भारतीय फुटबॉलमधील सफल परदेशी

किशोर पेटकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने सहा वर्षांपूर्वी फ्रँचायजी संघांचा समावेश असलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता या स्पर्धेचा मोठा प्रसार होत आहे. आशियाई फुटबॉल महासंघानेही आयएसएलला भारतातील अव्वल फुटबॉल स्पर्धेचा दर्जा बहाल केला असून एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही जागा दिली आहे. 

युरोपातील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धांचा विचार करता, आयएसएल स्पर्धा अजून बाल्यावस्थेत आहे, पण जागतिक लीग पातळीवर ठसा उमटवत आहे. परदेशातील विशेषतः स्पेनमधील फुटबॉलपटूंत ही स्पर्धा लोकप्रिय आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या सातव्या मोसमात परदेशी फुटबॉलपटूंत सर्वाधिक स्पॅनिश खेळाडू असतील. नव्या मोसमात आयएसएल स्पर्धेत यशस्वी ठरलेले एक स्पॅनिश नाव मात्र दिसणार नाही. फेरान कोरोमिनास हा २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धेत आपल्या पायातील जादू प्रदर्शित करताना दिसणार नाही. कोरो या टोपणनावाने परिचित असलेला या ३७ वर्षीय खेळाडूचा करार एफसी गोवा संघाने वाढवलेला नाही. कोरो याच्याऐवजी भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली याची सहमालकी असलेल्या संघाने नव्या चेहऱ्यास पसंती दिली. स्पेनचाच ३६ वर्षीय आघाडीपटू इगोर आंगुलो याला त्यांनी प्राधान्य दिले. २०१७-१८ ते २०१९-२० असे तीन मोसम कोरो एफसी गोवा संघातून खेळला. गतमोसमात लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या संघाच्या आक्रमणातील तो आधारस्तंभ ठरला. गतमोसमाअखेरीस सर्जिओ लोबेरा या स्पॅनिश प्रशिक्षकास एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने डच्चू दिला. लोबेरा यांच्या मैदानावरील व्यूहरचनेत कोरो याच्याकडे मोलाची जबाबदारी राहिली. त्याने आपल्या संघाला, प्रशिक्षकास कधीच निराश केले नाही. मात्र नव्या मोसमापूर्वी कोरो आणि एफसी गोवा यांच्यातील करारविषयक चर्चा फिस्कटली आणि या अनुभवी स्ट्रायकरने स्पेनमध्येच खेळण्याचे ठरविले. स्पेनमधील तृतीय विभागीय संघ अॅटलेटिको बालेरेस संघाशी कोरोने २०२०-२१ मोसमाकरिता करार केला आहे.    

आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल
कोरो याच्या नावे आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम आहे. तीन मोसमात त्याने ५७ सामने खेळताना ४८ गोल केले. आणखी दोन नोंदविले असते, तर आयएसएल स्पर्धेत गोल अर्धशतक नोंदविणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला असता. हा स्पॅनिश फुटबॉलपटू एफसी गोवाच्या आक्रमणातील हुकमी एक्का होता. भारतात खेळलेल्या सर्वोत्तम परदेशी फुटबॉलपटूंत त्याचे स्थान निश्चितच वरचे आहे. कोरो संघात असताना एफसी गोवाने २०१९ मध्ये सुपर कप स्पर्धा जिंकली, तर २०१८-१९ मोसमात आयएसएल उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. दोन वेळा आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली. एकंदरीत तीन वर्षांत त्याने एफसी गोवातर्फे सर्व स्पर्धांत मिळून ६४ सामन्यांतून ५५ गोल नोंदविले. नव्या मोसमात एफसी गोवा संघ स्पेनच्याच ३९ वर्षीय ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. या संघातील बहुतेक नियमित खेळाडू अन्य संघात दाखल झाले आहेत. एफसी गोवाची नव्याने संघ बांधणी होत आहे. एकंदरीत प्रशिक्षक फेरॅन्डो यांच्यासमोर कठीण आव्हान आहे. आयएसएल स्पर्धेत खेळत असताना त्यांना एएफसी चँपियन्स लीगसाठीही संघ तयार करायचा आहे. या वाटचालीत एफसी गोवा संघाला कोरोच्या उपयुक्त खेळाची उणीव भासू शकते. त्याच्या अनुपस्थितीने तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नव्या खेळाडूंना वातावरणाशी लगेचच जुळवून घ्यावे लागेल. 

एफसी गोवाचा दिग्गज
एफसी गोवा संघाच्या इतिहासात फेरान कोरोमिनास याची ओळख दिग्गज अशीच असेल. स्पेनमधील ला-लिगा स्पर्धेत खेळलेल्या या शार्प शूटर खेळाडूने भारतीय फुटबॉल मैदाने गाजविली. इस्पेन्यॉल, गिरोना, मलोर्का या स्पेनमधील प्रमुख संघातून खेळलेल्या कोरो याच्याशी एफसी गोवाने १७ जुलै २०१७ रोजी करार केला होता. आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात सर्वाधिक गोल नोंदवत या सेंटर-फॉर्वर्ड खेळाडूने दोन वेळा गोल्डन बूटचा मानही मिळविला. पहिल्या दोन मोसमात त्याने अनुक्रमे १८ व १६ गोल नोंदविले, तर गतमोसमात लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या संघासाठी १४ गोल नोंदवून पुन्हा छाप पाडली. याशिवाय एफसी गोवाच्या २०१९ मधील सुपर कप विजेतेपदात मोलाचा वाटा उचलताना पाच गोलसह गोल्डन बूटचा मान मिळविला होता. १९ नोव्हेंबर २०१७ रोजी चेन्नई येथे चेन्नईयीन एफसीविरुद्ध कोरोमिनासने आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल नोंदविला होता, तेव्हापासून सलग तीन मोसम गोलधडाका कायम ठेवत ‘गोलमशिन’ हा लौकिक राखला.

संबंधित बातम्या