कृष्णवर्णीय आंदोलनाचा चेहरा

किशोर पेटकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

न्यूयॉर्कमधील अमेरिकन ओपन, टेनिस कोर्टवर रंगत असताना फ्लशिंग मीडोजवरील आर्थर अॅश स्टेडियमचे स्टँड्स कोविडमुळे रिकामेच होते, तरीही जपानच्या नाओमी ओसाका हिने वर्णद्वेषी आंदोलनास समर्थन देणारा संदेश जगभर पोहचविला. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, पत्रकार परिषदा, समाज माध्यमे याद्वारे २२ वर्षीय नाओमीने वर्ण भेदभावामागच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. स्पर्धेच्या कालावधीत ती कृष्णवर्णीय आंदोलनाचा चेहराच झाली. 

अंतिम लढतीत नाओमीने बेलारसच्या ३१ वर्षीय व्हिक्टोरिया अझारेन्का हिला हरवून कारकिर्दीतील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत ती दुसऱ्यांदा चँपियन झाली. न्यूयॉर्कमध्येच २०१८ मध्ये नाओमीने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला हरवून वयाच्या विसाव्या वर्षी पहिल्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा जल्लोष केला होता. २०१९ मध्ये पेत्रा क्विटोवा हिला हरवून तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. यावेळेस तिने पहिला सेट गमावूनही सामना १-६, ६-३, ६-३ असा जिंकताना जबरदस्त इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडविले. अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर विजेतेपद मिळविणारी ती १९९४ नंतरची पहिलीच महिला विजेती ठरली. तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पहिली आशियाई टेनिसपटू आहे. यापूर्वी चीनच्या ली ना हिने दोन वेळा ग्रँडस्लॅम करंडक पटकावला होता. स्पर्धेची पहिली फेरी ते अंतिम लढत यापर्यंतच्या वाटचालीत नाओमी सात सामने खेळली. प्रत्येक सामन्याच्या कालावधीत तिने वर्णद्वेषी आंदोलनास पाठिंबा देणारे मास्क चेहऱ्यावर लावले. अमेरिकेतील गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या क्रूरतेस बळी पडलेल्या सात कृष्णवर्णीयांची तिने निवड केली. वर्णद्वेषी हिंसेत प्राण गमावलेल्या दुर्दैवी कृष्णवर्णीय व्यक्तीचे नाव असलेला मास्क नाओमीच्या चेहऱ्यावर ठळकपणे लक्ष वेधायचा. अंतिम फेरीतील लढतीच्या वेळी मास्कवर तामीर राईस याचे नाव होते. हा १२ वर्षीय निष्पाप मुलगा २०१४ मध्ये गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळीला बळी पडला होता. 

अगोदरच नियोजन
अमेरिकन ओपनची आपण अंतिम फेरी गाठणार या दृढनिश्चयानेच नाओमीने ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर (बीएलएम) या आंदोलनास पाठिंबा देण्याचे नियोजन केले. वर्ण भेदभावाविरोधात तीव्र जनभावना केवळ अमेरिकतच नव्हे, तर जगभरात उसळत आहेत. या चळवळीचा भाग होत नाओमीने कृष्णवर्णीयांना पाठिंबा दर्शविला आहे. तिचे वडील हैती देशातील, आई जपानी. नाओमी आपल्या आईचे आडनाव वापरते व जपानचे प्रतिनिधित्व करते. तिला आपल्या अश्वेत वर्णाचा मोठा अभिमान आहे. तिचा जन्म जपानमधील, पण बालपण अमेरिकेत गेले. तेथेच टेनिस कारकिर्दीची सुरुवात झाली. या कालावधीत तिने वर्णद्वेषाचे असह्य चटके सहन केले आहेत. नाओमीप्रमाणे जगभरातील विविध क्रीडापटूंनीही वर्णद्वेषाविरोधातील चळवळीस बळकटी दिली आहे. विस्कॉन्सिनमधील एका कृष्णवर्णीयावरील गोळीबारप्रकरणी अमेरिकेतील क्रीडापटूंनी बळीस श्रद्धांजली वाहिली आणि निषेधही नोंदविला. त्या मोहिमेची पाठराखण करत नाओमीने वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्धच्या अंतिम लढतीत ती जायबंदी झाली. ती स्पर्धा काही जिंकता आली, पण अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत अडखळत सुरुवात होऊनही नाओमीने अझारेन्काविरुद्ध सरस कामगिरी केली. एक तास ५३ मिनिटांत विजय प्राप्त केला. कृष्णवर्णीय आंदोलनाच्या अनुषंगाने तिचे यश यादगार ठरले. स्वतः नाओमीने अंतिम लढतीनंतर, आपल्यासाठी हा अभूतपूर्व क्षण असल्याचे जाहीर केले.

सुपर मॉमचे स्वप्न भंगले
यंदाच्या अमेरिकन ओपनमधील महिला एकेरीत आई झालेल्या सुपर मॉम खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली. सेरेना विल्यम्सचे २४व्या ग्रँडस्लॅम करंडकाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अझारेन्कानेच तिला उपांत्य लढतीत हरविले. स्वतः अझारेन्काही सुपर मॉम आहे. २०१३ मध्ये अंतिम लढतीत सेरेनाकडून पराजित झाल्यानंतर बेलारसची ही जिद्दी महिला प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळत होती. शारीरिक दुखापती, नंतर मुलाच्या स्वामित्वासाठी न्यायालयीन लढाईची प्रक्रिया यामुळे काही काळ तिचे स्पर्धात्मक टेनिसकडे दुर्लक्षच झाले. व्हिक्टोरिया दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेती आहे. २०१२  आणि २०१३ मध्ये ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेती ठरली. अमेरिकन ओपनमध्ये तिला तिसऱ्यांदा (२०१२, २०१३, २०२०) अंतिम लढतीत हार पत्करावी लागली. यावेळेस बिगरमानांकित व्हिक्टोरिया पराभूत झाली, तरीही तिचा लढाऊ बाणा स्पृहणीय ठरला. अमेरिकन ओपनपूर्वी वेस्टर्न अँड सदर्न टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून तिने डिसेंबर २०१६ मधील मुलाच्या जन्मानंतर प्रथमच विजेतेपदाचा करंडक जिंकला.........................................

संबंधित बातम्या