बार्सिलोनाचा विक्रमी मेस्सी!

किशोर पेटकर
सोमवार, 11 जानेवारी 2021

क्रीडांगण

व्यावसायिक फुटबॉलमध्ये प्रदीर्घ कालावधीसाठी एकाच क्लबचे प्रतिनिधित्व करत यशोशिखरावर विराजमान होणारे मोजकेच फुटबॉलपटू आहेत. सध्याच्या काळात खेळाडू क्वचितच एकाच क्लबबरोबर बांधील राहतात. मात्र अर्जेंटिनाचा सुपरस्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याने बार्सिलोना क्लबला कारकीर्द समर्पित केली आहे. स्पेनमधील या कटालन क्लबतर्फे मैदाने गाजवत ३३ वर्षीय आघाडीपटूने फार मोठी कीर्ती संपादन केली आहे. 

जादूई पायांच्या मेस्सीने मैदानावर थक्क करणारा खेळ केलेला आहे. प्रेक्षणीय आणि अचाट कौशल्य प्रदर्शित करताना प्रेक्षणीय गोलची मालिकाच गुंफलेली आहे. अफलातून ड्रिबलिंग, चेंडूवरील जबरदस्त हुकमत, बचावफळीस गुंगारा देताना गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोल करण्याची अद्वितीय शैली यामुळे मेस्सी जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. या जगविख्यात फुटबॉलपटूने नुकताच ऐतिहासिक पल्ला गाठताना विश्वविक्रमास गवसणी घातली. कारकिर्दीत एकाच क्लबतर्फे खेळताना सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम आता मेस्सीच्या नावे नोंदला गेला आहे. हा मोठा टप्पा गाठताना त्याने आणखी एका महान फुटबॉलपटूला मागे टाकले. ब्राझीलचे सर्वकालीन ग्रेट पेले यांनी सांतोस क्लबतर्फे खेळताना ६५९ सामन्यांत ६४३ गोल केले होते, आता मेस्सीने बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्व करताना पेले यांना मागे टाकले. ला-लिगा स्पर्धेत व्हाल्लादोलिड संघाविरुद्ध मेस्सीने चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली, अर्जेंटिनातील रोझारियो येथे जन्मलेल्या खेळाडूचा हा बार्सिलोना क्लबच्या जर्सीतील ६४४वा गोल ठरला. त्यासाठी तो सर्व स्पर्धांत मिळून ७४९ सामने खेळला. विश्वविक्रमानंतर पेले यांनीही खुल्या दिलाने मेस्सीचे कौतुक करताना नव्या विक्रमवीराची पाठ थोपटली.

मेस्सी द ग्रेट!
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण या प्रश्नाचे उत्तर शोधताना मेस्सी आणि रोनाल्डो यांची अवश्य तुलना होते, त्याचवेळी ते दोघेही श्रेष्ठ आहेत ही बाबही ध्यानात घ्यायला हवी. २००४ पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये फक्त एकाच क्लबचे प्रतिनिधित्व करताना मेस्सीने विक्रमाच्या यशोशिखरावर झेंडा रोवला आहे. बार्सिलोना क्लबतर्फे त्याचा यंदा सतरावा मोसम आहे. पेले ब्राझीलमधील सांतोस क्लबकडून १९७४ पर्यंत अठरा मोसम खेळले. पेले यांच्यामुळे सांतोस क्लबलाही जगमान्यता मिळाली, आता मेस्सीमुळे बार्सिलोनाचीही ओळख आहे. मेस्सीच्या असाधारण खेळामुळे बार्सिलोनाला कितीतरी करंडक जिंकणे शक्य झाले. बार्सिलोना क्लबमुळे मेस्सीला दैवी गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ लाभले, खेळाडू आणि क्लबचे ऋणानुबंध अवर्णनीय आहेत.

कटुता आणि बार्सिलोनाशीच सख्य
जेव्हा मेस्सीला आर्थिक गरज होती, तेव्हा बार्सिलोना क्लबनेच त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळेच त्याच्या शारीरिक दुखण्यावर महागडे उपचार शक्य झाले. मेस्सी आणि बार्सिलोना यांचे नाते अतूट आहे. त्यामुळेच या वर्षी बार्सिलोना क्लब सोडण्याची स्थिती उद्‍भवली तेव्हा मेस्सी भावनिक झाला, त्याला गहिवरून आले. युवा कारकिर्दीपासून साथ दिलेल्या क्लबविरोधात न्यायालयात झगडण्याऐवजी आणखी काही काळ याच क्लबचे प्रतिनिधित्व करावे या उद्देशाने मेस्सीने बार्सिलोनाकडूनच खेळण्याचा निश्चय केला आणि जगभरातील प्रसिद्धी माध्यमांचा सनसनाटी मथळा हुकला. बार्सिलोना क्लबला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी मेस्सीला मोठा आर्थिक अडथळा पार करणे आवश्यक होते, करारच किचकट होता. अखेरीस तोडगा निघाला; क्लबच्या माजी अध्यक्षांवर खापर फुटले आणि मेस्सी कँप नोऊवरच राहणार हे अधोरेखित झाले.
मेस्सी आणि बार्सिलोना दोघेही एकमेकांचे ऋणी आहेत. अर्जेंटिनातील न्यूएल्स ओल्ड बॉइज क्लबकडून युवा पातळीवर  खेळत असताना मेस्सीने फुटबॉल जगतास प्रभावित करण्यास सुरवात केली, त्याच दरम्यान त्याला आजार जडला. आर्थिक चणचणीमुळे न्यूएल्स ओल्ड बॉइज क्लब व्यवस्थापन त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्यास असमर्थ ठरले. लिओनेलचे वडील जोर्जे नव्या सहस्रकाच्या सुरुवातीस सहकुटुंब स्पेनमधील बार्सिलोनात दाखल झाले. बार्सिलोना क्लबला वीस वर्षांपूर्वी युवा लिओनेलच्या अलौकिक गुणवत्तेने प्रभावित केले. सुरुवातीचे काही अडथळे पार करावे लागले, तीन वर्षांच्या कालावधीनंतर २००४ मध्ये मेस्सी बार्सिलोनाच्या मुख्य संघाच्या जर्सीत मैदानावर उतरला आणि एक अजरामर फुटबॉल आख्यायिका जन्मास आली. मेस्सीची गुणवत्ता सुसाट ठरली. गोल रतीब सुरू झाला. विक्रमांची माळ गुंफत गेली. सर्वोत्तम कामगिरीचे करंडक, पुरस्कार यामुळे मेस्सीची कारकीर्द उजळून गेली.

संबंधित बातम्या