सप्ततारांकित हॅमिल्टन

किशोर पेटकर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

क्रीडांगण

कणखर आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर लुईस हॅमिल्टन मोटर रेसिंग कारकिर्दीत यशोशिखरावर दाखल झाला. आता या ३५ वर्षीय ब्रिटिश फॉर्म्युला वन ड्रायव्हरने अत्युच्च शिखर गाठले असून कदाचित तो या शिखराचे सर्वोच्च टोक गाठणारा पहिला ड्रायव्हर असू शकेल. 

हॅमिल्टनने फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये सात वेळा जगज्जेतेपद गाठणारा जर्मन ड्रायव्हर मायकेल शूमाकर याची बरोबरी केली आहे. त्याच्या मर्सिडीज गाडीचा भन्नाट वेग पाहता, दैवी गुणवत्तेचा हॅमिल्टन पुढील वर्षी सर्वाधिक आठवे जगज्जेतेपद मिळवून त्याही पुढे जाऊ शकतो. सध्या तरी तो थांबण्याची चिन्हे नाहीत. फॉर्म्युला वन शर्यतीत या ड्रायव्हरने सोनेरी अक्षरांनी इतिहास लिहिला. वडील कृष्णवर्णीय, आई श्वेतवर्णीय, मुलगा मिश्रवर्णीय. त्यामुळे त्याला रेसिंगमधील सुरुवातीच्या कालखंडात वर्णभेदाचा सामना करावा लागला, अवहेलनाही झेलावी लागली. पण हा ध्येयवादी हटला नाही. वेगाचा ध्यास कायम राहिला, त्यास कौशल्यपूर्ण ड्रायव्हिंगची जोड लाभली. बारा वर्षांपूर्वी मॅक्लारेनची गाडी चालवत त्याने पहिले जागतिक विजेतेपद मिळविले, तेव्हा या कृष्णवर्णीय ड्रायव्हरच्या अचाट कौशल्याने साऱ्यांनाच चकीत केले. त्यानंतर सात वर्षांपूर्वी मर्सिडीज संघाने त्याला व्यासपीठ दिले. कर्तृत्व सिद्ध करण्यास हपापलेल्या हॅमिल्टनने संधीचे सोने केले. सात मोसमात फक्त एक अपवाद वगळता तो सहा वेळा वर्ल्ड चँपियन झाला, त्यापैकी चार वेळा ओळीने त्याने विश्वविजेतेपदाचा मान मिळविला.

शूमाकरबरोबर तुलना
जागतिक फॉर्म्युला वन मालिकेत मायकेल शूमाकर हे नाव लिजंड आहे. फेरारीची गाडी जबरदस्त वेग आणि कौशल्याने चालवत शूमाकरने १९९४ ते २००४ या कालावधीत सात वेळा जगज्जेतेपदाचा मान मिळविला. २००० ते २००४ या कालावधीतील पाच मोसमात शूमाकरचे अव्वल स्थान हिरावणे कोणालाच जमले नाही. चौदा मोसमात ९१ शर्यती जिंकत जर्मन ड्रायव्हर सप्ततारांकित ठरला. फेरारीचा दबदबा असताना मर्सिडीज संघ योग्य ड्रायव्हरच्या शोधात होता. शूमाकरने या संघाचे कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात ड्रायव्हिंग केले, मात्र वैभवापासून दूरच राहिला. पाच वर्षे मॅक्लारेनची गाडी चालविल्यानंतर, २०१३ मध्ये हॅमिल्टन मर्सिडीज संघाचा प्रमुख ड्रायव्हर झाला. गाडीचे अद्ययावत अचाट क्षमतेचे इंजिन, ताकदवान, कोणत्याही परिस्थितीत टिकाव धरणारे टणक टायर आले आणि जोडीला हॅमिल्टनचे असामान्य कौशल्य. साहजिकच मर्सिडीज आणि ब्रिटिश ड्रायव्हर यांना शह देणे कठीणच ठरले. २००८ मध्ये मॅक्लारेन संघातर्फे जागतिक विजेता ठरला तेव्हा हॅमिल्टन फॉर्म्युला वनमध्ये नवोदित होता, जागतिक मालिकेतील त्याचा तो दुसराच मोसम होता. २०१६ मधील मोसम वगळता त्याने सहा वेळा जागतिक मालिका जिंकली. या कालावधीत नेहमीच त्याची शूमाकरबरोबर तुलना झाली. २०२० मधील मोसम कोरोना विषाणू महामारीमुळे पूर्णतः वेगळा ठरला. जैवसुरक्षा वातावरणात रेसिंग करताना हॅमिल्टनने तोल ढळू दिला नाही. एकाग्रता कायम राखत मोसमात १४ पैकी १० शर्यती जिंकणाऱ्या हॅमिल्टनच्या सातव्या जगज्जेतेपदावर तुर्कस्तानमध्ये शिक्कामोर्तब झाले, तेव्हा मोसमातील तीन शर्यती बाकी होत्या. जागतिक फॉर्म्युला वन मालिकेत तो सर्वाधिक शर्यती जिंकणारा ड्रायव्हर आहे. जर्मनीतील नर्बर्गरिंग येथे हॅमिल्टनने शूमाकरच्या १९ वर्षे अबाधित राहिलेल्या शर्यती विजयाच्या विक्रमास गाठले. नंतर मुसंडी घेत सलग तीन शर्यती जिंकत विजयांची संख्या ९४ वर नेली. आता शतकी लक्ष्य नजरेसमोर असेल.

बीएलएम मोहिमेचा खंदा पाठीराखा
पाश्चात्त्य देशात ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर (बीएलएम) मोहीम नेटात आहे. कृष्णवर्णीयांना न्याय देण्यासाठी ही मोहीम अग्रभागी आहे. हॅमिल्टन स्वतः अश्वेतवर्णीय. त्याने जबरदस्त चिकाटी प्रदर्शित करत फॉर्म्युला वनमधील श्वेतवर्णीयांची मक्तेदारी मोडीत काढली. या जिगरबाज, जिद्दी ड्रायव्हरची नजर विश्वविक्रमी आठव्या फॉर्म्युला वन जगज्जेतेपदावर एकवटली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना सामाजिक भान हॅमिल्टनने राखले. वडिलांनी हालअपेष्टा सोसत मुलाचे कार्ट रेसिंगमधील स्वप्न पूर्णत्वास नेले. दहा वर्षांचा लुईस उसनवारीवरील रेसिंग जॅकेट आणि शूज घालून विजेता ठरला. कृष्णवर्णीय असल्याने कारकिर्दीच्या प्रारंभी त्याच्याकडे कलुषित  
नजरेने पाहिले गेले, तुच्छ लेखले गेले. हॅमिल्टन आज यशोशिखरावर आहे. त्याच्यावर कुबेर प्रसन्न आहे, मात्र तो इंग्लंडमधील पूर्वीचे हलाखीचे दिवस विसरलेला नाही. त्यामुळे बीएमएम मोहीम तीव्र असताना त्याने भर रेसिंग ट्रॅकवर एका गुडघ्यावर वाकत कृष्णवर्णीयांना अभिवादन केले. शर्यतीच्या कालावधीत वर्णभेदविरोधी मोहिमेस पाठिंबा देणारे टी-शर्ट घातले. फॉर्म्युला वन रेसिंगमधील हॅमिल्टन हा एकमेव कृष्णवर्णीय ड्रायव्हर आहे, या वर्णाच्या ड्रायव्हरची संख्या वाढावी ही त्याची मनीषा आहे.

संबंधित बातम्या