क्रीडाचाहते स्टेडियमवर

किशोर पेटकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020


क्रीडांगण

 वर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणू साथीला महामारी घोषित केल्यानंतर जागतिक क्रीडा मैदानावरील घडामोडी ठप्प झाल्या. जग कोविड-१९ वरील लस शोधत असताना, क्रीडा मैदानावर पुन्हा चुरस कशी रंगणार याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले. रिकाम्या स्टेडियममध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन शिष्टाचाराचे काटेकोर पालन करत मैदानावर खेळण्याचा उपाय निघाला. जूनमध्ये युरोपात व्यावसायिक फुटबॉलने पुनरागमन केले, नंतर जुलैमध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झाले, सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा थरार रंगला, पण सारे काही सुनेसुने होते. घरबसल्या क्रिकेटप्रेमींनी यूएईतील मैदानावरील आयपीएल क्रिकेटचा आनंद लुटला. क्रिकेटचे जल्लोषी वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने चाहत्यांचा ध्वनीमुद्रित आवाज स्टेडियमवर घुमविण्यात आला. स्टेडियमवर क्रीडाचाहत्यांच्या अनुपस्थितीत स्पर्धात्मक चुरस रंगली, तरीही ती बेचव होती. प्रत्यक्ष मैदानावर क्रीडा चुरस अनुभवण्याचा आनंद अवर्णयीनयच. मैदानावर खेळणारे खेळाडू आणि त्यांना उत्स्फूर्त प्रोत्साहन देणारे चाहते यांचे नातेच आगळे आहे, असो... अखेरीस आता क्रीडा चाहते पुन्हा

स्टेडियमवर दिसू लागलेत. 
ऑस्ट्रेलियात भारताच्या क्रिकेट दौऱ्यास सुरुवात झाली. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत सिडनी आणि कॅनबेरा येथील मैदानावर क्रिकेटप्रेमींची प्रफुल्लित उपस्थिती पाहून दूरचित्रवाणीवर सामना पाहताना सारेजण सुखावले. युरोपातील फुटबॉल स्टेडियमवरही चाहत्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. इंग्लंडने पुढाकार घेतला आहे.

न्यूझीलंडमध्ये अगोदरच गर्दी
सारे जग कोविड-१९ महामारीच्या भीतीने गारठलेले असताना, न्यूझीलंडने या जीवघेण्या साथीच्या रोगावर सर्वप्रथम नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. त्यात त्या देशाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांच्या सरकारच्या उपाययोजनांचा मोलाचा वाटा होता. महामारीवर नियंत्रण राखल्याने हा देश खूप लवकर सावरू शकला.

त्यामुळेत या वर्षी जूनमध्ये न्यूझीलंडमधील रग्बी सामन्यांना स्टेडियमवर भरपूर गर्दी दिसली. तेथील सुपर रग्बी स्पर्धेतील ऑकलंडमध्ये झालेल्या सामन्यात सुमारे चाळीस हजार क्रीडाप्रेमींची उपस्थिती पाहून साऱ्यांचेच डोळे विस्फारले.

ऑक्टोबरमध्ये कडक मानक परिचालन पद्धतीचा (एसओपी) अवलंब करत ऑस्ट्रेलियाचा रग्बी संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. उभय संघातील पहिल्याच सामन्यात वेलिंग्टन येथील स्टेडियमवर तीस हजारांहून जास्त रग्बीप्रेमींचा जल्लोष पाहून साऱ्या जगाला हेवा वाटला. प्रत्यक्ष मैदानावरील खेळापेक्षा चाहत्यांच्या उपस्थितीचीच जास्त चर्चा झाली. आता ब्रिटनमधील क्रीडा मैदानावर खेळाचा आनंद लुटण्यासाठी चाहत्यांना मर्यादित स्वरूपात प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली आहे. एमिरेट्स स्टेडियमवर आर्सेनलच्या रॅपिड विएनविरुद्धच्या युरोपा लीग सामन्यासाठी दोन हजार भाग्यवान चाहते उपस्थित होते. मार्चमध्ये इंग्लंडमधील क्रीडा जगत ठप्प झाले, नऊ महिन्यानंतर प्रथमच तेथील स्टेडियमवर प्रेक्षक दिसले.

जागतिक पातळीवर कोविड-१९ लसीकरणाबाबत सकारात्मकता दिसत असताना क्रीडा स्टेडियमकडे चाहत्यांचे वळणारे पाय दिलासादायी आहे.

चाहत्यांच्या साक्षीने क्रिकेट
महामारीच्या पार्श्वभूमीवर जैवसुरक्षा वातावरणात इंग्लंडने जुलैमध्ये सर्वप्रथम क्रिकेट सुरू केले. रिकाम्या स्टेडियमवर वेस्ट इंडीज, पाकिस्तानविरुद्ध मालिका रंगली. ऑस्ट्रेलियानेही इंग्लंड वारी केली. झिंबाब्वेने पाकिस्तानचा दौरा केला.

आयपीएल स्पर्धा, पाकिस्तानातील लीग स्पर्धाही झाली. हे सारे क्रिकेट बंद दरवाजाआड खेळल्यानंतर भारताचा ऑस्ट्रेलियाचा पूर्ण दौरा ही जागतिक क्रिकेटमधील आणखी एक मोठी घटना आहे. भारतीय संघ तब्बल आठ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला. त्याचवेळी आपल्या संघाला प्रोत्साहन

देण्यासाठी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन, तसेच भारतीय पाठीराखे दिसले. केवळ झटपट क्रिकेटसाठीच नव्हे, तर कसोटी सामनेही चाहत्यांच्या साक्षीने खेळले जातील. त्यासाठी प्रेक्षक क्षमता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निश्चित केली आहे.

ऑस्ट्रेलियात कोविड बाधितांची संख्या घटल्याने क्रिकेट चाहत्यांना संधी प्राप्त झाली आहे. स्टेडियम पूर्ण भरलेले नसेल, पण क्रिकेटपटूंना पाठबळ देण्यासाठी जल्लोष निश्चितच असेल. सिडनी आणि एडलेड येथील कसोटीत दरदिवशी ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल. बॉक्सिंग डे कसोटी भव्यदिव्य मेलबर्न स्टेडियमवर होईल, तेथे दरदिवशी २५ टक्के म्हणजेच अंदाजे २५ हजार क्रिकेट प्रेमींची उपस्थिती

असेल. ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीसाठी स्टेडियमवर प्रत्येक दिवशी ७५ टक्के चाहत्यांना प्रवेश देण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर भारतात क्रीडाप्रेमींना स्टेडियमवर कधी प्रवेश मिळेल याची उत्सुकता आहे. 

गोव्यात इंडियन सुपर लीग
(आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामने रिकाम्या स्टेडियमवर सुरू आहेत. जानेवारीत आय-लीग फुटबॉल स्पर्धाही कोलकात्यात बंद दरवाजाआड खेळली जाईल. देशांतर्गत क्रिकेट सुरू करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नियोजन आखत आहे. २०२१ मधील आयपीएल स्पर्धा देशातच खेळविण्यास बीसीसीआय इच्छुक आहे. त्यावेळी चाहते स्टेडियमवर येण्याची आशा बाळगता येईल....

संबंधित बातम्या