काश्मिरी फुटबॉल संघाचे यश

किशोर पेटकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

क्रीडांगण

तब्बल १२३ वर्षांचा इतिहास असलेली आयएफए शिल्ड ही स्पर्धा ड्युरँड कपनंतर देशातील सर्वांत जुनी आणि ऐतिहासिक आहे. जैवसुरक्षा वातावरणात कोलकात्यात झालेल्या या स्पर्धेत एका काश्मिरी संघाने बाजी मारली. भारतीय स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये अवघ्या चार वर्षांचा इतिहास असलेल्या रियल काश्मीर एफसीने आयएफए शिल्डवर नाव कोरले.

रियल काश्मीरसह मोहमेडन स्पोर्टिंग, गोकुळम केरळा, इंडियन एरोज या चार आय-लीग संघांसह कोलकात्यातील प्रीमियर लीगमधील आठ संघांत विजेतेपदासाठी चढाओढ दिसली. रियल काश्मीरने अपराजित घोडदौड राखताना स्थानिक जॉर्ज टेलेग्राफ संघाला २-१ फरकाने हरवून फुटबॉल कारकिर्दीतील पहिलाच करंडक जिंकला. रियल काश्मीर एफसीचे यश स्पृहणीय ठरले. संदीप चट्टू आणि शमिम मेहराज यांच्या पुढाकारामुळे रियल काश्मीर संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

सुनियोजित रूपरेषा आणि ध्येयनिष्ठा या बळावर श्रीनगरच्या या क्लबने काश्मीरमधील प्रतिकुल परिस्थितींचा अडथळा पार करत प्रगतीचा ध्यास घेतला आणि त्यात यश मिळत आहे हे त्यांच्या आयएफए शिल्ड स्पर्धेतील कामगिरीने सिद्ध झालेले आहे. आता चट्टू यांच्यापाशीच क्लबची मालकी आहे. त्यांचा दृष्टिकोन पूर्णतः व्यावसायिक आहे हे आय-लीग स्पर्धेतील संघाच्या सातत्यावरून दिसून येते. रियल काश्मीरने केवळ क्लब पातळीवरच नव्हे, तर जम्मू-काश्मीरमधील ग्रासरुट फुटबॉलमध्येही भरीव योगदान दिले आहे. त्यामुळेच २०१८-१९ मध्ये उत्कृष्ट ग्रासरुट विकास कार्यक्रमासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जम्मू काश्मीरला गौरविले. काश्मिरी युवकांची फुटबॉल गुणवत्ता प्रकाशमान करण्याचे काम रियल काश्मीर क्लबने केले आहे. काश्मीरमध्ये फुटबॉल गुणवत्ता आहे, पण योग्य व्यासपीठ नव्हते. अब्दुल माजीद काकरू, मेहराजुद्दीन वाडू, इश्फाक अहमद आदी मोजक्या काश्मिरी फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला आहे. रियल काश्मीर संघाच्या माध्यमातून आता तेथील फुटबॉलपटूंना व्यापक संधी मिळू लागली आहे. या संघामुळे दानिश फारूख, फरहान गनी हे गुणवान फुटबॉलपटू भारतीय मैदानावर लक्ष वेधताना दिसताहेत. रियल काश्मीर संघाने २०१७-१८ मोसमातील आय-लीग स्पर्धेतील द्वितीय श्रेणीत सफल कामगिरी बजावली, त्यामुळे मुख्य आय-लीगसाठी पात्रता मिळाली. आय-लीग स्पर्धेत खेळणारा पहिला काश्मिरी संघ हा मान त्यांना प्राप्त झाला. यंदाच्या मोसमात रियल काश्मीर संघ विजेतेपदासाठी स्पर्धक असेल. या संघाचा धडाका कायम राहिल्यास इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळणारा पहिला काश्मिरी संघ हा मानही त्यांना मिळू शकतो, कारण २०२२-२३ मध्ये आय-लीग स्पर्धा जिंकणाऱ्या संघास आयएसएलसाठी थेट पात्रता देण्याचे नियोजन आहे. तसे झाल्यास काश्मिरी फुटबॉलमध्ये मोठी क्रांती होईल.

स्कॉटलंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेव्हिड रॉबर्टसन सलग पाचव्या मोसमात रियल काश्मीरचे मार्गदर्शक आहेत. रॉबर्टसन दीर्घानुभवी आणि प्रगल्भ आहेत. यंदाची आय-लीग स्पर्धा ११ संघांची असून जैवसुरक्षा वातावरणात नऊ जानेवारीपासून पश्चिम बंगालमधील कोलकाता व कल्याणी येथे खेळली जाईल.

संबंधित बातम्या