‘जोकर’ नोव्हाकचा नेम चुकला

किशोर पेटकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ठरल्यानुसार होणार का याबाबत शंका होती. कोरोना विषाणू महामारीसमोर आयोजकांनी हार मानली नाही. काही प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली, तरीही कडक आरोग्यसुरक्षा उपाययोजनांसह स्पर्धा सुरळीतपणे पुढे सरकली. न्यूयॉर्क सिटीतील प्लशिंग मीडोजवरील स्टँड्स रिकामे दिसले, तरीही खेळाडूंचा उत्साह दुणावणारा होता. स्पर्धा रंगत असताना, जागतिक पुरुष क्रमवारीत अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने डाग लावला. 

चौथ्या फेरीतील लढतीत मनासारखा खेळ होत नसल्याचा राग त्याने चेंडूवर काढला. यावेळी संतुलन गमावलेल्या जोकोविचचा नेम साफ चुकला. सर्व्ह चुकीच्या पद्धतीने झाल्यानंतर चेंडूची दिशा भरकटते, तसेच संयम गमावलेल्या रागीट जोकोविचकडून घडले. त्याने जोराने मारलेल्या चेंडूने थेट महिला लाईन जजच्या गळ्याचा वेध घेतला. अनपेक्षित आघातामुळे महिला लाईन जजच्या श्वसन यंत्रणेवर ताण आला, मात्र सुदैवाने वेदनेवर निभावले. सामना रेफरींनी नियमांचा आधार घेत ३३ वर्षीय जोकोविचला स्पर्धेतूनच निलंबित करून कारवाईबाबत सुवर्णमध्य साधला. या घटनेनंतर जोकोविचच्या बक्षीस रकमेवर कात्री आली, तसेच त्याचे मानांकन गुणही वजा होतील. चूक घडल्याची कबुली देत जोकोविचने माफीही मागितली. खेळाडूने मैदानावर खिलाडूवृत्तीनेच वागणे आवश्यक आहे हे सूचित करताना, तसेच खेळाडूंच्या विदुषकी चाळ्यांनाही चाप लागावा या उद्देशाने कारवाई योग्यच ठरते. आपल्याला निराशेवर काम करावे लागेल. माणूस आणि खेळाडू या नात्याने आपल्याला प्रगती आणि उत्क्रांतीसाठी धडा मिळाल्याचे सांगत जोकोविचने सुधारण्याची ग्वाही दिली आहे, ती आवश्यकच आहे.

अव्वल टेनिसपटू भरकटला
नोव्हाक जोकोविच याच्यासाठी २०२० वर्ष खराबच मानावे लागेल. टेनिस कोर्टवर तो सफल ठरला. वर्षाच्या सुरुवातीस ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्याने १७ वा ग्रँडस्लॅम करंडक पटकाविला, शिवाय अमेरिकन ओपनमधून निलंबित होण्यापूर्वी तो ओळीने २९ सामने अपराजित राहिला. कामगिरीत भरारी दिसली, पण वैयक्तिक पातळीवर त्याचा आलेख खालावला. युरोपातील कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर जोकोविचने साथीत प्रदर्शनीय टेनिस मालिकेचे आयोजन केले, मात्र कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांना तिलांजली देत ही मालिका खेळली जाऊ लागल्यामुळे जोकोविच टीकेचा धनी झाला. क्रोएशियातील स्पर्धेवेळी स्पर्धेतील खेळाडू व संबंधित मास्क न वापरता पार्टी करताना झळकले, त्यावेळी जगभरातून जोकोविचची निंदा झाली. त्याला उपहासाने ‘जोकोविड’ हे टोपणनाव बहाल करण्यात आले. कोरोनाच्या संगतीत झालेल्या त्या स्पर्धेच्या कालावधीत स्वतः जोकोविच कोरोनाबाधित झाला. ऑगस्टमध्ये तो आणखी एका ऑफ-कोर्ट कारणास्तव चर्चेत राहिला. त्याने खेळाडूंची समांतर संघटना स्थापली, पण त्यास टेनिस जगतातील दिग्गज रॉजर फेडरर व राफेल नदाल यांचा पाठिंबा लाभला नाही. जागतिक टेनिस संघटनेनेही जोकोविचवर ताशेरे ओढले. टेनिस स्पर्धेतील पुरुष व महिला खेळाडूंच्या बक्षीस रकमेसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दलही जोकोविचकडे पाहून नाक मुरडले गेले. त्याच्या प्रतिकूल मताचा चांगलाच समाचार घेतला गेला. एकंदरीत मैदानावर अतिशय प्रतिभाशाली खेळ करणारा हा सर्बियन टेनिसपटू वैयक्तिक पातळीवर वारंवार चुकताना दिसत आहे. त्यामुळे त्याला अधिक संख्येने ‘थम्स डाउन’ मिळू लागलेत.

यापूर्वी इतरांचेही निलंबन
टेनिस कोर्टवर यापूर्वीही खेळाडूंकडून अप्रिय घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे निलंबनही झाले आहे. १९६३ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत स्पेनच्या विली अल्वारेझ याची गैरकृत्याबाबत स्पर्धेतून हकालपट्टी झाली होती. तीस वर्षांपूर्वी अमेरिकेचा जॉन मॅकेन्रो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘बॅडबॉय’ ठरला होता. १९९० मध्ये त्याने नियमाचे उल्लंघन केल्यामुळे स्पर्धेतून निलंबन झाले होते, तेव्हा टेनिस वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. टेनिसपटू व चेअर अंपायर (सामना पंच) यांच्यातील वाद नित्याचेच. तीन वर्षांपूर्वी डेव्हिस कप लढतीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोवला बडतर्फ करण्यात आले होते. त्याने चेअर अंपायरच्या चेहऱ्यावर चेंडू मारला होता. १९९५ मधील विंबल्डन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या लढतीत टिम हेन्मन याने बॉल गर्लच्या डोक्यावर चेंडू मारला, परिणामी त्याला  सहकारी जेरेमी बेट्स याच्यासह डच्चू मिळाला. १९९५ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत जर्मनीच्या कारस्टेन एरियन्स याने ताकीद मिळूनही लाईन जजला रॅकेट मारले होते, त्यामुळे त्याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मैदानावर पंचांचा निर्णय मान्य नसेल, तर खेळाडू वाद घालताना दिसतो, खिलाडूवृत्तीस आव्हान दिले जाते, जे योग्य नसते. क्रीडापटू संयम गमावून बसतो आणि अप्रिय घटनांना सामारे जावे लागते. 

संबंधित बातम्या