बार्सिलोनाचा साफ धुव्वा

किशोर पेटकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

र्सिलोना एफसी हा केवळ स्पेनमधील नव्हे, तर युरोपातील बलाढ्य फुटबॉल संघ आहे. बार्सा या टोपणनावाने लोकप्रिय असलेल्या संघाचे चाहते जगभर विखुरलेले आहे. वलयांकित संघ असला, तर तो कायमचा अजेय संघ नाही, पराभवही त्यांच्या पदरी पडतात. पण काही दिवसांपूर्वी युरोपीय चँपियन्स लीग स्पर्धेत त्यांना पत्करावी लागलेली लाजिरवाणी हार साऱ्याच फुटबॉलप्रेमींसाठी धक्कादायक ठरली. 

जर्मनीच्या बायर्न म्युनिक या आणखी एका नावाजलेल्या संघाने बार्सिलोनाचा ८-२ फरकाने धुव्वा उडवून दणक्यात उपांत्य फेरी गाठली. चँपियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात बायर्न म्युनिक आणि बार्सिलोना या संघांनी प्रत्येकी पाच वेळा विजेतेपदाच्या करंडकासह जल्लोष केलेला आहे. लिस्बनमधील एस्तादियो दा लूझ मैदानावर बार्सिलोनाला साफ निष्प्रभ ठरविताना, हन्सी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखालील बायर्न म्युनिकने नव्वद मिनिटांच्या खेळात गोलधडाका राखला, त्यामुळे चुरशीची वाटणारी लढत अगदीच एकतर्फी ठरली. लाजिरवाण्या पराभवानंतर बार्सिलोना संघावर टीकेची झोड उठली. अनुभवी बचावपटू गेरार्ड पिके याने आपल्या संघाला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला. संघात सर्वप्रकारचे बदल अत्यावश्यक असल्याचे सांगत त्याने घरचा आहेर दिला. बार्सिलोना संघ थोराड होत असल्याची टीका होते, त्यात तथ्यही आहे. त्यांचा आघाडीफळीतील सुपरस्टार लिओनेल मेस्सी याच्यासह तब्बल सहा खेळाडू वयाची तिशी पार केलेले आहेत. मेस्सी तब्बल सोळा वर्षे बार्सिलोना संघाच्या जर्सीत फुटबॉल मैदाने गाजवत आहे. आता तो ३३ वर्षांचा आहे. आपल्या परीने मेस्सी जीव तोडून खेळतो, पण त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळत नाही. त्यामुळेच मागे ला-लिगा विजेतेपद हुकले, तेव्हा मेस्सी आपल्याच संघावर चिडला होता. ब्राझीलच्या फिलिप कुतिन्हो याला फार मोठी रक्कम देऊन इंग्लंडच्या लिव्हरपूलकडून बार्सिलोनाने आपल्या संघात घेतले. खेदाची बाब म्हणजे या २८ वर्षीय आक्रमक गुणवत्तेची कदर बार्सिलोनात झाली नाही, त्यानंतर त्याला बायर्न म्युनिककडे लोनवर खेळण्यास पाठविले. योगायोग पाहा, बार्सिलोनाच्या मोठ्या पराभवात याच कुतिन्होने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरत दोन गोल डागले. 

गतवैभवास गळती
कोरोना विषाणू महामारीमुळे खंडित झालेला फुटबॉल मोसम सुरू झाल्यानंतर, बार्सिलोना संघाच्या फॉर्मला गळती लागलेली दिसली. ला-लिगा विजेतेपदाच्या शर्यतीत त्यांना रेयाल माद्रिदने मागे टाकले. चँपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व लढतीत बायर्न म्युनिकच्या झंझावातासमोर बार्सिलोना संघ पाळापाचोळ्यागत उडून गेला. १९३५ मध्ये ला-लिगा स्पर्धेत बार्सिलोना संघाला रेयाल माद्रिदने ८-२ फरकाने हरविले होते, त्यानंतर १९४० मध्ये याच स्पर्धेत सेव्हिला क्लबने त्यांचा ११-१ फरकाने फडशा पाडला होता. त्यानंतर १९४६ साली स्पॅनिश कप स्पर्धेत सेव्हिला संघानेच बार्सिलोनास ८-० फरकाने नमविले होते. बार्सिलोनाच्या निराशाजनक कामगिरीची ही काही मोजकीच उदाहरणे होती. एकविसाव्या शतकात हा कॅटेलोनियाचा संघ खूपच भारी झाला. ला-लिगा, चँपियन्स लीग स्पर्धेत सारे प्रतिस्पर्धी त्यांना वचकून राहायचे, सध्या स्थिती पूर्ण बदललेली आहे. २००४ मध्ये मेस्सी बार्सिलोना संघात दाखल झाला, तेव्हापासून १० वेळा ला-लिगा, तर चार वेळा चँपियन्स लीग स्पर्धेत हा संघ विजेता ठरला आहे. एकंदरीत त्यांनी २६ वेळा ला-लिगा जिंकली आहे. बार्सिलोनाने चँपियन्स लीगमधील शेवटचे विजेतेपद पाच वर्षांपूर्वी मिळविले होते. आता मेस्सी संघात असूनही बार्सिलोना संघ दात-नखे गळालेल्या जर्जर सिंहासारखा आहे. हा वलयांकित संघ गतवैभव शोधू लागलाय.

प्रशिक्षकांना पाठविले घरी
बार्सिलोना संघाच्या पराभूत मानसिकतेसाठी खेळाडूंचे वाढते वय, तसेच प्रशिक्षक क्विके सेतियन यांना जबाबदार मानले जाते. बायर्नविरुद्धच्या क्लेषदायक पराभवानंतर संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षकांना डच्चू दिला. ही कारवाई अपेक्षितच होती. या वर्षी जानेवारीत सेतियन यांची बार्सिलोना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली. त्यांनी डच्चू मिळालेल्या अर्नेस्टो व्हाल्वेर्दे यांची जागा घेतली. सेतियन यांच्या हाती संघाची धुरा आल्यानंतर बार्सिलोना संघाचा आलेख सतत घसरत गेला. ला-लिगा गुणतक्त्यात मध्यंतरी  अव्वल राहूनही त्यांना विजेतेपद मिळविता आले नाही. कोपा डेल रे स्पर्धेतही त्यांना करंडकासाठी दावा सांगता आला नाही. चँपियन्स लीगमध्ये अपयशाचा कहरच झाला. कामगिरी अभ्यासता, स्पॅनिश फुटबॉलमध्ये सेतियन यांना सामान्य प्रशिक्षक मानले जाते, पण बार्सा संघाच्या कँप नाऊवर त्यांना लॉटरी लागली, पण सदुपयोग करता आला नाही. बार्सिलोना क्लबचे माजी खेळाडू रोनाल्ड कोमॅन यांची दोन वर्षांसाठी मुख्य प्रशिक्षकपदी आता नियुक्ती झाली आहे.

संबंधित बातम्या