बड्या संघांना दे धक्का!

किशोर पेटकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेचा नवा मोसम कोरोना विषाणू महामारीचे आव्हान पेलत पुढे सरकत आहे. २०२०-२१ मोसमाची नुकतीच सुरुवात आहे. स्टेडियम रिकामे असले, तरी फुटबॉल चाहत्यांची आपापल्या संघांच्या कामगिरीविषयी उत्सुकता कायम आहे. प्रीमियर लीगचा प्रारंभ मात्र धक्कादायक निकालांनी गाजू लागलाय. विशेषतः ऑक्टोबरच्या सुरुवातीस सनसनाटी निकाल लागले. 

व्हिला पार्कवर अॅस्टन व्हिला संघाने गतविजेत्या लिव्हरपूलला अनपेक्षित असा जबरदस्त हादरा दिला. गतमोसमातील प्रीमियर लीगमधून पदावनती अवघ्या एका गुणाने हुकलेल्या अॅस्टन व्हिलाने लिव्हरपूरचा ७-२ फरकाने धुव्वा उडविला. इंग्लंडमधील अव्वल साखळी स्पर्धेच्या इतिहासात ६७ वर्षांत प्रथमच गतविजेत्यांना सात गोल स्वीकारावे लागले. युर्गेन क्लोप यांच्या मार्गदर्शनाखालील लिव्हरपूलचा हा नव्या मोसमातला चार सामन्यांतील पहिलाच पराभव ठरला. अॅस्टन व्हिलाकडून असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागेल, याची कल्पना द रेड्स संघाने अजिबात केली नसावी. लिव्हरपूलच्या पराभवास त्यांच्या गचाळ बचावास जबाबदार मानले जाते. गतमोसमात त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीगचा किताब पटकाविला, पण बचावफळीतील कमजोरीवर टीका झाली होती. मागील मोसमात त्यांनी तब्बल ३३ गोल स्वीकारले, आता नव्या मोसमातील पहिल्या चार सामन्यांतच ११ गोल स्वीकारले आहेत. लिव्हरपूल संघ प्रीमियर लीग विजेतेपद राखू शकेल, का याबाबत आत्तापासून प्रश्न विचारले जात आहेत. यंदाच्या मोसमात पदोन्नती मिळालेल्या लीड्स युनायटेडविरुद्ध त्यांनी सप्टेंबरमध्ये निसटता विजय मिळविला, पण तीन गोल स्वीकारावे लागले होते, ही बाब खचितच क्लोप यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या लौकिकास साजेशी नव्हती.

मँचेस्टर युनायटेडचीही घसरण

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये १९९२-९३ पासून १३ वेळा विजेता ठरलेल्या मँचेस्टर युनायटेड संघाचीही नव्या मोसमात घसरण सुरू आहे. ओल्ड ट्रॅफर्डवरील या नावाजलेल्या संघाचा टॉटेनहॅम हॉट्सपर संघाने ६-१ फरकाने धुव्वा उडविला. दोन मोसमापूर्वी प्रशिक्षकपद स्वीकारलेल्या उले गुनर सोल्सेयर यांच्यासाठी हा निकाल वेदनादायी ठरला. स्पर्स संघाचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो हे युनायटेडचे माजी प्रशिक्षक. डिसेंबर २०१८ मध्ये संघ व्यवस्थापनाशी वाद झाल्यानंतर मॉरिन्हो यांना पद सोडावे लागले व मँचेस्टर युनायटेडचे माजी दीर्घकालीन खेळाडू सोल्सेयर यांच्याकडे अंतरिम प्रशिक्षकपद आले. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये नॉर्वेच्या प्रशिक्षकाशी मँचेस्टर युनायटेडने तीन वर्षांचा करार केला, तर मॉरिन्हो नोव्हेंबर २०१९ मध्ये चार वर्षांसाठी टॉटेनहॅम संघात रुजू झाले. उले गुनर यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीगच्या २०१८-१९ मोसमात सहावा, तर २०२९-२० मोसमात तिसरा क्रमांक पटकाविला. गतमोसमात मॉरिन्हो यांचा टॉटेनहॅम हॉट्सपर संघ प्रीमियर लीगमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिला. यंदा हा संघ उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन करत आहे. लीग कपमध्ये त्यांनी बलाढ्य चेल्सी संघाला पराजित केले. दुसरीकडे मँचेस्टर युनायटेड संघ मोसमाच्या प्रारंभी खूपच खाली गेला आहे. कमजोर बचावफळी हे त्याचे मुख्य कारण आहे. या संघाने तीन सामन्यांत तब्बल ११ गोल स्वीकारले आहेत. त्यातच फ्रान्सचा विश्वकरंडक विजेता हुकमी खेळाडू पॉल पोग्बा याचा सूर हरपला आहे. साहजिकच प्रशिक्षक सोल्सेयर यांची डोकेदुखी वाढली आहे.

गतवैभवाची प्रतीक्षा
अॅलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडने वैभवशाली कालखंड अनुभवला. त्यांच्या निवृत्तीनंतर हा विख्यात संघ गटांगळ्या खाताना दिसतो. प्रीमियर लीगमधील शेवटचे विजेतेपद त्यांनी २०१२-१३ मोसमात मिळविले होते, तर चँपियन्स लीग अखेरच्या वेळेस २००७-०८ मध्ये जिंकली होती. फर्ग्युसन यांनी तब्बल २६ वर्षे मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षकपद सांभाळले. नोव्हेंबर १९८६ ते २०१२-१३ मोसमाअखेरपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली द रेड डेव्हिल्स संघाने ३८ करंडक जिंकले. यामध्ये १३ प्रीमियर लीग, पाच एफए कप आणि दोन चँपियन्स लीग करंडकांचा समावेश होता. फर्ग्युसन यांनी निवृत्तीच्या मोसमात संघाला प्रीमियर लीग जिंकून दिली होती. त्यांच्यानंतर आलेल्या.  

मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकांना संघाला योग्य दिशा दाखविता आली नाही. एकेकाळी व्यावसायिक फुटबॉलमध्ये दबदबा राखलेला हा संघ सध्या ढासळतो आहे. दर्जेदार खेळाडूंची उणीव त्यास कारणीभूत मानले जाते. सोल्सेयर यांच्याकडे मँचेस्टर युनायटेडचे संघ व्यवस्थापन आश्वासक नजरेने पाहत आहे. गतमोसमात या संघाने प्रीमियर लीगमध्ये तिसरा क्रमांक मिळविला, तसेच लीग कप, एफए कप, युरोपा लीग या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. सध्याची प्रीमियर लीगमधील या संघाची कामगिरी पाहता, प्रशिक्षकांना डावपेच बदलावेच लागतील.  

संबंधित बातम्या