सर्वोत्तम लेवांडोस्की

किशोर पेटकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

क्रीडांगण

जागतिक फुटबॉलमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांचा दबदबा आहे. दोघेही दिग्गज आणि महान आहेत. स्पेनमध्ये ते प्रतिस्पर्धी असताना त्यांच्यातील डर्बीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधलेले असायचे. मेस्सी अजूनही बार्सिलोना संघातून खेळत आहे. या नावाजलेल्या संघाचे वैभव पूर्वीप्रमाणे नाही, मात्र मेस्सीचा लौकिक कायम आहे. रोनाल्डो स्पेनमधील रेयाल माद्रिदचा निरोप घेऊन इटलीतील युव्हेंट्स संघात दाखल झाला. तोही प्रकाशझोतात असतो. मेस्सी-रोनाल्डो यांच्या वर्चस्वास यंदा शह मिळाला आहे. जर्मनीतील बायर्न म्युनिक संघाकडून खेळणारा पोलंडचा अनुभवी स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोस्की फिफाचा २०२० मधील सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू ठरला. 

हा बहुमान पटकाविताना या ३२ वर्षीय आघाडीपटूने मेस्सी व रोनाल्डो यांना खूपच मागे टाकले. विशेष बाब म्हणजे, कारकिर्दीत लेवांडोस्की प्रथमच जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला. वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्यासाठी जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) चाचणी घेतली. त्यात विविध राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक, कर्णधार, तसेच निवडक पत्रकार व फुटबॉल चाहत्यांचा समावेश होता. वर्षभरातील कामगिरी अभ्यासून दिलेल्या कौलात लेवांडोस्की याला सर्वाधिक ५२ मते मिळाली, रोनाल्डोला ३८ मतांसह दुसऱ्या, तर मेस्सीला ३५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. लेवांडोस्कीस पसंती सर्वाधिक ठरली, जी अपेक्षितच होती. कोविड-१९ महामारीमुळे फिफाचा झुरिच येथील पुरस्कार वितरण सोहळा आभासी पद्धतीने झाला, तरीही लेवांडोस्कीचा बहुमान करण्यासाठी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो खास म्युनिकमध्ये गेले व त्यांनी लेवांडोस्कीस करंडक प्रदान केला. २०१८ साली क्रोएशियाचा स्टार खेळाडू ल्युका मॉड्रिच फिफाचा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू ठरला होता. त्यानंतर लेवांडोस्की हा दुसरा फुटबॉलपटू ठरला, ज्याने रोनाल्डो-मेस्सी यांना मागे टाकले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर, ही भावना अविस्मरणीय असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पोलंडच्या कर्णधाराने दिली. मेस्सी, रोनाल्डो स्पर्धेत असताना आपण सर्वोत्तम ठरलो यावर अजून विश्वास बसत नाही, या पुरस्काराचे महत्त्व जास्तच वाढले आहे, असे लेवांडोस्की म्हणाला.

मोसमात गोलधडाका
कोरोना विषाणू महामारीचे संकट असताना कडक मार्गदर्शक शिष्टाचारास अनुसरून युरोपातील व्यावसायिक फुटबॉलमधील २०१९-२० मोसमाचा उत्तरार्ध रंगला. त्यात लेवांडोस्की आणि त्याचा जर्मन क्लब बायर्न म्युनिकची कामगिरी खूपच उजळली. बायर्न म्युनिकचे हान्सी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीतील आणि आंतरराष्ट्रीय मैदानावर मिळून पाच प्रमुख स्पर्धा जिंकून आगेकूच राखली. त्यात लेवांडोस्कीचा धडाका राहिला. त्याने ५५ गोल नोंदवत अग्रक्रम मिळविला. तीन स्पर्धांत त्याने सर्वाधिक गोल केले. १९९१ पासून फिफातर्फे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सुरू झाला. तेव्हापासून एखाद्या जर्मन क्लबच्या खेळाडूने त्यात बाजी मारण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
सहा फूट उंचीचा लेवांडोस्की हेडिंग गोल नोंदविण्यात तरबेज आहे. अचूक खेळामुळे तो प्रतिस्पर्धी बचावफळीत सातत्याने सतावत असतो. बायर्न म्युनिकने जर्मनीतील स्पर्धांत वर्चस्व राखले, तसेच युरोपियन चँपियन्स लीग करंडकावरही नाव कोरले. या साऱ्या वाटचालीत गोल नोंदविण्यात लेवांडोस्की अग्रभागी राहिला. केवळ क्लब पातळीवरच नव्हे, तर पोलंडकडून खेळतानाही लेवांडोस्की उल्लेखनीय ठरला. युरो करंडक पात्रता फेरीत पोलंडचे नेतृत्व करताना त्याने सातत्य राखले. त्यामुळेच गेल्या ऑक्टोबरमध्ये युरोपातील सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू हा बहुमान त्याला मिळाला.

जर्मनीत कारकीर्द बहरली
पोलंडची राजधानी वॉर्सो येथे जन्मलेल्या रॉबर्टो लेवांडोस्कीची कारकीर्द जर्मनीत बहरली. जर्मनीतील विविध स्पर्धांत त्याने दशकभराच्या कालावधीत अडीचशेहून जास्त गोल नोंदविले आहेत. २००५ साली पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉल मैदानावर खेळण्यास सुरुवात केल्यानंतर २०१० साली तो जर्मनीत दाखल झाला. तेथे चार वर्षे त्याने बोरुसिया डॉर्टमुंड संघाचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्याला युर्गेन क्लोप यांचे प्रगल्भ मार्गदर्शन लाभले. तो संघात असताना डॉर्टमुंड संघ २०१०-११ व २०११-१२ मध्ये बुंडेस्लिगात विजेता, तर २०१२-१३ मोसमात चँपियन्स लीगमध्ये  
उपविजेता ठरला. योगायोगाची बाब म्हणजे, यंदा लेवांडोस्की फिफाचा सर्वोत्तम पुरुष फुटबॉल ठरलेला असताना त्याचा माजी प्रशिक्षक युर्गेन क्लोप सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक ठरले. लिव्हरपूलच्या इंग्लिश प्रीमियर लीगमधील यशस्वी कामगिरीमुळे क्लोप बहुमानास पात्र ठरले, असो... लेवांडोस्की २०१४ साली बायर्न म्युनिक संघात रुजू झाला. तेव्हापासून त्याने वैयक्तिक पातळीवर आणखी चढता आलेख अनुभवला. लेवांडोस्कीने म्युनिकमधील मातब्बर संघाचे प्रतिनिधित्व करताना सहा वेळा बुंडेस्लिगा विजेतेपदाचे पदक प्राप्त केले आहे. जर्मन कपमध्ये तीन वेळा आणि सुपर कपमध्ये चार वेळा बाजी मारली. यंदा त्यात युरोपियन चँपियन्स लीग आणि सुपर कपचीही भर पडली.

संबंधित बातम्या