सुपर डॅनचा गुडबाय! 

किशोर पेटकर 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

क्रीडांगण

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा कोविड-१९ महामारी उद्रेकामुळे वर्षभर लांबणीवर पडली. यामुळे ऑलिंपिक खेळण्यास सज्ज होत असलेल्या साऱ्याच क्रीडापटूंचे नियोजन साफ विस्कटले. विशेषतः वय वाढलेल्या खेळाडूंची खूपच कुचंबणा झाली. दुखापतींचा ससेमिरा टाळत आणखी एक वर्ष कारकीर्द लांबविणे शक्य नाही, हे ध्यानात आल्यामुळे काहींनी सरळ निवृत्ती जाहीर करून खेळास गुडबाय केले. या कारणास्तव चीनचा महान पुरुष बॅडमिंटनपटू लिन डॅन याने वयाच्या ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बॅडमिंटन सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन कोर्टवरील हा दिग्गज खेळाडू पुन्हा विजयाचा जल्लोष करताना दिसणार नाही. 

खरे म्हणजे, गेल्या काही वर्षांत ‘सुपर डॅन’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या माजी ऑलिंपिक विजेत्याचा बॅडमिंटन कोर्टवरील दरारा कमी झाला होता. वाढते वय, शरीराकडून होणारे असहकार्य यामुळे त्याच्या खेळात पूर्वीचा धडाका तुरळक होता. गतवैभव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर डॅन पाचवी ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याची तयारी करत होता. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी होईल, या वर्षी १४ ऑक्टोबरला डॅन आपला ३७ वा वाढदिवस साजरा करेल. डॅनचा पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी अव्वल मानांकित मलेशियाचा ली चोंग वेई याने गतवर्षी निवृत्ती स्वीकारली. वर्षभरात दोन महान खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यामुळे जागतिक बॅडमिंटनमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डावखुऱ्या डॅनची पत्नी शिए शिंगफँग हीसुद्धा बॅडमिंटनपटू आणि महिला एकेरीतील माजी जगज्जेती आहे. डॅन व शिए यांना आता तीन वर्षांच्या मुलासह कौंटुबिक वेळ व्यतीत करण्यास मिळेल.

विक्रमी ऑलिंपिक विजेता 
लिन डॅनच्या अफलातून धडाकेबाज खेळाने प्रभावित होत, डेन्मार्कचा समकालीन बॅडमिंटनपटू पीटर गेड याने चिनी खेळाडूस ‘सुपर डॅन’ ही उपाधी बहाल केली. फेब्रुवारी २००४ मध्ये सर्वप्रथम जगातील अव्वल मानांकित झाल्यानंतर त्याने हे स्थान स्वतःपाशी बराच काळ राखले. भन्नाट फटके, अचाट वेग, अफलातून पदलालित्य व चपळता या बळावर डॅनने दोन दशके जागतिक बॅडमिंटनवर हुकमत राखली. सलग दोन ऑलिंपिक स्पर्धांत त्याने पुरुष एकेरीतील सुवर्णपदक जिंकले. बीजिंगमध्ये २००८ मध्ये घरच्या मैदानावर पहिले ऑलिंपिक सुवर्ण जिंकल्यानंतर त्याने २०१२ मध्ये लंडनमध्ये लौकिक राखला. ऑलिंपिक पुरुष एकेरीत सुवर्णपदक लागोपाठ दोन वेळा जिंकणारा तो एकमेवाद्वितीय बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय पाच वेळा जगज्जेतेपद मिळवून त्याने कारकीर्द देदीप्यमान केली. ऑल इंग्लंडमध्ये तो सहा वेळा जिंकला. प्रत्येकी दोन वेळा तो विश्वकरंडक आणि आशियाई स्पर्धेत पुरुष बॅडमिंटन एकेरीत अजिंक्य बनला. डॅनच्या कारकिर्दीत ६ आकड्याने अतीव महत्त्व प्राप्त केले आहे. त्याने एकूण ६६ करंडक पटकाविले, तर ६६६ आंतरराष्ट्रीय एकेरी सामन्यांत विजय मिळविला. तो पाचव्यांदा ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाला असता, तर आगळा पराक्रम त्याच्या नावे नोंदीत झाला असता. मात्र, शारीरिक क्षमता आणि वेदना आपणास लढावू बाणा प्रदर्शित करण्याची परवानगी देत नसल्याचे सांगत या परिपूर्ण बॅडमिंटनपटूने थांबण्याचे ठरविले. जगभरातील कितीतरी युवा बॅडमिंटनपटूंसाठी डॅन आदर्शवत ठरला. केवळ आशियातच नव्हे, तर जागतिक पातळीवर जोशपूर्ण खेळाद्वारे त्याने स्वतःची वेगळी ओळख शेवटपर्यंत जपली.

बंडखोरी वृत्तीही लक्षवेधक 
असामान्य गुणवत्तेच्या डॅनने चीनमध्ये बंडखोरी वृत्तीनेही लक्ष वेधले. काही परंपरागत बाबी आपण छेदू शकतो हे त्याने सिद्ध केले. त्यामुळे चिनी माध्यमांनी त्याची ‘बॅड बॉय’ अशी छबी निर्मिली. चीनमधील राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा जिंकल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी डॅन देशाच्या लष्कारात, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) क्रीडा संघात दाखल झाला. लष्करी शिस्तीत त्याच्यावर बरीच बंधने आली, पण ती जुगारण्यास त्याने प्राधान्य दिले. धार्मिक चिन्हासह त्याने शरीरावर बरेच टॅटू गोंदवून घेतले. जाहिराती केल्या, जे लष्करास मान्य नाही. मैदानावर बहारदार खेळ करताना त्याने लष्कराचे स्थापित आदेश मोडण्यातही धन्यता मानली. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली, पण डॅनच्या बॅडमिंटनमधील सुपरस्टारपदावर त्याचा प्रतिकूल परिणाम अजिबात झाला नाही. निवृत्तीपर्यंत डॅनने चीनमध्ये आपली लोकप्रियता ढळू दिली नाही, श्रेष्ठत्वाची प्रतिमा कायम राखली. खिलाडू वृत्ती लोपणार नाही याची दक्षता घेतली. लष्कराची पार्श्वभूमी असलेल्या चिनी खेळाडूंनी नियमात राहण्यास धन्यता मानली, मात्र डॅनने तसे केले नाही. २०१५ मध्ये तो चिनी लष्कराच्या बंधनातून मुक्त झाला.  

संबंधित बातम्या