पार्थिवची तृप्त मनाने निवृत्ती

किशोर पेटकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

क्रीडांगण

भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याने तो अठरा वर्षांचाही नव्हता. १७ वर्षे व १५३ दिवसांचा असताना या गुजराती क्रिकेटपटूला कसोटी कॅप मिळाली. लहान वयात कसोटीपटू होणारा तो युवा भारतीय यष्टिरक्षक ठरला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सध्याचे अध्यक्ष सौरभ गांगुली संघाचे कर्णधार असताना पार्थिवने २००२ मध्ये कसोटी खेळण्याचा मान मिळविला. आता वयाच्या ३५व्या वर्षी त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून तृप्त मनाने निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या नात्याने पार्थिवची कारकीर्द विशेष बहरली नाही, मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने गुजरातला राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मानसन्मान मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजय हजार करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकली, तसेच रणजी करंडकासही गवसणी घातली. २०१६-१७ मोसमात स्पृहणीय कामगिरीच्या बळावर गुजरातने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत मातब्बर मुंबईचा पाडाव केला. इंदूर येथे झालेल्या अंतिम लढतीच्या दोन्ही डावांत पार्थिवची बॅट कडाडली. त्याने अनुक्रमे ९० व १४३ धावा केल्या. प्रथम श्रेणीतील १९४ सामन्यांत ११,२४० धावा करणाऱ्या पार्थिवने, खेळाडू या नात्याने मिळविण्यासारखे फार काही बाकी नसल्याची भावना व्यक्त करत स्पर्धात्मक क्रिकेटमधून संन्यास घेतला. दोन वर्षांपूर्वी तो जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळला. यावर्षी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पार्थिव गुजरातमधील क्रिकेटसाठी प्रेरणास्रोत आहे. निवृत्तीनंतर तो आता क्रिकेटमधील गुणवत्ता शोधण्याचे काम करणार आहे, त्याच्या अनुभवाचा लाभ भारतीय क्रिकेटला नक्कीच होईल.

धोनीच्या छायेखाली
पार्थिवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा महेंद्रसिंह धोनी या क्रिकेटपटूस राष्ट्रीय पातळीवर कोणीच ओळखत नव्हते. मात्र याच धोनीच्या छायेखाली पार्थिवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस ठेच लागली. यष्टीमागच्या खराब कामगिरीमुळे पदार्पणानंतर अवघ्या दोन वर्षांतच पार्थिवला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. जाणकारांच्या मते, पार्थिवच्या यष्टिरक्षणात खूप त्रुटी होत्या, त्या आंतरराष्ट्रीय मैदानावर ठळकपणे दिसत होत्या. लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहिल्याने त्याला यष्टिरक्षणात सफाई आणण्यास पुरेसा वाव मिळाला नसल्याचेही एक कारण आहे. आंतरराष्ट्रीय वयोगट क्रिकेटमध्ये चमकल्यानंतर पार्थिव थेट कसोटी क्रिकेट खेळला. कसोटी पदार्पणानंतर दोन वर्षांनी पार्थिवने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००४ मध्ये पार्थिवला भारतीय संघातून डच्चू मिळाला. धोनीचे २००५ मध्ये पदार्पण झाले. रांचीच्या या धडाकेबाज क्रिकेटपटूने संधीचे सोने करत मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे पार्थिव, तसेच आणखी एक यष्टिरक्षक दिनेश कार्तिक यांना संघात पुनरागमन करण्यासाठी झगडावे लागले. धोनीमुळे पार्थिवला बहुतेक वेळा पर्यायी यष्टिरक्षकाच्याच भूमिकेत बसावे लागले. संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पार्थिव २५ कसोटी, ३८ एकदिवसीय, तर दोन टी-२० सामने खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिचीत आणि झेल मिळून त्याने यष्टींमागे एकूण ११२ बळी मिळविले. तो आयपीएल क्रिकेटमध्येही झळकला. चेन्नई सुपर किंग्ज संघात असताना २०१० मध्ये, तर मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना २०१५ व २०१७ मध्ये आयपीएल विजेता ठरला. 

जिगरबाज क्रिकेटपटू
पार्थिवच्या यष्टिरक्षणात तांत्रिक दोष असल्याचे कारण देत त्याला संघाबाहेरची वाट दाखविण्यात आली. नेमके काय घडते आहे हे समजण्याचे त्याचे ते वयच नव्हते. तेव्हा त्याने वयाची विशीही पार केली नव्हती. पण पार्थिव कोलमडून गेला नाही. त्यामुळेच १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त होऊ शकला. उंचीने कमी असलेल्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रिकेटपटूने शैलीदार फलंदाजीद्वारे चमक दाखविली. अवघ्या सतरा वर्षांच्या पार्थिवने नॉटिंगहॅम येथील कसोटीत मोठ्या धैर्याने सामन्याचे शेवटचे सत्र खेळून काढले. या बालिश चेहऱ्याच्या क्रिकेटपटूने इंग्लिश गोलंदाजांचा चिकाटीने सामना केल्यामुळे भारताला पराभवापासून दूर राहता आले. पाकिस्तानचा शोएब अख्तर आग ओकत असताना २००४ मधील दौऱ्यात रावळपिंडी येथील लढतीत सलामीस  
फलंदाजी करण्याचे त्याचे धाडस कौतुकास्पद ठरले. २००८ मध्ये त्याने पुनरागमन केले, त्यानंतर वृद्धिमान सहा जायबंदी झाल्यानंतर २०१६ मध्ये तो पुन्हा भारताच्या कसोटी संघात परतला. जिद्द कायम होती. त्यामुळेच पुनरागमनातील मालिकेत दोन अर्धशतकासह त्याने फलंदाजीत छाप पाडली. एकाच नाण्याच्या दोन बाजू मानून पार्थिवने यशापयश पचविले. दृढनिश्चयाने क्रिकेट खेळला. टीकाकारांची पर्वा केली नाही. त्यामुळेच क्रिकेटमध्ये दखलप्राप्त कामगिरी त्याला शक्य झाली. राष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे योगदान अनन्यसाधारण आहे, विशेषतः गुजरात क्रिकेटसाठी तो दिग्गज आहे.

संबंधित बातम्या