गोडवा पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचा

किशोर पेटकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

ऑस्ट्रियाचा २७ वर्षीय टेनिसपटू डॉमनिक थिम ग्रँडस्लॅम करंडक उंचावण्याच्या बाबतीत तीन वेळा अपयशी ठरला, चौथ्या वेळेसही त्याच्या हातून करंडक निसटण्याच्या स्थितीत होता, पण हा जिद्दी टेनिसपटू वेळीच सावरला. दोन सेट्सच्या पिछाडीवरून त्याने जबरदस्त उसळी घेतली आणि व्यावसायिक कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम यश साकारले. त्याच्यासाठी या यशाचा गोडवा अवर्णनीय ठरला, तर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याच्या ओठाशी आलेला विजयाचा घास हिसकावला गेला. बाकी तीनपैकी एक सेट जिंकला असता, तर २३ वर्षीय जर्मन खेळाडू कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम करंडकाचा मानकरी ठरला असता. 

टेनिसप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाविना झालेल्या यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना नाट्यमय आणि भावपूर्ण ठरला. झ्वेरेवने पहिले दोन सेट्स जिंकले तेव्हा तिला चँपियनशिप खुणावत होती, पण थिमच्या मनात वेगळेच विचार घोंघावत होते. तो पेटून उठला. पुढील दोन्ही सेट जिंकून बरोबरी साधली, निर्णायक पाचव्या सेटमध्ये त्याने टायब्रेकरद्वारे बाजी मारली. विजयाने बेभान होत त्याने आर्थर अॅश स्टेडियमच्या मुख्य कोर्टवर स्वतःला झोकून घेतले. पराभवाच्या खाईतून त्याने दिलेली झुंज अफलातून ठरली, दुर्दैवाने कोविड-१९ मुळे त्याच्या झुंजार खेळास दाद देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट नव्हता. थॉमस मस्टर याच्यानंतर पुरुष एकेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारा थिम हा दुसराच ऑस्ट्रियन टेनिसपटू ठरला. मस्टरने १९९५ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये किताब पटकाविला होता. अमेरिकन ओपन जिंकणारा पहिला ऑस्ट्रियन हा मानही थिमने प्राप्त केला.

तब्बल ७१ वर्षांनंतर...!
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत पहिले दोन्ही सेट गमावल्यानंतर एखाद्या खेळाडूने विजेतेपदास गवसणी घालण्याची जिगर दुसऱ्यांदा अनुभवण्यास मिळाली, तीही तब्बल ७१ वर्षांनंतर! सन १९४९ मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्याच पांचो गोन्झालेझ याने लढाऊ बाणा प्रदर्शित करत विजेतेपद खेचून आणले होते. त्याने देशवासीय टेड श्रोडर याला १६-१८, २-६, ६-१, ६-२, ६-४ फरकाने पराजित केले होते. या वर्षी थिमने इतिहासाची पुनरावृत्ती करताना झ्वेरेव याला २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ (६) असे हरविले. चार तासांच्या कालावधीत दोन्ही खेळाडूंनी ताकदवान खेळ केला. विशेषतः झ्वेरेव याची बिनतोड सर्व्ह सुसाट ठरली. अंतिम लढतीत त्याने एकंदरीत १५ बिनतोड सर्व्हची नोंद केली, परंतु त्याच्याकडून दुहेरी चुका जास्त झाल्या आणि तो खेळावरील नियंत्रण गमावून बसला. थिमने आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास राखत निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यावर भर दिला. अमेरिकन ओपनमधील आपल्या कामगिरीने प्रेरित होत झ्वेरेवने आपण ग्रँडस्लॅम स्पर्धा भविष्यात नक्कीच जिंकू शकेन हा विश्वास व्यक्त केला आहे.

नवा विजेता चेहरा
डॉमनिक थिमने जून २०१६ मध्ये जागतिक पुरुष एकेरी टेनिस क्रमवारील पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविले. तेव्हापासून चार वर्षांच्या कालावधीत तो टॉप टेन खेळाडूंत कायम आहे, कामगिरीतील सातत्यामुळेच त्याला हे साध्य झालेय. अमेरिकन ओपन सुरू होण्यापूर्वी तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होता. अमेरिकन किताब जिंकण्यापूर्वी तीन वेळा त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर उपविजेतेपदाची निराशाजनक छटाच दिसली. २०१८ व २०१९ मध्ये तो रोलाँ गॅरोच्या मातीच्या कोर्टवर अंतिम फेरीत खेळला, पण फ्रेंच ओपनमध्ये दोन्ही वेळेस क्ले कोर्ट किंग राफेल नदाल त्याला भारी ठरला. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत थिमने धडक मारली, मात्र नोव्हाक जोकोविचचा झंझावात रोखणे त्याला अशक्य ठरले. जागतिक पुरुष टेनिसमधील बिग थ्री यावेळेस अमेरिकन ओपन किताबासाठी आव्हानवीर नव्हते. २० ग्रँडस्लॅम जिंकलेला ३९ वर्षीय रॉजर फेडरर तंदुरुस्तीच्या कारणास्तव न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियमवर दिसला नाही. कोरोना विषाणूच्या धास्तीने राफेल नदालने अमेरिकेत येण्याचे टाळले. १९ ग्रँडस्लॅम करंडक जिंकलेल्या खेळाडूस स्पेन ते अमेरिका हा हवाई प्रवास सुरक्षित वाटला नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचला आपल्या रागावर नियंत्रण राखता आले नाही. त्याने  मारलेल्या चेंडूने थेट महिला लाईन जजच्या गळ्याचा वेध घेतला, परिणामी चौथ्या फेरीत १७ ग्रँडस्लॅम विजेत्या सर्बियन खेळाडूस स्पर्धेतून अपात्र करण्यात आले. समाधानाची बाब म्हणजे, बऱ्याच कालावधीनंतर ग्रँडस्लॅम करंडक उंचावताना नवा चेहरा दिसला.

संबंधित बातम्या