लाझिओचा ‘किंग सिरो’

किशोर पेटकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

क्रीडांगण
 

युरोपातील व्यावसायिक फुटबॉलवर साऱ्या जगाचे लक्ष असते. तेथील अव्वल क्लबस्तरीय फुटबॉल लीगला लोकप्रियता आणि प्रसिद्धी अमाप लाभते. कोरोना विषाणू महामारीमुळे युरोपातील फुटबॉलला दणका सहन करावा लागला, मात्र उद्रेक कमी होताच तेथील फुटबॉल सावरले. प्रारंभी जर्मनीने फुटबॉलला नवी दिशा दाखविली, त्याच सफल पायवाटेवरून नंतर इंग्लंड, स्पेन, इटलीतील फुटबॉलने वाटचाल केली. तेथील लीग स्पर्धा संपल्यामुळे आयोजकांबरोबर पुरस्कर्तेही कमालीचे सुखावले, नपेक्षा त्यांना कोट्यवधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. युरोपीय फुटबॉलला आता चँपियन्स लीग स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्याचे वेध लागले आहेत. 
युरोपीय फुटबॉलला यंदा नवा सितारा गवसला. सिरो इम्मोबिले हे त्याचे नाव. इटलीतील सेरी ए स्पर्धेत खेळणाऱ्या लाझिओ संघाचा हा हुकमी आघाडीपटू. युरोपातील लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम साधताना सिरो याने युरोपात, तसेच इटलीतही सर्वाधिक गोलसाठी ‘गोल्डन शू’ किताब पटकाविला. इटलीतील युव्हेंट्सचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, स्पेनमधील बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी हे दिग्गज, तसेच जर्मनीतील बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवान्डोस्की, आरबी लिपझिगचा युवा स्ट्रायकर टिमो वेर्नर यांना मागे टाकत सिरो याने युरोपीय फुटबॉलमध्ये दबदबा राखला. त्याच्या भन्नाट खेळामुळे लाझिओ संघाला २०२०-२१ मोसमातील चँपियन्स लीग स्पर्धेतही स्थान मिळाले. तब्बल १३ मोसमानंतर हा संघ युरोपातील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत खेळताना दिसले. सेरी ए स्पर्धेत विजेता युव्हेंट्स, इंटर मिलान व अटालांटा यांच्यानंतर लाझिओ संघास चौथा क्रमांक मिळाला. संघाच्या प्रगतीत गोलधडाका राखत तीस वर्षीय आघाडीपटूने ‘किंग सिरो’ हे टोपणनाव सार्थ ठरविले. रोममधील लाझिओ संघाच्या चाहत्यांत तो याच टोपणनावानेच जास्त लोकप्रिय आहे.

तिसरा इटालियन...
युरोपात गोल्डन शू किताब मिळविणारा सिरो इम्मोबिले हा इटलीचा तिसराच फुटबॉलपटू आहे. सेरी ए स्पर्धेत त्याने यंदा ३७ सामन्यांत ३६ गोल केले. यापूर्वी २००६-०७ मोसमात रोमा संघाच्या फ्रान्सेस्को टोटी याने २६, तर २००५-०६ मोसमात फिओरेन्टिनाच्या लुका टोनी याने ३१ गोल नोंदवून युरोपीय लीग स्पर्धेत अग्रस्थान मिळविले होते. सिरो याने २०१९-२० मोसमात वर्चस्व राखताना लेवान्डोस्की (३४ गोल), ख्रिस्तियानो रोनाल्डो (३१ गोल), मेस्सी (२५ गोल), पुढील मोसमात चेल्सी संघाकडून खेळणारा वेर्नर (२८ गोल) यांना मागे टाकले. मागील सलग तीन मोसम मेस्सी युरोपियन गोल्डन शू किताबाचा मानकरी ठरला होता. रोनाल्डोने २०१४-१५ मोसमात रेयाल माद्रिद संघाकडून खेळताना ला-लिगा स्पर्धेत ४८ गोलचा पराक्रम साधला होता, त्यास मात देणे लाझिओच्या खेळाडूस जमले नाही. मोसमात सिरो इम्मोबिले याने सेरी ए स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी साधली. नापोली संघाकडून खेळताना गोन्झालो हिग्युएन याने २०१५-१६ मोसमात ३६ गोल नोंदविले होते. सेरी ए स्पर्धेत चमकलेला सिरो आंतरराष्ट्रीय मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करताना विशेष प्रभावी ठरलेला नाही ही बाब इटलीच्या समर्थकांना खटकते. ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अवघे दहाच गोल केलेले आहेत. २०१८ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी माजी जगज्जेत्या इटलीस पात्रता मिळविता आली नाही, त्यास सिरोच्या आघाडीफळीतील अपयशास काही प्रमाणात जबाबदार धरले जाते, असो. पण क्लब पातळीवरील या सेंटर-फॉर्वर्ड खेळाडूने लौकिक राखला आहे.

लाझिओ संघाचा शार्प शूटर
सेरी ए स्पर्धेत लाझिओ संघाने २०१९-२० मोसमात ३८ सामन्यांतून ७९ गोल नोंदविले, त्यापैकी ३६ गोल सिरो याने नोंदविले, यापैकी १४ गोल पेनल्टी फटक्यांवर आहेत. स्पेनमधील सेव्हिला एफसीकडून जुलै २०१६ मध्ये सिरो इटलीतील लाझिओ संघात दाखल झाला. त्यापूर्वी नवोदित असताना तो युव्हेंट्सकडून खेळलेला आहे. लाझिओचे मार्गदर्शक सिमोने इन्झाघी यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो याचा खेळ खुलला. रोममधील त्याच्या चाहत्यांतही वाढ झाली. सिरो याने सेरी ए स्पर्धेत गोलांचे शतकही पार केलेले आहे. २०२३ मधील मोसम संपेपर्यंत तो लाझिओ संघात असेल, साहजिकच सिरो याच्याकडून या संघाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिरो याला  
यंदाच्या वाटचालीत त्याचा स्पॅनिश संघसहकारी लुईस आल्बर्टो याची सुरेख साथ लाभली. या दोघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या रिंगणात धुमाकूळ घातला. सिरोने अधिकाधिक गोल केले, तर लुईस ‘असिस्ट किंग’ ठरला. या स्पॅनिश खेळाडूने प्रतिस्पर्धी बचावफळी चिरत आपल्या सहकाऱ्यांना अफलातून पास पुरविले. मोसमात लुईसने १५ असिस्टची नोंद केली, त्यापैकी सहा असिस्टवर सिरो याने गोल नोंदविले. नव्या मोसमात फुटबॉलप्रेमींची नजर सिरो-लुईस या जोडगोळीवर नक्कीच असेल.

संबंधित बातम्या