परदेशी फुटबॉल प्रशिक्षकांचा दबदबा

किशोर पेटकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आरोग्यविषयक सुरक्षित उपाययोजनांसह खेळली जाईल. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर जैवसुरक्षा वातावरणात होणारी ही देशातील पहिली मोठी क्रीडा स्पर्धा असेल. देशातील दहा शहरातील संघांची स्पर्धा गोव्यातील तीन स्टेडियमवर बंद दरवाजाआड खेळली जाईल. सध्या प्रत्येक क्लबने संघ बांधणीवर भर दिला असून सर्व दहाही संघांचे प्रशिक्षक परदेशी आहेत. विदेशी प्रशिक्षकांची व्यावसायिकता, त्यांचा अनुभव भारतीय फुटबॉलसाठी मदतगार ठरत आहे. विशेष बाब म्हणजे, स्पेनमधील प्रशिक्षकांना आयएसएल स्पर्धेत जास्त मागणी आहे. 
आगामी आयएसएल स्पर्धेत स्पेनमधील सात प्रशिक्षक कार्यरत असतील. आयएसएल स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलमध्ये क्रांती झाली. दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणालाही मागील सहा मोसम लोकप्रियता लाभत आहे. आगामी सातव्या मोसमात एटीके व मोहन बागान हे कोलकात्यातील संघ एका झेंड्याखाली खेळताना दिसतील. या संघाचे ६३ वर्षीय प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास हे स्पेनचे. एटीके संघाने तीन वेळा आयएसएल स्पर्धा जिंकली आहे, त्यापैकी दोन वेळा हबास यांचे मार्गदर्शन कोलकात्याच्या संघाला लाभले. हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके संघाने २०१४ व २०१९-२० मोसमात बाजी मारली. मध्यंतरी हबास यांचे २०१६-१७ मोसमात पुणे सिटी संघाला मार्गदर्शन लाभले होते. एकंदरीत, भारतीय फुटबॉलमध्ये हा अनुभवी स्पॅनिश प्रशिक्षक चांगलाच स्थिरावल्याचे दिसून येते.

स्पॅनिश प्रशिक्षकांची छाप
हबास यांच्या व्यतिरिक्त अन्य स्पॅनिश प्रशिक्षकांनीही आयएसएल फुटबॉल स्पर्धेत छाप पाडली आहे. बंगळूर एफसीचे ५१ वर्षीय कार्ल्स कुआद्रात यांनीही यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरच्या संघाने २०१८-१९ मोसमात आयएसएल करंडक पटकाविला. २०१६-१७ मोसमात या संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर आल्बर्ट रोका या स्पॅनिश प्रशिक्षकाने राजीनामा दिल्यानंतर २०१८ पासून कुआद्रात मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत आहेत. स्पेनमधील झारागोझा येथील ४३ वर्षीय सर्जिओ लोबेरा यांची २०१७ ते २०२० या कालावधीत एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने कारकीर्द उल्लेखनीय ठरली. मागील आयएसएल अखेरच्या टप्प्यात असताना त्यांचे एफसी गोवा संघ व्यवस्थापनाशी बिनसले, त्यानंतर ते मायदेशी गेले आणि आता मुंबई सिटीचे प्रशिक्षक या नात्याने आयएसएल स्पर्धेत पुनरागमन करत आहेत. एफसी गोवा संघात लोबेरा यांची जागा बार्सिलोनातील ३९ वर्षीय ह्वआन फेरॅन्डो यांनी घेतली. गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने स्पेनमधील तारॅगोना येथील ३५ वर्षीय जेरार्ड नस यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. ते पूर्वी इंग्लंडमधील लिव्हरपूल संघाच्या प्रशिक्षण चमूत होते. आगामी आयएसएलमधील ते सर्वांत तरुण प्रशिक्षक आहेत. गतमोसमात मोहन बागानला आय-लीग स्पर्धा जिंकून दिलेले ४८ वर्षीय स्पॅनिश किबु विकुना यांनी आयएसएलमधील केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. हैदराबाद एफसीने आल्बर्ट रोका यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली, पण बार्सिलोना एफसीने त्यांना साहाय्यक प्रशिक्षकाची ऑफर दिली. रोका यांना हा वलयांकित प्रस्ताव नाकारणे कठीण गेले आणि हैदराबादला नवा प्रशिक्षक शोधावा लागला. त्यांनी आता बार्सिलोना येथील ५१ वर्षीय मान्युएल (मानोलो) मार्किझ यांना नियुक्त केले आहे.

अनुभव संपन्नता
जमशेदपूर एफसी, चेन्नईयीन एफसी, ओडिशा एफसी या संघांचे प्रशिक्षकही परदेशी असले, तरी ते बिगरस्पॅनिश आहेत. या तिन्ही प्रशिक्षकांपाशी अनुभव संपन्नता आहे. रुमानियात जन्मलेले ५६ वर्षीय हंगेरीयन साबा लाझ्लो यांच्याकडून चेन्नईयीनला खूप अपेक्षा आहेत. हा आयएसएलमधील दोन वेळचा माजी विजेता संघ आहे. लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखाली युगांडाच्या राष्ट्रीय संघाने मोठी प्रगती साधली होती. याशिवाय जर्मनी, हंगेरी, स्कॉटलंड, बेल्जियम, स्लोव्हाकिया, रुमानिया इत्यादी देशातील क्लबना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ओडिशाचे ६७ वर्षीय स्टुअर्ट बॅक्स्टर हे इंग्लंडमधील आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे ते प्रशिक्षक होते. फिनलंड, तसेच इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघालाही त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गतमोसमात चेन्नईयीन एफसी गट्यांगळ्या  खात होता, पण स्पर्धेच्या मध्यास ओवेन कॉयल यांची नियुक्ती झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने कमाल केली. ५४ वर्षीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. नव्या मोसमासाठी कॉयल यांची जमशेदपूर एफसीने मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आयर्लंड-स्कॉटलंडचे नागरिकत्व असलेल्या या प्रशिक्षकापाशी इंग्लिश प्रीमियर लीग आणि अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमधील अफाट अनुभव असून त्याची झलक गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत पाहायला मिळाली होती.

संबंधित बातम्या