सहाशे बळींचा मालक जिमी

किशोर पेटकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

तब्बल सतरा वर्षांपूर्वी, तेव्हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन एकदम तरुण होता. २१व्या वाढदिवसाला तीन महिने बाकी होते. झिंबाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पदार्पणातील डावात पाच गडी बाद करण्याची किमया या उमद्या गोलंदाजाने साधली. तेव्हापासून हा तेजतर्रार गोलंदाज आंग्ल क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. जिमी या नावाने क्रिकेट वर्तुळात ओळखला जाणारा हा वेगवान स्विंग गोलंदाज सहाशे बळी मिळविणारा कसोटी क्रिकेटमधील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. चाळीशीच्या उंबरठ्यावरील हा झुंजार वृत्तीचा गोलंदाज आता सातशे बळींचे लक्ष्य बाळगून आहे. 

वेगवान गोलंदाजाने इतका काळ कारकीर्द लांबविणे महत्प्रयासाचे काम आहे. वय वाढले तरीही जिमी अँडरसनचा वेग, गोलंदाजीतील दाहकता अजूनही कायम आहे. साऊदॅम्प्टन येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ३८ वर्षीय अँडरसनने ६०० बळींचा टप्पा गाठला. पावसाचा वारंवार व्यत्यय आलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या डावात अँडरसनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने प्रतिस्पर्धी कर्णधार अझहर अली याचा झेल पकडला आणि इंग्लंडच्या या विक्रमी गोलंदाजाने मैलाचा दगड गाठला. त्यापूर्वी पहिल्या डावात अँडरसनने टिपलेल्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की आली होती. अँडरसनने १५६ व्या कसोटी सामन्यात सहाशे विकेट्स मिळविल्या. अन्य गोलंदाजांशी तुलना करता, त्याला हा टप्पा गाठण्यासाठी त्याला जरा विलंबच लागला. इंग्लंडसाठी तो आता सर्वाधिक गडी बाद करणारा कसोटी गोलंदाज आहे. सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांत तो सध्या चौथा, तर जगभरातील वेगवान गोलंदाजांत अग्रेसर आहे.

जिगरबाज गोलंदाज
अतिशय कौशल्यपूर्ण स्विंग गोलंदाज असलेल्या अँडरसनने आपली क्रिकेट कारकीर्द नियोजनबद्ध लांबविली. सहा फूट दोन इंच उंचीच्या या गोलंदाजाने कसोटी क्रिकेटसाठी झटपट क्रिकेटला दूर केले. पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तो अकरा वर्षांपूर्वी शेवटच्या वेळी खेळला होता. शरीराची योग्य जोपासना करत त्याने जिगरबाज वृत्ती प्रदर्शित केली. मेहनत घेतली, दुखापतींवर मात करत पुनरागमनही साजरे केले. गेल्या वर्षी त्याला दुखापतीने चांगलेच सतावले, पण सावरत त्याने सहाशे बळींचा मान मिळविला. सध्याची त्याची तंदुरुस्ती आणि स्विंग गोलंदाजीतील प्रभुत्व पाहता, भारताच्या अनिल कुंबळेचे ६१९ बळी तो लवकरच मागे टाकेल. त्यानंतर शेन वॉर्न (७०८ बळी) त्याचे पुढील लक्ष्य राहील. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) याला मागे टाकणे तसे अवघडच असेल, कारण अँडरसनच्या साथीला वय नाही. तो आणखी किती काळ कसोटी क्रिकेट खेळतोय हे पाहणे उत्सुकतेचे असेल. काही दिवसांपूर्वी, इंग्लंडच्या कसोटी संघातील अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडने पाचशे बळींचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंडच्या या दोघा अनुभवी वेगवान द्वयीने अगोदर वेस्ट इंडीज आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध चांगला फॉर्म प्रदर्शित केला. इयान बोथमने कसोटी क्रिकेटमध्ये ३८३ विकेट्स नोंदविल्या, तेव्हा त्याचे इंग्लंडमध्ये मोठे कौतुक झाले होते. अँडरसन आणि ब्रॉडने नवा इतिहास रचला आहे. त्यात जिमीचे कर्तृत्व फारच मोठे आहे.

स्विंगचा बादशहा
सुरुवातीपासून जेम्स अँडरसन स्विंग गोलंदाजीसाठी गाजला. त्याने रिव्हर्स स्विंगमध्येही हुकमत प्राप्त केली. दिशा आणि टप्प्यावर जबरदस्त नियंत्रण असल्यामुळे अँडरसनची गोलंदाजी खेळणे अजूनही फलंदाजांना त्रासदायक ठरते. मैदानाबाहेर लाजाळू आणि मितभाषी ही त्याची ओळख असली, तर मैदानावर वेगवान गोलंदाजास साजेशी आक्रमकता त्याच्यात दिसते. सहा वर्षांपूर्वी ट्रेंट ब्रिज येथील कसोटीत अँडरसनने भारतीयांशी मैदानावर पंगा घेतला होता. रवींद्र जडेजाला बाद केल्यानंतर त्याला पॅव्हेलियनच्या दिशेने जाण्याचे हातवारे करणाऱ्या अँडरसनवर तेव्हा टीकाही झाली होती. त्याची गोलंदाजी इंग्लंडमधील वातावरणात जास्त धारदार ठरली. घरच्या मैदानावरील ८९ कसोटींत ३८४ विकेट्स टिपणाऱ्या अँडरसनने परदेशातील ६७ कसोटींत २१६ गडी बाद केले. दोन वर्षांपूर्वी त्याने द ओव्हलवरील कसोटीत भारताच्या महंमद शमी  याला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा (५६३ बळी) याला मागे टाकले, तेव्हाच त्याला सहाशे बळींचे वेध लागले होते. पाचशे ते सहाशे बळीपर्यंतच्या प्रवासात त्याला तीन वर्षे लागली. सातशे बळींचे लक्ष्य बाळगले असले, तरी कदाचित मधेच थांबावे लागू शकते, कारण वेगवान गोलंदाजाला आपल्या शरीराचे ऐकावेच लागते. तरीही वयाच्या ३८ व्या वर्षीपर्यंत कसोटी कारकीर्द यशस्वीपणे ताणणाऱ्या अँडरसनचे कौतुकही करायलाच हवे.

संबंधित बातम्या