बंद दरवाजाआड फुटबॉल!

किशोर पेटकर
मंगळवार, 21 जुलै 2020

क्रीडांगण

देशातील कोरोना विषाणूचे गहिरे संकट नष्ट होऊन परिस्थिती कधी पूर्वपदावर येईल याबाबत अस्पष्टताच आहे. कोविड-१९मुळे देश रोखला जाऊ शकत नाही, त्यादृष्टीने अनलॉक प्रत्यक्षात आणले जात आहे. देशातील क्रीडा मैदानावरही लगबग व्हावी यासाठी धडपड सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून आता भारतातही फुटबॉल बंद दरवाजाआड रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्याचे नियोजन होत आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या आरोग्यसंरक्षक साऱ्या उपाययोजना व्यवस्थित आखून आणि योग्यपणे अवलंब केल्यास क्रीडा मैदानावर प्रेक्षकांविना चुरस अनुभवता येऊ शकते हे युरोपातील व्यावसायिक फुटबॉलने, तसेच फॉर्म्युला वन रेसिंगने दाखवून दिले आहे. याच धर्तीवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा खेळविण्यासाठी स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडचे (एफएसडीएल) प्रयत्न सुरू आहेत. २०२०-२१ मध्ये आयएसएलची सातवी आवृत्ती असेल. २०१४ पासून सहा मोसमात ही पूर्णतः व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा देशात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. आयएसएल स्पर्धेचे अर्थकारणही प्रचंड आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) स्पर्धेचे आयोजन करत नाही, पण नियमन करते. देशातील अव्वल फुटबॉल स्पर्धा हा मानही आयएसएलला मिळाला असून आशियायी फुटबॉल महासंघानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्पर्धेचा सारा कारभार नीता अंबानी प्रमुख असलेल्या एफएसडीएल यांच्यातर्फे सुरळीतपणे पाहिला जातो. देशातील यशस्वी व्यावसायिक स्पर्धा या नात्याने अवघ्या काही वर्षांतच आयएसएलने ठसा उमटविला आहे, भारतीय फुटबॉलपटूंनाही मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. 

स्पर्धा रद्द होणे नुकसानकारक
स्पर्धेशी निगडित आर्थिक बाबी लक्षात घेता, २०२०-२१ मोसमातील आयएसएल रद्द करणे अजिबात परवडणारे नाही. साऱ्यांचेच मोठे नुकसान होईल. त्यामुळे नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत स्पर्धा घेण्याचे नियोजन असून हल्लीच त्यासंदर्भात स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी दहा संघांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. जर्मनीतील बुंडेस्लिगा, इंग्लंडमधील प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा, इटलीतील सेरी ए या फुटबॉल स्पर्धा कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांसह सुरू झाल्या. या स्पर्धांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात नवा आदर्शही राखला आहे. त्याच धर्तीवर सातवी आयएसएल स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये बंद दरवाजाआड कडक शिस्तीत खेळविण्यासाठी आयोजकांचा मास्टर प्लॅन तयार होत आहे. २०१९-२० मोसमातील अंतिम सामना या वर्षी १४ मार्च रोजी गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला होता. कोरोना विषाणू महामारी तेव्हा देशात अंग फुगवत होती, त्यामुळे आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामना बंद दरवाजाआड रिकाम्या स्टेडियममध्ये झाला. पुरस्कर्ते आणि दूरचित्रवाणी प्रसारण हक्क यामुळे स्पर्धा होणे अत्यावश्यक आहे. संघाचे पाठीराखे घरबसल्या थेट प्रक्षेपणाद्वारे सामना पाहू शकतात, फक्त स्टेडियमवरील प्रोत्साहनाचा भन्नाट जल्लोष नसेल. त्याची संघांना आणि खेळाडूंनाही सवय करून घ्यावी लागेल.

एकाच राज्यात आयोजन शक्य
आयएसएल स्पर्धेत देशातील दहा शहरांतील संघ आहेत. यामध्ये कोलकात्याचा एटीके-मोहन बागान, गुवाहाटीचा नॉर्थईस्ट युनायटेड, मुंबई सिटी एफसी, एफसी गोवा, बंगळूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, चेन्नईयीन एफसी, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी आणि ओडिशा एफसी या संघांचा समावेश आहे. द्वीसाखळी पद्धतीने होम-अवे धर्तीवर सामने होत असल्याने संघांना भरपूर प्रवास करावा लागतो. कोविड-१९ वातावरणात सार्वत्रिक प्रवास निशिद्ध आहे. त्यामुळेच सातवी आयएसएल स्पर्धा एकाच राज्यात घेण्याविषयी एफएसडीएल यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांतील शहरे येथे स्पर्धेतील सामने दीर्घ कालावधीसाठी खेळविणे शक्य आहे का याबाबत अभ्यास सुरू झाला आहे. भारतात पुढील वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, अहमदाबाद व नवी मुंबई या शहरात होणार असल्याने तेथे आयएसएल स्पर्धा अजिबात शक्य नसेल. गोव्यासारख्या लहान राज्यात सर्व दहाही संघांचा सराव, मुख्य स्पर्धा घेण्यास प्राधान्य आहे. कारण त्यामुळे अतिरिक्त प्रवास टाळणे आणि कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजनाही प्रत्यक्षात आणणे शक्य होईल असे आयोजकांना वाटत आहे. ईशान्येकडील राज्यांत स्पर्धा खेळविताना तेथे साधनसुविधांता तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे सध्या गोवा आणि केरळ ही राज्ये आयएसएल स्पर्धा केंद्र या नात्याने संभाव्य यादीत आघाडीवर आहेत. 

संबंधित बातम्या