लंडन मॅरेथॉनमध्ये नवा विजेता

किशोर पेटकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

जागतिक पातळीवरील मॅरेथॉनमध्ये लंडनमधील शर्यत प्रतिष्ठेची गणली जाते. कोरोना विषाणू महामारीमुळे या वर्षी लंडन मॅरेथॉन ठरलेल्या वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही. शर्यतीचा २६ एप्रिलचा मुहूर्त चुकला आणि ४ ऑक्टोबर ही नवी तारीख ठरविण्यात आली. ब्रिटनमध्ये कोविड-१९ ची साथ कायम असल्याने आरोग्यसुरक्षेस प्राधान्य देत जैवसुरक्षा वातावरणात लंडन मॅरेथॉन झाली. यावेळच्या ४० वी लंडन मॅरेथॉनमध्ये नेहमीचा जल्लोष नव्हता. समूह सहभाग टाळण्यात आला, फक्त प्रमुख धावपटूंनाच निमंत्रित करण्यात आले. जगभरातील धावपटूंनी आभासी मॅरेथॉनद्वारे आनंद लुटला. पुरुष गटात ३९ धावपटू आणि ८ पेसर्स, तर महिला गटात २९ धावपटू आणि ८ पेसर्सची नोंदणी होती. शर्यत सामाजिक अंतराचे भान ठेवून पार पडली. 

लंडन मॅरेथॉनला १९८१ मध्ये सुरुवात झाली, तेव्हापासून या वर्षी प्रथमच शर्यत शरद ऋतूत झाली, त्यामुळे हवामानाचा परिणामही धावपटूंना जाणवला. पुरुष व महिला मॅरेथॉनबरोबरच दोन्ही गटातील व्हीलचेअर मॅरेथॉनही झाली. या वेळी महामारीमुळे मॅरेथॉन प्रत्येकी २.१५ किलोमीटरच्या १९.६ लॅप्समध्ये रंगली. पुरुष गटाला नवा विजेता गवसला, तर महिला गटात गतविजेतीने पुन्हा बाजी मारली. इथिओपियाच्या शुरा किताता याने २ तास ०५ मिनिटे ४१ सेकंद वेळेत लंडन मॅरेथॉनचे विजेतेपद मिळविले. केनियाची २६ वर्षीय ब्रिजिड कोसगेईने गतवर्षीचे सुवर्णपदक स्वतःपाशीच राखताना २ तास १८ मिनिटे ५८ सेकंद वेळ नोंदविली. कोसगेई हिने अमेरिकन सारा हॉल आणि देशवासीय जगज्जेती रूथ चेप्नगेटिच यांना मागे टाकले. दीर्घ पल्ल्याचा महान धावपटू मो फराह यंदा स्पर्धक नव्हता, तो पेसरच्या भूमिकेत दिसला, त्याने ब्रिटिश धावपटूंना प्रोत्साहित केले.

किपचोगेच्या वर्चस्वास शह
कोविड-१९ पार्श्वभूमीवर होणाऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये आफ्रिकी धावपटूंचेच वर्चस्व अपेक्षित होते, त्यात केनियाचा विश्वविक्रमधारी लियूड किपचोगे व इथिओपियाचा केनेनिसा बेकेले यांच्यात चुरस अपेक्षित होती. तीन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलेला ३८ वर्षीय बेकेले याला दुखापतीमुळे शर्यतीपूर्वीच माघार घ्यावी लागली, त्यामुळे किपचोगे याला लंडनमधील शर्यतीत विजेतेपदाचा प्रमुख स्पर्धक मानले जात होते. ३५ वर्षीय बेकेलेने लंडन मॅरेथॉनमध्ये चार वेळा विजेतेपदाचा मान मिळविला आहे. २०१५ व २०१६ मध्ये, तसेच २०१८ व २०१९ मध्ये तो लंडन शर्यतीत विजेता ठरला. गतवर्षी त्याने लंडनची शर्यत भन्नाट वेगाने पूर्ण करताना २ तास ०२ मिनिटे ३७ सेकंद वेळ नोंदविली होती. किपचोगेने गतवर्षी व्हिएन्नामधील शर्यत दोन तासांच्या आत पूर्ण करण्याचा पराक्रम साधला होता, पण तांत्रिक कारणास्तव तो विश्वविक्रम ठरला नव्हता. तरीही मॅरेथॉनमधील २ तास ०१ मिनिट ३९ सेकंद वेळेचा विश्वविक्रम किपचोगेच्याच नावे आहे. २०१८ मधील बर्लिन मॅरेथॉनमध्ये तो जबरदस्त वेगाने धावला होता. यंदा लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाचा हा दिग्गज धावपटू लौकिक राखू शकला नाही. त्याची चक्क आठव्या स्थानी घसरण झाली. २०१३ मध्ये बर्लिन मॅरेथॉनमध्ये किपचोगे उपविजेता ठरला होता, त्यानंतर रिओ ऑलिंपिकसह जागतिक पातळीवर त्याने ११ शर्यतीत पहिला क्रमांक निसटू दिला नव्हता. लंडनमध्ये त्याच्या वर्चस्वाला शह मिळाला. २ तास ०६ मिनिटे ४९ सेकंद या वेळेत लंडन मॅरेथॉन धावलेला किपचोगे खूपच संथ ठरला. 

किताताची प्रगती
केनियाच्या व्हिन्सेंट किपचुम्बा याला चुरशीच्या शर्यतीत अवघ्या एक सेकंद फरकाने मागे टाकून शुरा किताता याने लंडन मॅरेथॉन जिंकली. जागतिक मॅरेथॉनमधील या २४ वर्षीय धावपटूचे हे लंडनमधील पहिलेच मोठे यश ठरले. दोन वर्षांपूर्वी किताता लंडनमधील शर्यतीत उपविजेता ठरला होता, तेव्हा त्याला किपचोगे याने मागे टाकले होते. यावेळेस त्याने प्रगती साधताना दिग्गज धावपटूस पराजित केले. किताता २०१७ मध्ये दोन मॅरेथॉनमध्ये विजेता ठरला होता. तेव्हा त्याने रोम व फ्रँकफर्टमधील शर्यत जिंकली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तो लंडन आणि न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये उपविजेता ठरला. मागील दोन वर्षांत त्याचा विशेष बोलबाला नव्हता. या वेळी लंडन मॅरेथॉनमध्ये किताताने शेवटच्या १५ मिनिटांत वेग वाढविला. त्याचा त्याला खूपच फायदा झाला.  
त्याच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा इथिओपियाच्या धावपटूने केनियन धावपटूवर कुरघोडी केली. जागतिक मॅरेथॉनमध्ये या दोन्ही देशांतील धावपटूंतच नेहमी चढाओढ अनुभवायला मिळते.  

संबंधित बातम्या