जिगरबाज डीनो...

किशोर पेटकर
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

क्रीडा मैदानावर काही घटना, निकाल, निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित ठरतात. असेच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या बाबतीत घडले. अगोदरच्या रात्री संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील सामन्याचे त्यांनी मुंबईतील स्टुडिओमधून समालोचन केले, खेळासंबंधी आपली अभ्यासू मते मांडली. दुसऱ्याच दिवशी सकाळी सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना ते कोसळले आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरे काही अविश्वसनीय. या जिगरबाज ऑसी क्रिकेटपटूची इहलोकीची इनिंग आकस्मिक संपुष्टात आली, वयाच्या ५९व्या वर्षी. 

जिद्दी, धाडसी क्रिकेटपटू ही डीन जोन्स यांची ओळख, क्रिकेट वर्तुळात ते डीनो या टोपणनावाने परिचित होते. अतिशय हुशार आणि तल्लख क्रिकेटपटू असलेल्या जोन्स यांचे खेळासंबंधी मत, विश्लेषण नेहमीच परिपक्व ठरले. जोन्स यांचे निधन भारतातच व्हावे हा निव्वळ योगायोग ठरावा. त्यांनी मार्च १९८४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कॅरेबियन भूमीत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सप्टेंबर १९८६ मध्ये मद्रास (आताचे चेन्नई) जोन्स यांनी साकारलेली २१० धावांची धाडसी खेळी अजरामर ठरली. उष्ण-आर्द्र हवामानात निर्जलीकरणामुळे शरीर फिके पडले, प्रतिकुल हवामानामुळे फलंदाजी करत असताना हा फलंदाज खेळपट्टीच्या बाजूलाच ओकला, अंगाची लाहीलाही होत होती, तरीही हा फलंदाज नरमला नाही. हा योद्धा खेळपट्टीवर लढतच राहिला. एकदोन नव्हे, तब्बल साडेआठ तास किल्ला लढवत भारतीय गोलंदाजांना सामोरा गेला. ती ऐतिहासिक लढत टाय झाली. बरोबरीत राहिलेला कसोटी क्रिकेटमधील अवघा दुसराच सामना ठरला. त्यानंतर जोन्स यांच्याकडे क्रिकेट मैदानावर खूपच आदराने पाहिले गेले. तिसऱ्या क्रमांकावरील ते ऑस्ट्रेलियन संघाचे आधारस्तंभ ठरले. तेव्हा कांगारूंच्या संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर नव्याने बांधणी होत होती, जोन्स या नवनिर्मित संघाचे हुकमी शिलेदार ठरले. १९८७ मध्ये भारतातील कोलकात्यात झालेली विश्वकरंडक अंतिम लढत जिंकून अॅलन बोर्डर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने प्रथमच जगज्जेतेपद मिळविले, त्या यशात जोन्स यांचा मोलाचा वाटा राहिला.

चपळ, आक्रमक शैलीचा क्रिकेटपटू
डीन जोन्स यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदय झाला, तेव्हा झटपट क्रिकेट बाळसे धरत होते. मद्रास कसोटीत जोन्स यांनी चिवट फलंदाजीचे अफलातून प्रदर्शन घडविले, पण झटपट क्रिकेटमधील कामगिरीसाठी ते जास्त ओळखले गेले. याचे कारण त्यांची शैली ठरली. गोलंदाज कोणताही असो, जोन्स यांनी आक्रमकतेला मुरड घातली नाही. परिस्थितीनुरूप आत्मविश्वासाने फलंदाजी करताना ते नेहमीच कल्पक ठरायचे. त्यांचे पदलालित्य अप्रतिम होते. एकेरी-दुहेरी धाव पूर्ण करताना वेगाने पळणे, क्षेत्ररक्षणातील चपळता यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्येही जोन्स स्थिरावले. दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांची सरासरी ४५च्या आसपास राहिली. कसोटी क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची कारकीर्द दोन वर्षांनी जास्त ठरली. १९८४ ते १९९२ या कालावधीत ते ५२ कसोटी सामने खेळले. त्यात ४६.५५ची सरासरी आणि ११ शतकांच्या मदतीने त्यांनी ३६३१ धावा केल्या. सप्टेंबर १९९२ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळले तेव्हा ते ३१ वर्षांचे होते. १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली तेव्हा जोन्स यांच्या खाती १६४ एकदिवसीय सामन्यांतून ४४.६१च्या सरासरीने ६०६८ धावा जमा झाल्या होत्या, बरोबर सात शतकेही होती. वडील बार्नी यांनी जोन्स यांना क्रिकेट शिकविले. व्हिक्टोरियात क्लब क्रिकेट खेळलेल्या बार्नी यांनी आपल्या मुलाच्या उपजत गुणवत्तेला पैलू पाडले.

निवृत्तीनंतरही क्रिकेटचाच ध्यास
आंतरराष्ट्रीय मैदानावरून निवृत्त झाल्यानंतर, डीन जोन्स यांनी क्रिकेटचाच ध्यास घेतला. समालोचक, प्रशिक्षक या नात्याने ते वेगवेगळ्या भागात कार्यरत राहिले. विशेषतः भारतात त्यांच्या समालोचनास खास चाहता वर्ग लाभला, त्यांची समालोचन शैली आगळी होती, त्यातून क्रिकेटचे अफाट ज्ञान प्रदर्शित होत असे. मात्र चौदा वर्षांपूर्वी त्यांचे समालोचन वादग्रस्त ठरले होते. श्रीलंका दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या लांब दाढीवाल्या हाशीम आमला याला समालोचन करताना ‘दहशतवादी’ संबोधल्याबद्दल जोन्स यांच्यावर प्रचंड टीका झाली. संबंधित चॅनेलला आणि जोन्स यांनाही जाहीर माफी मागावी लागली. समलोचन मंडळातील जागेवर या ऑस्ट्रेलियन दिग्गजास पाणी सोडावे लागले. कालांतराने समालोचक भूमिकेत जोन्स यांनी पुनरागमन केले. काही वर्षांपूर्वी ते प्रशिक्षकाच्या जबाबदारीतही दिसले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्यांनी इस्लामाबादच्या संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीपणे पेलले. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही त्यांनी अर्ज केला होता. गतवर्षी डीन जोन्स यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला.

संबंधित बातम्या