आखातात रंगणार आयपीएल

किशोर पेटकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

क्रीडांगण
 

कोरोना विषाणू महामारीमुळे भारतात या वर्षी २९ मार्चपासून नियोजित असलेली लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली. महामारीचा देशातील उद्रेक लक्षात घेता, स्पर्धा या वर्षी न होण्याचेच संकेत मिळू लागले. मात्र जगात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फासे टाकण्यास सुरुवात केली. सारे काही बीसीसीआयसाठी अनुकूल ठरू लागले. 

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढू लागली, अखेरीस तेथे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली. त्यामुळे या कालावधीत आयपीएल स्पर्धा घेण्यासाठी बीसीसीआयला आयतीच संधी मिळाली. आखातातील संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) आयपीएल आयोजनास तयारी दर्शविल्याने अखेर ६० सामन्यांची आयपीएल २०२० स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार इंडियाने गल्ला भरावा या उद्देशाने स्पर्धा दिवाळीपर्यंत लांबविण्यास आग्रह धरला आणि बीसीसीआयनेही अर्थकारण नजरेसमोर ठेवून त्यांना नाराज केले नाही. कोविडग्रस्त भारतात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल क्रिकेटची झिंग चढेल. 
मार्च

मध्यापासून भारतात क्रिकेट ठप्प आहे. क्रिकेटपटूही मैदानापासून दूर आहेत. दूरचित्रवाणीवर भारताचे क्रिकेट नसल्यामुळे क्रिकेटप्रेमीही कंटाळले आहेत. यूएई येथे होणाऱ्या आयपीएलमुळे साऱ्यांनाच हुरूप आलेला असेल. आयपीएल स्पर्धा परदेशात होणे नवलाचे नाही. देशातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा झाली होती, नंतर पुन्हा २०१४ मधील निवडणुकीमुळे स्पर्धेचा पूर्वार्ध संयुक्त अरब अमिरातीत रंगला होता. यंदा अमिरातीतील दुबई, शारजाह व अबूधाबी या शहरांत संपूर्ण आयपीएलचा प्रयोग रंगेल.

जैवसुरक्षा वातावरणाची मदत
जैवसुरक्षा वातावरणात क्रिकेट सुरळीतपणे खेळता येते हे इंग्लंडने दाखवून दिलेले आहे. तेच मॉडेल आता बीसीसीआय आयपीएलसाठी वापरत आहे. कोविड-१९ चाचणी अत्यावश्यक असेल. सुरुवातीला चाचण्या जास्त असतील. दुबईत गेल्यानंतर पुन्हा खेळाडूंना चाचणीस सामोरे जावे लागेल. चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास खेळाडू, संघाचा सपोर्ट स्टाफ, पदाधिकारी, असल्यास कौटुंबिक सदस्य सारेजण जैवसुरक्षा वातावरणात जातील. चाचणीत खेळाडू बाधित आढळल्यास सक्तीचे १४ दिवसीय विलगीकरण असेल. जैवसुरक्षा वातावरणात जाईपर्यंत कोरोना विषाणूबाबत सावधानता बाळगणे साऱ्यांसाठीच गरजेचे असेल. १९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेस सुरुवात होत असली, तरी त्यापूर्वीच संघ अमिरातीत दाखल झालेले असतील. आयपीएल स्पर्धेसाठी एसओपी तयार आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर राहील. 

चिनी पुरस्कर्ते दूर
भारत आणि चीन यांच्यातील लडाखमधील तणावग्रस्त परिस्थिती, भारतीय जवानांचे हौतात्म्य या पार्श्वभूमीवर चीनविरोधात भारतीयांत राग खदखदत आहे. केंद्र सरकारने चिनी ॲपवर बंदी लादली आहे. ‘बॉयकॉट चायना’ हा ट्रेंड समाजात रुळत आहे, मात्र बीसीसीआयने आयपीएलचे मुख्य पुरस्कर्ते असलेल्या विवो या चिनी मोबाइल कंपनीला सुरुवातीस दूर केले नाही. त्यामुळे लगेचच ‘बॉयकॉट आयपीएल’ हा ट्रेंड लोकप्रिय झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग असलेल्या स्वदेशी जागरण मंचनेही बीसीसीआयला कडाडून विरोध केला. विवो कंपनी मुख्य पुरस्कर्ते राखणे महागात पडू शकते हे लक्षात येताच बीसीसीआय व या चिनी कंपनीने किमान एका वर्षासाठी दूर होण्याचे ठरविले. २०१८ मध्ये विवो कंपनीने बीसीसीआयशी आयपीएल स्पर्धेनिमित्त पाच वर्षांचा करार केला होता, त्याअंतर्गत प्रतिवर्षी ४४० कोटी रुपये आयपीएल स्पर्धेला मिळत होते.

बीसीसीआय व विवो यांच्यात काडीमोड झाल्यामुळे आयपीएलसाठी नवा मुख्य पुरस्कर्ता येईल. या स्पर्धेची महती लक्षात घेता, यंदाची आयपीएल मुख्य पुरस्कर्त्याविना होण्याची शक्यता नाहीच. पाच वर्षांपूर्वी पेप्सी कंपनीने अचानक माघार घेतली होती, तेव्हाही बीसीसीआयचे अडले नव्हते. विवो कंपनीच्या माघारीमुळे बीसीसीआयला भारतीयांच्या तात्त्विक रोषापासून बचाव करता  आला. अमिरातीत खेळण्याच्या परवानगीसंदर्भात केंद्र सरकारकडून बीसीसीआयला मदतीचा हात हवा आहे, त्यामुळे चीनविरोधात असलेल्या केंद्र सरकारला नाराज करून अजिबात चालणार नव्हते. मंडळाचे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत. त्यामुळे सारी सूत्रे व्यवस्थित जुळून आली असे मानता येईल. संयुक्त अरब अमिरातील स्पर्धा खर्चीक असेल असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यापूर्वीच सांगितलेले आहे. त्यात कोविड चाचणीची भर पडल्यामुळे संयोजनाचा खर्च आणखीनच वाढेल. परिणामी सहभागी फ्रँचाईजी, तसेच बीसीसीआय यांच्या नफ्यात घट होणे अपेक्षित आहे, पण आयपीएल होतेय हे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या