एकदाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू

किशोर पेटकर
मंगळवार, 21 जुलै 2020

क्रीडांगण

कोरोना विषाणू महामारीने जग व्यापल्यामुळे गेल्या मार्चपासून बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेरीस जुलै महिन्यात सुरू झाले. साऊदॅम्प्टन येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रंगला. हा सामना ऐतिहासिकच ठरला, तर विंडीजने विजयासह संस्मरणीय ठरविला. तब्बल ११७ दिवस खंडित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा मैदानावर अवतरले. पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी रिकाम्या स्टेडियमचा पर्याय योग्य ठरला. कोविड-१९ प्रतिबंधक आणि संरक्षक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. कोरोना विषाणूचा धोका ओळखून चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर रोखला गेला. लाळेऐवजी इंग्लिश क्रिकेटपटूंनी सामन्यात शरीरावरील घामाचा चेंडूवर वापर करण्यास प्राधान्य दिले. पहिल्या कसोटीत प्रारंभी पावसाचा व्यत्यय वगळता कोविडच्या पार्श्वभूमीवर हा सामना सुरळीतपणे झाला. विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यासाठी पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला आहे. चाचणीत पाकिस्तानचे दहा खेळाडू बाधित आढळले. कोरोना विषाणू घोंघावत असताना परिणामकारक एसओपी (प्रमाणित कार्यचालन पद्धती) असल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे शक्य असल्याचे इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीतून दिसून आले. ब्रिटन पूर्णतः कोरोनामुक्त झालेले नाही, पण तेथील रिकाम्या स्टेडियममध्ये खेळ रंगू लागलाय हे चांगले चिन्ह आहे. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये कॅरेबियन टी-२० प्रीमियर लीगचा धुरळा उडणार आहे. सर्व बेटांवर सामने न खेळविता फक्त त्रिनिदाद-टोबॅगो येथेच स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे, जेणेकरून एसओपीची चांगल्या तऱ्हेने अंमलबजावणी शक्य होईल.

क्रिकेटसाठी प्रवासावर निर्बंध
कोरोना विषाणू महामारीच्या सावटाखाली क्रिकेट खेळताना प्रवासावरील निर्बंधांवर भर दिला जात आहे. कॅरेबियन लीगमध्येही प्रवास टाळला जाईल. या स्पर्धेत सहा संघ आहेत. त्या संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांचा एकाच हॉटेलमध्ये निवास असेल, तेथे अन्य कोणालाही प्रवेश नसेल. या स्पर्धेत त्रिनिदाद-टोबॅगो सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांचे दोन आठवड्यांचे विलगीकरण केल्यानंतर पुन्हा कोविड-१९ची चाचणी घेतली जाईल. आरोग्यविषयक सुरक्षा उपाययोजनांसह स्पर्धा एकाच ठिकाणी होणारी कॅरेबियन लीग सफल ठरल्यास, क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांतही याच प्रकारे टी-२० लीगचे आयोजन होऊ शकते. भारतात २०२० मधील आयपीएल स्पर्धा कोविड-१९मुळे झालेली नाही. आयपीएल खेळविण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) प्रवासाचे काटेकोर नियोजन करावे लागेल. वेगवेगळ्या शहरांतील संघ असल्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो. स्पर्धेनिमित्त होणारा प्रवास ही बीसीसीआयची मोठी डोकेदुखी आहे. देशात आयपीएल न खेळविता इतर सुरक्षित देशात खेळविण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर आहे, पण अंतिम निर्णय झालेला नाही. प्रवासाच्या कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट मोसमाबाबतही बीसीसीआय द्विधा मनःस्थितीत आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळताना भारतातील विविध राज्य संघांना बराच प्रवास करावा लागतो. भारतातील क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल याबाबत स्पष्टता नाही. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आयपीएलबाबत सध्यातरी संदिग्धताच आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच देशांतर्गत स्पर्धांचा विचार करू शकतो, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

टी-२० विश्वकरंडकाबाबत साशंकता
इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट जम बसवत आहे, मात्र इतर देशांत अनुकूलता नाही. कोरोना विषाणूस मागे हटवलेल्या न्यूझीलंडमध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याबाबत चिन्हे नाहीत. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली टी-२० विश्वकरंडक होण्याबाबत साशंकताच आहे. त्या देशात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव होऊ लागल्यामुळे टी-२० विश्वकरंडक स्पर्धा संकटात आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जुलै महिन्याच्या प्रारंभी ते राज्य लॉकडाउन झाले. व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. त्यामुळे मेलबर्न आणि सिडनी या शहरांचा संपर्क तुटला. ऑस्ट्रेलियातील ही दोन प्रमुख शहरे एकमेकांना दुरावली आहेत. या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणे अपेक्षित आहे. मेलबर्नमध्ये कोविड रुग्णात वाढ होत असल्याने स्पर्धा आयोजक चिंतीत आहेत. याच शहरात विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया देश कोरोनामुक्त झाला नाही, तर टी-२० विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यावाचून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर दुसरा पर्याय नसेल. कोरोना विषाणू धास्तीने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’सही टी-२० विश्वंकरंडक स्पर्धा पुढे ढकलावी असे वाटते.   

संबंधित बातम्या