली. 

संबंधित बातम्या