युव्हेंट्सचे धडपडत विजेतेपद

किशोर पेटकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

क्रीडांगण

इटलीतील अव्वल श्रेणी सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद युव्हेंट्स एफसीने सलग नवव्यांदा जिंकले. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली, पण त्याच वेळी विजेतेपदाच्या करंडकापर्यंत जाताना त्यांना धडपडावे लागले ही बाबही प्रकर्षाने जाणवली. स्पर्धेची एक फेरी बाकी असताना युव्हेंट्स संघाने ३७ पैकी सहा सामने गमावले. विजेत्या संघाने करंडकापर्यंतच्या वाटचालीत पत्करलेल्या पराभवांच्या संख्येमुळे युव्हेंट्सचे यावेळचे यश काहीसे झाकोळले आहे. दुसऱ्या स्थानावरील इंटर मिलानपेक्षा युव्हेंट्सच्या खाती दोन पराभव जास्त झाले. सेरी ए करंडक ३६व्यांदा निश्चित केल्यानंतर युव्हेंट्सला तेराव्या क्रमांकावरील काग्लियारी संघानेही हरविले. त्यांनी स्पर्धेत ४० गोल स्वीकारले, यावरून बचावफळीत त्रुटी असल्याचे जाणवते. 

एकंदरीत युव्हेंट्सची कामगिरी जाणकारांना चँपियन्सला साजेशी निश्चितच वाटली नाही. युव्हेंट्सचा पारंपरिक प्रतिस्पर्धी इंटर मिलानला दहा सामन्यांत बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. गुणतक्त्यात आघाडी राखणे त्यामुळे युव्हेंट्सला शक्य झाले. इंटर मिलानच्या विजयांची संख्या वाढली असती, तर युव्हेंट्सला विजेतेपद राखणे निश्चितच जड गेले असते. इटलीतील हा नावाजलेला संघ सेरी ए करंडक २०११-१२ पासून सलगपणे जिंकत आहे. २००२-०३ मोसमात सेरी ए जिंकल्यानंतर युव्हेंट्सला पुढील विजेतेपदासाठी तपभराची प्रतीक्षा करावी लागली होती, मात्र आता सलग नऊ मोसम त्यांनी दबदबा राखला आहे. चीननंतर युरोपात इटलीला सर्वांत अगोदर कोरोना विषाणू महामारीचा जबर तडाखा बसला. मृतांची संख्या वाढली. साहजिकच सेरी ए स्पर्धेवरही पडदा आला. रिकामी स्टेडियम, काटेकोरपणे पालन होणारी आरोग्यसंरक्षक आचारसंहिता यांचा वापर होत युरोपातील फुटबॉल स्पर्धा पूर्णत्वास गेल्या आहेत, सेरी ए त्यापैकीच एक स्पर्धा आहे. जूनमध्ये स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर केवळ युव्हेंट्सलाच नव्हे, तर इटलीतील साऱ्याच संघांना संघर्ष करावा लागला.
 
प्रशिक्षकास दिलासा
इंग्लंड, स्पेनमधून इटलीत व्यावसायिक फुटबॉल खेळण्यास आलेला पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला यंदाच्या मोसमात चांगला सूर गवसला. त्यामुळे युव्हेंट्सची विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल सुसह्य ठरली. ३५ वर्षीय रोनाल्डोने ३३ सामन्यांत ३१ गोल केले. युव्हेंट्सने साम्पदोरिया संघास नमवून विजेतेपद निश्चित केले. त्या विजयात पहिला गोल रोनाल्डोनेच नोंदविला. त्याची यंदाची कामगिरी त्याला मिळणाऱ्या अवाढव्य मोबदल्यास साजेशीच ठरली. रोनाल्डोचा खेळ खुलल्यामुळे युव्हेंट्सचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी यांचे कामही सोपे झाले. कोपा इटालिया स्पर्धेच्या अंतिम लढतीत युव्हेंट्सला नापोलीकडून हार स्वीकारावी लागली होती. ते अपयश सारी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सेरी ए स्पर्धेत भरून काढले. प्रशिक्षक यांच्यासाठी हे विजेतेपद उल्लेखनीय आणि दिलासादायी ठरले. या इटालियन प्रशिक्षकाचे मायदेशातील हे पहिलेच मोठे यश ठरले, तसेच सेरी ए जिंकणारे वयस्क प्रशिक्षक हा मानही त्यांना मिळाला. ६१ वर्षीय सारी यांच्याशी युव्हेंट्सने गतवर्षी जूनमध्ये करार केला होता. इंग्लंडमधील चेल्सी संघाकडून युव्हेंट्सकडे आलेल्या सारी यांचा करार तीन वर्षांचा आहे. एक वर्ष सरले आहे, आणखी दोन बाकी आहेत, यंदाच्या विजेतेपदामुळे सारी यांचा करार स्थिर राहण्यास मदत झाली आहे.

पिर्लोचे पुनरागमन
मध्यरक्षक आंद्रे पिर्लो हा इटलीचा दिग्गज फुटबॉलपटू. युव्हेंट्सकडून खेळतानाही त्याची कामगिरी खुलली. तो संघात असताना युव्हेंट्सने चार वेळा सेरी ए करंडक पटकावला होता. २०१७ मध्ये स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्त झालेल्या या ४१ वर्षीय खेळाडूस युव्हेंट्सने आता पुनरागमनाची नवी संधी दिली आहे. सेरी ए विजेतेपदाचा जल्लोष सुरू असताना संघ व्यवस्थापनाने पिर्लो याची २३ वर्षांखालील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. कनिष्ठ संघाला मार्गदर्शन करताना पिर्लो सफल ठरल्यास कदाचित तो युव्हेंट्सच्या मुख्य संघाचा भविष्यातील मैदानावरील बॉस असू शकतो. २००६ मध्ये इटलीने विश्वकरंडक पटकावला. त्या कामगिरीत पिर्लो याचा मोलाचा वाटा होता. २०१५ मध्ये युव्हेंट्सला सोडचिठ्ठी देऊन कारकिर्दीच्या संध्याकाळी तो अमेरिकेतील मेजर लीग सॉकर स्पर्धेत खेळला. न्यूयॉर्क सिटी एफसी संघाशी त्याने करार  केला. मात्र अमेरिकेतील त्याची कारकीर्द विशेष गाजली नाही. वाढत्या वयाचा परिणाम खेळात जाणवला. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर पिर्लो पुन्हा फुटबॉल मैदानावर येण्यास इच्छुक होता. प्रशिक्षक या नात्याने त्याची आता नवी इनिंग असेल. त्याला कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक या नात्याने करारबद्ध करताना युव्हेंट्स संघ व्यवस्थापनाने नक्कीच भविष्याचा विचार केलेला असेल.

संबंधित बातम्या