‘फायटर’ चेतन चौहान...!

किशोर पेटकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

क्रीडांगण
 

चेतेंद्र प्रतापसिंग चौहान... क्रिकेट जगतास या व्यक्तीची चेतन चौहान याच नावाने ओळख मिळाली, राजकारणातही ते याच नावाने परिचित राहिले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, तेही क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे लढाऊ वृत्तीने. कोरोना विषाणूला त्यांनी हरविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही, कारण- त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास ते जीवनातील अनिवार्य षटके जगत होते, वार्धक्य शरीर कोरोना विषाणूशी लढण्याइतपत सक्षम ठरले नाही. शेवटपर्यंत हसतमुख राहत भारताच्या या माजी सलामी फलंदाजाने जीवनाचा आनंद लुटला. 

क्रिकेटपटू या नात्याने त्यांची आपली कारकीर्द ३५ वर्षांपूर्वी आटोपती घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून प्रशासक या नात्याने ठसा उमटविला. राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे सदस्य, भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक या नात्यानेही त्यांनी छाप पाडली. कालांतराने राजकारणी झाले. भाजपाचे दोन वेळा लोकसभेचे खासदार या नात्याने प्रतिनिधित्व केले. मृत्युसमयी ते उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री होते. राजकीय क्षेत्रात वावरत असतानाही ते क्रिकेट मैदानाला विसरले नाहीत. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर सामना असल्यास दूरचित्रवाणीवर त्यांची छबी दिसायची. राजकीय मैदानावरील लढाईत पराभूतही झाले, पण नव्याने सज्ज होत उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार या नात्याने प्रवेश केला आणि मंत्रीही झाले. 

क्रिकेट मैदानावरही त्यांनी लढाऊ वृत्ती नेहमीच प्रदर्शित केली. १९६९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्यांना संघातील स्थान गमवावे लागले, तरीही निराश झाले नाहीत. जबडा फ्रॅक्चर असूनही धावांचा रतीब टाकला, निवड समितीला प्रभावित केले. १९७७ मध्ये त्यांनी भारतीय संघात पुनरागमन केले, त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. १९८१ पर्यंत देशाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले. न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्यांना वगळण्यात आले. हा कटू निर्णयही त्यांनी स्वीकारला. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेली येथील. सेनादलातील वडिलांची नियुक्ती पुण्यात झाली. क्रिकेटपटू या नात्याने चेतन यांची जडणघडण पुण्यात झाली. महाराष्ट्राच्या रणजी संघातून प्रथम श्रेणी क्रिकेट मैदानावर आले, ते दिल्लीकडूनही खेळले. 

शतकाची हुलकावणी

चेतन चौहान कसोटी कारकिर्दीत ४० सामने खेळले. २,०८४ धावा केल्या. त्यांनी १६ अर्धशतके केली, पण कधीच शतकी वेस ओलांडू शकले नाहीत. त्यांचा सलामीचा जोडीदार सुनील गावसकर यांनी शतकांची बहुमजली इमारत रचली. १९८०-८१ मोसमात एडलेड येथे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना करत त्यांनी खिंड लढविली, तेव्हाही शतकापासून फक्त तीन धावा दूर राहिले. तब्बल नऊ वेळा ते ८० आणि ९० धावांच्या आसपास बाद झाले. सुनील गावसकर यांचे ते सलामीचे सच्चे भागीदार होते. आजही सनी आणि चेतन यांच्या भक्कम, मजबूत, समजूतदार सलामी भागीदारीचे गोडवे गायले जातात. दोघांनी अकरा वेळा शतकी भागीदारी नोंदविल्या, त्यापैकी दहा वेळा ते सलामीस चिवटपणे खेळले. मेलबर्नच्या कसोटीत सुनील-चेतन जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या संयमाचा अंत पाहताना दुसऱ्या डावात १६५ धावांची सलामी दिली. त्यावेळी संशयास्पद बाद दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन्सच्या अर्वाच्य टोमण्यांनी सुनील चिडले आणि त्यांनी कर्णधार या नात्याने नाबाद असलेल्या चौहान यांना सामना सोडून परतीचा रस्ता धरण्याचा आग्रह केला, त्याचा परिणाम शतकाच्या वाटेवरील सहकाऱ्याच्या एकाग्रतेवर झाला असावा असे गावसकर यांना वाटते. १९७९ मध्ये सुनील व चेतन यांनी ओव्हल येथील कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणताना धीरोदात्त फलंदाजीने २१३ धावांची भागीदारी रचली होती, तेव्हाही चेतन शतक गाठू शकले नाहीत.   

धाडसी फलंदाज
चेतन चौहान बहुतांश कसोटी क्रिकेट परदेशी खेळपट्ट्यांवर खेळले. ऑस्ट्रेलियाचे जेफ थॉम्पसन, डेनिस लिली, लेन पास्को, रॉडनी हॉग, इंग्लंडचे बॉब विलिस, माईक हेन्ड्रिक, इयान बॉथम, न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली आदी तेजतर्रार गोलंदाजांना ते परदेशी खेळपट्ट्यांवर धैर्याने सामोरे गेले, त्यांना घाबरले नाहीत. चौहान यांनी पुनरागमन केले त्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डोक्याच्या  शिरस्त्राणाचा उपयोग होऊ लागला होता, गावसकर यांच्या सलामीच्या साथीदाराने हे आयुध वापरण्यास सुरुवात कली. खेळपट्टीवर भक्कमपणे उभे राहत एकाग्रपणे फलंदाजी हे चौहान यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या तंत्राला धाडसी फटक्यांचीही जोड होती. बॅकफूटवर त्यांची फलंदाजी बहरली. स्क्वेअर कट, हूक हे त्यांचे आवडते फटके. खंबीर मनोवृत्तीच्या बळावर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपली आगळी ओळख निर्मिली.

संबंधित बातम्या