अमेरिकन ओपनची उत्सुकता

किशोर पेटकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

क्रीडांगण

अमेरिकेत कोरोना विषाणूचे सर्वाधिक बाधित आणि मृतांची नोंद झाली आहे, तरीही ठरल्यानुसार न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मीडोजवर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ३१ ऑगस्टपासून खेळली जाईल. कोविड-१९ च्या धास्तीने बऱ्याच टेनिसपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामध्ये पुरुष गटातील गतविजेता स्पेनचा राफेल नदाल, महिला गतविजेती बिआन्का आंद्रीस्कू यांचा समावेश आहे. आरोग्यविषयक सुरक्षेच्या कारणास्तव नदाल खूपच सावध आहे. कोरोना विषाणूंचा संचार जगभर असल्याने हा ३४ वर्षीय दिग्गज हवाई प्रवास करायला इच्छुक नाही.

अमेरिकन ओपन १३ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळविण्यास आयोजकांनी प्राधान्य दिले असून जैवसुरक्षा वातावरणावरही त्यांचा भर आहे. शिवाय कोविड-१९ विषयक साऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांचे आश्‍वासन आहे. कोरोना विषाणू महामारीची तीव्रता लक्षात घेता, यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा होण्याबाबत साशंकता होती. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना स्पर्धा न होण्याचे संकेत मिळत होते. ब्रिटनमधील विंबल्डन स्पर्धा रद्द झाली, पण अमेरिकन ओपन आयोजक स्पर्धा ठरल्यानुसारच घेण्यावर ठाम राहिले. ऑगस्टअखेरचा मुहूर्त त्यांनी कायम ठेवला. अमेरिकन ओपननंतर मातीच्या कोर्टवरील फ्रेंच ओपन स्पर्धा पॅरिसमध्ये २७ सप्टेंबरपासून खेळली जाईल. अमेरिकन ओपन स्पर्धेचे आयोजन हे मोठे आव्हानच आहे, जे पेलण्याचा विश्‍वास आयोजकांना आहे. तशी ग्वाही त्यांनी सहभागी स्पर्धकांना दिली आहे. त्यामुळेच सुरुवातीची नकारघंटा बाजूला सारत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने न्यूयॉर्कमध्ये खेळण्याचे ठरविले, साहजिकच आयोजकांना मोठा दिलासा मिळाला.

जोकोविचचा यू-टर्न...
काही महिन्यांपूर्वी युरोपात कोरोना विषाणू महामारीचा रुद्रावतार असताना, १७ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने टेनिस स्पर्धांत भाग घेण्याविषयी नाखुषी व्यक्त केली होती. अमेरिकन ओपन सहभागाविषयी त्याची प्रतिक्रियाही नकारात्मक होती. फ्लशिंग मीडोजवरील स्पर्धेच्या सहभागाविषयीचा शिष्टाचार अतिशय कठोर असल्याने सहभाग अशक्यच असेल, असे मत या ३३ वर्षीय अव्वल टेनिसपटूने व्यक्त केले होते. आता त्याचे मतपरिवर्तन झाले असून तो चौथ्या अमेरिकन ओपन करंडकासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद त्याने दोन वर्षांपूर्वी जिंकले होते. मागील जून महिन्यात जोकोविचवर जगभरातून प्रचंड टीका झाली होती. त्याने आपल्या बंधूसह बाल्कन प्रदेशात एड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस मालिकेचे आयोजन केले होते. त्यात कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांची पायमल्ली झाली होती, परिणामी खुद्द जोकोविचसह टेनिसपटू व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर जोकोविचने या महामारीवर मात केली, कदाचित त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल आणि म्हणूनच तो अमेरिकन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यास आता तयार झाला असावा. अमेरिकन ओपन स्पर्धेपूर्वी जोकोविच वेस्टर्न अँड सदर्न ओपन स्पर्धेत खेळेल. या वर्षी सुरुवातीस ऑस्ट्रेलियन ओपन आठव्यांदा जिंकणाऱ्या या सर्बियन टेनिसपटूची ही महामारी कालावधीतील पहिलीच प्रमुख स्पर्धा असेल. जोकोविचला संभाव्य शह देण्यासाठी नदालने न्यूयॉर्कमध्ये खेळण्याचे टाळले आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम करंडक कामगिरीस गाठण्यासाठी नदालला फक्त एका विजेतेपदाची गरज आहे. ३४ वर्षीय नदालने गतवर्षासह चार वेळा फ्लशिंग मीडोजवर जेतेपद मिळविले आहे. यंदाही तो करंडकाचा दावेदार होता, पण त्याने महामारीच्या धास्तीने स्पर्धेपासून दूरच राहण्याचे ठरविले. कदाचित पूर्वतयारीचाही अभाव असावा.

सेरेनाचीही तयारी
महिला टेनिसमधील सुपर मॉम ३८ वर्षीय सेरेना विल्यम्सही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस सहभागासाठी तयारी करत आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये मुलीस जन्म दिल्यानंतर सेरेना अजूनही टेनिस कोर्टवर यश मिळविण्यास उत्सुक आहे. तिला मार्गारेट कोर्ट हिचा सर्वकालीन ग्रँडस्लॅम करंडकाचा विक्रम खुणावत आहे. सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून कोर्ट हिला गाठण्यासाठी तिला आणखी एका विजेतेपदाची गरज आहे. अमेरिकन ओपन स्पर्धा तिने यापूर्वी सहा  वेळा जिंकली आहे. न्यूयॉर्कमध्ये ती २०१४ मध्ये शेवटच्या वेळेस जिंकली होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाने प्रयत्न केला, पण तिसऱ्या फेरीतच तिला गाशा गुंडाळावा लागला. सेरेनाने मागील सलग दोन वर्षे अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली, परंतु घरच्या मैदानावर तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेली ही महान टेनिसपटू यंदा विक्रमाशी बरोबरी साधण्याची इच्छा बाळगून आहे. नव्या दमाच्या टेनिसपटूंकडून तिला कडवे आव्हान निश्चितच असेल.

संबंधित बातम्या