‘आयएसएल’चे शिवधनुष्य

किशोर पेटकर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

क्रीडांगण

कोविड-१९ महामारीपासून अजून सुटका झालेली नाही. देशातील काही प्रमुख शहरांत महामारीची दुसरी लाटही आलेली आहे. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी शिवधनुष्य पेलले. नीता अंबानी प्रमुख असलेल्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धेला देशात सुरुवात केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) तीन शहरांत यशस्वी आयोजन केले. मात्र भारतात कोविड-१९ पार्श्वभूमीवर खेळली जाणारी आयएसएल ही मोठी क्रीडा स्पर्धा ठरली. गोव्यात जैवसुरक्षा वातावरण (बायोबबल) तयार करून दिवाळीनंतर स्पर्धात्मक फुटबॉलला सुरुवात झाली. गोव्यातील तीन स्टेडियमवर प्रेक्षकांविना स्पर्धा सुरू आहे. तब्बल ११५ सामन्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा गोव्यातच मार्च महिन्यापर्यंत चालेल. मैदानावरील फुटबॉलला दिशा गवसली, पण धोका टळलेला नाही. संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत आयोजकांना खबरदारी बाळगावीच लागेल. जराशी चूक झाली, की साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल. मध्यंतरी सरावाच्या कालावधीत गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडचे एक-दोन खेळाडू कोविड बाधित असल्याचे वृत्त आले. संबंधितांनी तातडीने उपाययोजना करत साथ वाढणार नाही याची दक्षता घेतली, त्यामुळे लक्षणे नसलेल्या बाधितांपासून दूर राहत नॉर्थईस्ट युनायटेडचा संघ मैदानात उतरला आणि त्यांनी पहिल्याच सामन्यात विजयास गवसणीही घातली. केवळ खेळाडू आणि संघ अधिकारीच नव्हे, तर स्पर्धेतील संबंधित सर्वांसाठी बायोबबल आरोग्य सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. 

चाहते परतण्याचा आशावाद
मध्यंतरी आभासी वार्तालापात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांनी आयएसएल स्पर्धेच्या उत्तरार्धात फुटबॉल चाहते स्टेडियमवर परतण्याचा आशावाद व्यक्त केला होता. केवळ त्यांनाच नव्हे, तर साऱ्यांनाच सामना सुरू असताना फुटबॉलप्रेमी स्टेडियमवर जल्लोष करताना हवे आहेत. सध्या तरी ते अजिबात शक्य नाही. कोविड-१९ महामारीचा जोर ओसरल्याचे वाटत आहे, तरी महासंकटाचे निवारण झालेले नाही. विषाणू कधीही मानवी शरीरात शिरकाव करू शकतो. सद्यःपरिस्थितीत आयएसएल स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश देणे जिकिरीचेच असेल. कोविड-१९ पार्श्वभूमीवर यावर्षी जूनमध्ये युरोपात फुटबॉल पूर्ववत झाले, पण रिकाम्या स्टेडियमवर. युरोपातील फुटबॉल मैदानावर रंगत कायम आहे. तेथील बायोबबलमध्येही अधूनमधून कोरोना बाधित सापडल्याच्या बातम्या येतात. त्यातून कसा मार्ग काढायचा हे आयोजकांना उमगले आहे, त्यामुळे स्पर्धा खंडित झालेल्या नाहीत. आयएसएलच्या पहिल्या आठवड्यात सारे काही नियोजनानुसार झाले. तब्बल आठ महिन्यानंतर भारतीय मैदानावर फुटबॉल अवतरल्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम दिसून येत असूनही फुटबॉल कौशल्य झाकोळले नाही. खेळापासून दीर्घ काळ दूर राहिल्यानंतर स्पर्धा करणे कठीणच होते, पण हे फुटबॉल आहे, असे पहिल्या सामन्यात निसटता विजय नोंदविल्यानंतर एटीके मोहन बागानचे स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास म्हणाले. खेळाडूंना मैदानावर स्थिरावण्यासाठी काही काळ जाणारच. खेळाडूंचे विश्व सध्या मैदान, सामने, सराव आणि हॉटेल यापुरतेच मर्यादित आहे, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. जैवसुरक्षा वातावरणातील ऑक्टोबर ते मार्च हा दीर्घ कालावधी खेळाडूंसाठी नक्कीच त्रासदायक असेल. सध्या कोणाचीही तक्रार नाही, पण कालांतराने काहीजण कंटाळण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षिततेलाच प्रथम प्राधान्य राहील.

इतर खेळांसाठी उदाहरण
जैवसुरक्षा वातावरणात फुटबॉल सुरू करण्याचे आव्हान पेलून आयएसएलने चांगला पायंडा पाडला आहे आणि देशातील इतर खेळांसाठी चांगले उदाहरण असल्याचे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मांडले. गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयने आयपीएल आखातात सफल केली, पण देशात खेळविण्याचे धारिष्ट्य झाले नाही. आयएसएल फुटबॉलच्या तुलनेत आयपीएल क्रिकेटचा आवाका फार मोठा आहे. गोवा हे लहान राज्य. तेथे तिन्ही स्टेडियम्स जवळपास असल्याने प्रवासाचा त्रास टळला  आहे. कोविड-१९ परिस्थितीत आयपीएल भारतात खेळविण्यासाठी प्रवास टाळणे आवश्यक आहे. आयएसएलला मार्गदर्शक मानून अतिरिक्त प्रवासास फाटा देत, आयपीएलचे सामने घेण्याबाबत बीसीसीआय विचाराधीन असल्याचे गांगुलीच्या मतप्रदर्शनावरून जाणवते. तसे झाल्यास २०२१ मधील आयपीएल भारतात खेळताना दिसू शकते. जैवसुरक्षा वातावरण तयार करून कोलकात्यात ९ जानेवारीपासून आय-लीग फुटबॉल स्पर्धा खेळविण्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निश्चित केले आहे. रणजी क्रिकेट स्पर्धाही जानेवारीपासून बायोबबलमध्ये खेळविण्याचे बीसीसीआयचे नियोजन आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दृष्टिक्षेपात असताना भारतीय क्रीडा क्षेत्रात सकारात्मक चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या