पेरेझला उशिरा संधी

किशोर पेटकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

क्रीडांगण

फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल दशकभरानंतर मेक्सिकोच्या तीस वर्षीय सर्जिओ पेरेझ याला मोठी संधी लाभली आहे. नव्या मोसमात २०२१ मध्ये फॉर्म्युला वन सर्किटवर तो रेडबुल रेसिंग संघाचा ड्रायव्हर आणि मॅक्स व्हर्स्तापन याचा संघ सहकारी असेल. पेरेझला रेडबुल संघाने निवडल्यामुळे आता अलेक्झांडर अल्बॉन राखीव असेल. २०२० मधील पेरेझचे ड्रायव्हिंग लक्षवेधक ठरले. फॉर्म्युला वन जागतिक मालिकेत सात वेळचा जगज्जेता लुईस हॅमिल्टन, त्याचा मर्सिडीज संघातील सहकारी व्हॉल्टेरी बोटास व रेडबुलचा व्हर्स्तापन यांच्यानंतर पेरेझला चौथा क्रमांक मिळाला. रेसिंग पॉइंट संघाचे प्रतिनिधित्व करताना या मेक्सिकन ड्रायव्हरने लक्ष वेधले, मात्र या वर्षी सप्टेंबरमध्येच आपण हा संघ सोडणार असल्याचे त्याने जाहीर केले होते. पुढील वर्षी रेसिंग पॉइंट संघ एस्टन मार्टिन या नव्या नावाने ट्रॅकवर दिसेल आणि चार वेळचा माजी जगज्जेता सेबॅस्टियन व्हेटेल या संघाचा प्रमुख ड्रायव्हर असेल. पेरेझ याने यंदाच्या मोसमातील उत्तरार्धात जबरदस्त वेग पकडला आणि रेडबुलची ऑफर त्याला योग्य वेळी मिळाली. २०२० मधील वेगवान ड्रायव्हिंगमुळे वयाच्या तिसाव्या वर्षी त्याला नव्याने भन्नाट वेग घेण्याची संधी चालून आली आहे. रेडबुल संघ व्यवस्थापनाचा विश्वास तो कितपत सार्थ ठरवतोय हे नव्या वर्षांतच दिसेलच. 

मॅक्लारेनने संघातून वगळल्यानंतर पेरेझने २०१४ ते २०१८ या कालावधीत फॉर्म्युला वनमध्ये फोर्स इंडिया संघाचे प्रतिनिधित्व केले. फोर्स इंडिया संघासोबत त्याने पहिल्याच वर्षी कारकिर्दीतील दुसरे आणि दोन वर्षांतील पहिले पोडियम फिनिश मिळविले. बहरीन ग्रांप्रीत त्याला तिसरा क्रमांक मिळाला होता. २०१९ मध्ये ब्रिटिश रेसिंग पॉइंटने फोर्स इंडिया संघाचा पूर्ण ताबा मिळविल्यानंतरही पेरेझ याच संघात कायम राहिला. त्याचा करार २०२२ पर्यंत होता.

शर्यतीत यश
सर्जिओ पेरेझने २०११ साली फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये पदार्पण केले. त्या वर्षी ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीत तो सर्वप्रथम सहभागी झाला. २०१२ मध्ये सॉबर संघाचे प्रतिनिधित्व करताना मलेशियन ग्रांप्रीत त्याने सर्वप्रथम पोडियम मिळविले. त्या वर्षीपर्यंत तो फेरारी ड्रायव्हर अकादमीत होता, रेसिंगमधील मेक्सिकन वंडरकिड ही त्याची ओळख होती. चेको या टोपण नावाने रेसिंग वर्तुळात ओळखल्या जाणाऱ्या पेरेझने पदार्पणानंतर चक्क नऊ वर्षांनी २०२० मध्ये बहारीनमधील साखीर ग्रांप्री जिंकली. कारकिर्दीतील तब्बल १९०व्या शर्यतीत प्रथम क्रमांक पेरेझने पटकावला आणि त्याबरोबरच तो आगळ्या पराक्रमाचा धनीही झाला. मार्क वेबर १३०व्या शर्यतीत विजेता बनला होता. दशकभराच्या कारकिर्दीत पेरेझने दहाव्यांदा पोडियम मिळविताना आपली गाडी प्रथम क्रमांकावर नेली. मेक्सिकन ड्रायव्हरने फॉर्म्युला वन शर्यत जिंकण्याची पन्नास वर्षांतील ही दुसरीच घटना ठरली. १९७० साली मेक्सिकोच्या पेद्रो रॉड्रिगेज याने बेल्जियम ग्रांप्री जिंकली होती. २०२० मोसमाच्या मध्यंतरी कोरोनाबाधित झाल्यामुळे पेरेझ ब्रिटिश ग्रांप्रीत भाग घेऊ शकला नाही. कोविड निगेटिव्ह ठरल्यानंतर स्पॅनिश ग्रांप्रीद्वारे त्याने पुनरागमन केले व शर्यतीत पाचवा क्रमांक प्राप्त केला. या ग्रांप्रीपासून त्याच्या गाडीने पुन्हा वेग घेतला. तुर्कस्तानमधील ग्रांप्रीत हॅमिल्टननंतर दुसरा क्रमांक पटकावत पेरेझने छाप पाडली. त्यानंतर हॅमिल्टन नसल्याची संधी साधत साखीर ग्रांप्रीत पहिला क्रमांक पटकावत रेडबुलसाठी आपण योग्य असल्याचे सिद्ध केले. मोसमाअखेरीस चौथा क्रमांक मिळवत फॉर्म्युला वन रेसिंगच्या जागतिक मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीही नोंदविली.

मर्सिडीजला आव्हान देणार?
व्हर्स्तापनचा सहकारी या नात्याने पेरेझ रेडबुल संघात आल्यानंतर हे दोन्ही ड्रायव्हर मर्सिडीजच्या फॉर्म्युला वनमधील वर्चस्वासह शह देऊ शकतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मर्सिडीजची गाडी फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये सध्या अव्वल असून त्यांचे निर्विवाद साम्राज्य आहे. या संघापाशी सात वेळचा जगज्जेता लुईस हॅमिल्टनचे कौशल्य आणि गुणवत्ता आहे. २०२० मध्ये रेडबुल संघाच्या अल्बॉनला विशेष छाप पाडता आली नाही, त्याला सातवा क्रमांक मिळाला. आता पेरेझच्या निवडीमुळे अल्बॉन संघात राखीव ड्रायव्हर ठरला आहे. अल्बॉनला २०२० मोसमात फक्त दोन वेळाच पोडियम मिळाले, त्यामुळे रेडबुल संघाची सारी जबाबदारी व्हर्स्तापनला वाहावी लागली. पेरेझच्या निवडीमुळे रेडबुल संघ जास्त वेगवान  होईल अशी शक्यता खुद्द व्हर्स्तापन यानेच व्यक्त केली आहे. यावरून तो आपला सहकारी अल्बॉन याच्या कामगिरीवर खूष नव्हता हे स्पष्ट आहे. जगज्जेता हॅमिल्टन हा सुद्धा व्हर्स्तापनच्या मताशी सहभागी आहे. पेरेझची रेडबुलने निवड केल्यामुळे पुढील वर्षी फॉर्म्युला वनमधील चुरस जास्त वाढेल, तुल्यबळ आव्हान मिळू शकते असे ब्रिटिश ड्रायव्हरला वाटते.  

संबंधित बातम्या