शतकवीर ‘गोल मशीन’ रोनाल्डो

किशोर पेटकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

जागतिक फुटबॉलमधील सुपरस्टार पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोस गोल मशीन मानले जाते. क्लब पातळीवर साडेचारशे गोल आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गोल शतक! 

पोर्तुगालमधील मदेरा प्रांतातील फुंचाल येथे ५ फेब्रुवारी १९८५ रोजी जन्मलेला रोनाल्डो फुटबॉलमधील महानायकच आहे. तो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दोघेही सध्याच्या फुटबॉलमधील दिग्गज; नेहमीच त्यांची तुलना होते. स्पेनमध्ये रेयाल माद्रिदकडून रोनाल्डो, तर बार्सिलोना एफसीकडून मेस्सी खेळत असताना या दोघांतील जुगलबंदी साऱ्या फुटबॉल विश्वाला मोहित करत असे. मागील दोन वर्षांपासून रोनाल्डो इटलीतील युव्हेंटस संघाकडून खेळू लागल्यानंतर, ला-लिगा मैदानावरील अलौकिक द्वंद दुर्लभ झाले. तरीही, अजूनही कामगिरीचे मोजमाप करताना रोनाल्डो, की मेस्सी सरस ही चर्चा नेहमीच रंगते. रोनाल्डो हा मेस्सीपेक्षा दोन वर्षांनी मोठा. दोघांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समकालीन. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासाठी त्यांच्यातच चुरस असते. आंतरराष्ट्रीय गोल नोंदविण्याच्या बाबतीत मात्र रोनाल्डोने मेस्सीला खूपच मागे टाकले आहे, कदाचित पोर्तुगीज खेळाडूस गाठणे अर्जेंटिनाच्या आघाडीपटूस शक्यही होणार नाही. 

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल शतक नोंदविणारा रोनाल्डो हा अवघा दुसराच जागतिक फुटबॉलपटू आहे. भविष्यात लवकरच त्याच्या नावे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम नोंदीत होऊ शकतो. ३५ वर्षीय रोनाल्डोने युरोपियन नेशन्स लीग स्पर्धेत स्वीडनविरुद्ध दोन गोल डागून १६५ सामन्यांतून गोलसंख्या १०१ वर नेली. आता त्याच्यापुढे इराणचा आघाडीपटू अली देई आहे. त्याने १९९३ ते २००६ या कालावधीत १४९ सामन्यांत १०९ गोल नोंदविले. तुलनेत मेस्सी खूपच पिछाडीवर आहे.  २००५ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १३८ सामन्यांतून ७० गोल नोंदविले आहे. सद्यपरिस्थिती पाहता, रोनाल्डोस गाठणे किंवा गोल शतक नोंदविणे मेस्सीसाठी अशक्यप्राय बाब असेल. क्लब पातळीवर युरोपियन चँपियन्स लीग स्पर्धेत रोनाल्डोने १३१ गोल नोंदविले आहेत, तुलनेत बार्सिलानो संघात नाराज असलेला मेस्सी १६ गोलनी मागे आहे. 

यशस्वी कारकीर्द
सात क्रमांकाच्या जर्सीमुळे ‘सीआर७’ ही ओळख असलेल्या रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीस २००३ मध्ये सुरुवात झाली. सलग १७ वर्षे तो पोर्तुगीज संघाचा हुकमी आघाडीपटू आहे. क्लब पातळीवर लिस्बनमधील स्पोर्टिंग क्लबतर्फे प्रकाशझोतात आल्यानंतर इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेडकडून सहा वर्षे खेळताना त्याने मोठा नावलौकिक मिळविला. नंतर स्पेनमधील रेयाल माद्रिदने त्याला विक्रमी रक्कम मोजून आपल्या संघात घेतले. माद्रिदमधील नऊ वर्षांच्या कारकिर्दीत रोनाल्डोने अजरामर खेळ केला, त्याची लोकप्रियता गगनभेदी ठरली. देशाकडून अथवा क्लबकडून खेळताना रोनाल्डोने सर्वोत्तम अष्टपैलू खेळाने वाहव्वा मिळविली. पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोस विश्वकरंडक अजून जिंकता आलेला नाही, पण चार वर्षांपूर्वी युरो करंडक पटकावण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. यजमान फ्रान्सविरुद्ध पोर्तुगालने अतिरिक्त वेळेतील खेळात बाजी मारली, पण २५व्या मिनिटास जायबंदी झालेल्या रोनाल्डोस मैदान सोडावे लागेल, त्यानंतरही संघाला प्रोत्साहित आणि प्रेरित करणारा रोनाल्डो आदर्श कर्णधार ठरला. पायातील जादू आणि अफाट नैसर्गिक गुणवत्ता यामुळे रोनाल्डोने गर्भश्रीमंती प्राप्त केली. वय वाढले, तरीही त्याचा खेळ ओसरलेला नाही. भन्नाट वेगाने धावत, नेत्रदीपक ड्रिबलिंगने प्रतिस्पर्धी बचावफळी चिरल्यानंतर, चेंडूवर पूर्ण स्वामित्व राखत, जबरदस्त नियंत्रण आणि कल्पकतेने गोल करणाऱ्या आणि त्यानंतर अपूर्व जल्लोष करणाऱ्या रोनाल्डोचा बहार अजून कायम आहे. त्याची थक्क करणारी तंदुरुस्ती, फुटबॉलप्रती उत्कट प्रेम पाहता, तो यापुढेही त्वेषाने खेळत अधिकाधिक विक्रम रचत राहिल्यास नवल वाटू नये.

अष्टपैलू कामगिरी
रोनाल्डोने १२ जून २००४ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिला गोल झळकविला. तेव्हापासून गोल नोंदविण्याची भूक वाढतच गेली. दोन्ही पायांनी अप्रतिम खेळ करणाऱ्या रोनाल्डोस दैवी गुणवत्ता लाभली आहे, त्यास त्याने कठोर मेहनतीची जोड दिली आहे. उजव्या पायाने त्याचा खेळ जास्त खुलतो, या पायाने त्याने ५५ गोल  नोंदविले. डाव्या पायानेही चेंडूवर ताबा राखत तो तेवढेच प्रेक्षणीय गोल करतो. या पायाच्या मदतीने त्याने २२ गोल केले आहेत. त्याने हेडद्वारे २४ गोल नोंदवून गोलनेटसमोरील भेदकता प्रदर्शित केली आहे. रोनाल्डोने नऊ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळताना, शंभरावा गोल लाजवाब फ्रीकिक फटक्यावर नोंदविला. त्याने मैदानी खेळाद्वारे ६७ गोल डागले, तुलनेत २४ गोल पेनल्टी, तर १० गोल पेनल्टी फटक्यांवरील आहेत. यावरून मैदानी खेळातील त्याची चेंडूवरील हुकमत आणि प्रभुत्व सिद्ध होते. 

संबंधित बातम्या