भारताची बुद्धिबळातील स्वप्नपूर्ती

किशोर पेटकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू पाचवेळचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याने जागतिक बुद्धिबळात देशाची कीर्ती वृद्धिंगत केली आहे. चौसष्ट घरांच्या या बैठ्या खेळात आनंदमुळे भारताची मान नेहमीच ताठ राहिलेली आहे. आनंदच्या पराक्रमी पावलांवरून देशातील बाकी बुद्धिबळपटू मार्गाक्रमण करताना दिसतात. विशी आनंदने बुद्धिबळातील सारे मानसन्मान मिळविले आहेत, पण घरच्या कपाटात ऑलिंपियाड विजेतेपदाचे सुवर्णपदक नसल्याचे खंत त्याला सलत होती, ही उणीव नुकतीच दूर झाली. 

कोरोना विषाणू महामारीमुळे ४४वी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धा रद्द झाली, मात्र त्याचवेळी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने खेळविण्याची कल्पकता जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) दाखविली. स्पर्धेत १६३ देशांचे संघ सहभागी झाले. सीनियर पुरुष व महिला, ज्युनियर खेळाडू यांना एकत्रित आणत सांघिक पातळीवर ही स्पर्धा रंगली. अंतिम लढतीच्या वेळी स्पर्धेचा सर्व्हर डाउन झाला. या तांत्रिक अडचणीबद्दल भारतीय संघाने दाद मागितल्यानंतर, रशियन अध्यक्ष असलेल्या फिडेने तटस्थ निर्णय देत रशियासह भारताला ऑनलाइन ऑलिंपियाडचे संयुक्त विजेते जाहीर केले. अंतिम लढतीत तांत्रिक दोष उद्‍भवल्याने भारतीय संघ पिछाडीवर गेला, पण फिडेने भारतीयांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार नाही याची दक्षता घेतली आणि आनंदची स्वप्नपूर्ती झाली. तो भारतीय संघात होता, पण त्याने नेतृत्व केले नाही. तो मान नव्या दमाचा नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराती याला मिळाला होता. ऑलिंपियाड सुवर्णपदकाची तुलना खुद्द आनंदने १९८३ च्या क्रिकेटमधील विश्वकरंडक विजेतेपदाशी केली. साखळी फेरीत भारताने बलाढ्य चीनचा पाडाव केला. तांत्रिक दोषाला नाक मुरडत आर्मेनियाने माघार घेतल्याने भारतीय संघाचे काम आणखीनच सोपे झाले. आनंद, विदितसह पेंटाला हरिकृष्ण, कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका हे सीनियर खेळाडू लौकिकास जागले. दिव्या देशमुख, निहाल सरीन यांनीही जिगरबाज खेळ केला. भक्ती कुलकर्णी, आर. प्रग्नानंद, वंतिका अगरवाल, आर. वैशाली, अरविंद चिथंबरम यांनीही संघाच्या यशात वाटा उचलला. २०१४ मध्ये नॉर्वेत भारतीय पुरुष संघाने ऑलिंपियाडमध्ये ब्राँझपदक जिंकले होते, यावेळच्या निश्चयी कामगिरीमुळे पदकाचा रंग सोनेरी झाला.

राष्ट्रीय दखल आवश्यक
विश्वनाथन आनंद याने भारताच्या ऑलिंपियाड यशानंतर महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ऑलिंपियाड विजेतेपदाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी, खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जावे, असे मत आनंदने व्यक्त केले आहे. मागील काही वर्षांत सरकार दरबारी बुद्धिबळ खेळ दुर्लक्षित असल्याचे जाणवते. त्यातच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातील वादाचाही परिणाम जाणवत आहे. एकच महासंघ, पण दोन सत्ताकेंद्रे झाल्यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीस धोका संभवतो. बुद्धिबळ महासंघात एकोपा असणे खेळाडूंसाठी हितकारक आहे. बुद्धिबळातील शेवटचा अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू सात वर्षांपूर्वी सन्मानित झाला होता. २०१३ मध्ये बुद्धिबळपटू अभिजित गुप्ता अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता. आनंद स्वतः अर्जुन पुरस्कार विजेता असून भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी हा मानही त्याच्याचकडे आहे. त्याला आदर्शवत मानत, नव्या पिढीतील भारतीयांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात भरारी घेतली. देशात हा खेळ लोकप्रिय आहे. मुले मोठ्या संख्येने बुद्धिबळ खेळतात. योग्य प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणे उचितच ठरेल. पुढील वर्षीच्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बुद्धिबळपटू दिसतील ही अपेक्षा बाळगता येईल. बुद्धिबळात अत्युच्च स्थान मिळविलेल्या आनंदचे बोल दुर्लक्षित करण्याजोगे निश्चितच नाहीत.

ग्रँडमास्टर खेळाडूंत वाढ
विश्वनाथन आनंद भारताचा बुद्धिबळातील पहिला ग्रँडमास्टर आहे. १९८८ मध्ये तो देशाचा एकमेवाद्वितीय ग्रँडमास्टर झाला, तेव्हापासून या किताबधारक बुद्धिबळपटूंची देशातील संख्या वाढली आहे. भारतीय बुद्धिबळात सध्या ६६ ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहेत. आनंदने ऐतिहासिक कामगिरी रचल्यानंतर, सुरुवातीस देशातील ग्रँडमास्टर खेळाडूंची संख्या मर्यादितच होती, पण नव्या सहस्रकात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात खूपच प्रगती साधली, त्याचे अधिकांश श्रेय आनंदला जाते. कोनेरू हंपी हिने २००२ मध्ये  

आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदीत केली. ग्रँडमास्टर किताब मिळविणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. गतवर्षी डी. गुकेश याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर किताबाची पूर्तता करून नवा अध्याय लिहिला. ऑलिंपियाड सुवर्णपदक भारतीय बुद्धिबळपटूंसाठी प्रेरक आहे. बुद्धिबळ हा वैयक्तिक खेळ असला, तरी ऑलिंपियाडच्या माध्यमातून सांघिकतेचे सुरेख दर्शन घडते. भविष्यात या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाल्यास, भारतासाठी बुद्धिबळ हा पदक विजेता खेळ असेल.

संबंधित बातम्या