आश्वासक शुभमन

किशोर पेटकर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

क्रीडांगण

ऑस्ट्रेलियाच्या तेजतर्रार वेगवान गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करत शुभमन गिल याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीची आश्वासक सुरुवात केली. ॲडलेड येथील पहिल्या कसोटीत पंजाबच्या या एकवीस वर्षीय फलंदाजास संधी मिळाली नाही, भारतीय संघाची दुसऱ्या डावात दाणादाण उडाली... सर्व बाद ३६. मात्र नंतर जोरदार उसळी घेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने मालिका २-१ फरकाने जिंकण्याचा पराक्रम साधला, त्यात सलामीच्या शुभमनचा वाटाही मौल्यवान ठरला. 

पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शुभमनला मेलबर्नला कसोटी कॅप मिळाली. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात शुभमनचे पहिलेवहिले शतक नऊ धावांनी हुकले, पण त्याच्या खेळीमुळे रचलेल्या पायावरच नंतर रिषभ पंतला ऐतिहासिक विजयाचा कळस रचता आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटीत ५१.८०च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह २५९ धावा करणाऱ्या शुभमनने आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे संकेत दिले आहेत. फलंदाजीत सातत्य राखल्यास त्याला भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ नाव कमावता येईल. एकंदरीत, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांचा सलामीस खंबीरपणे सामना केलेल्या शुभमनने सकारात्मक दृष्टिकोनासह अपेक्षा उंचावल्या आहेत.

क्रिकेटसाठी वडिलांनी गाव सोडले
पंजाबमधील फाझिल्का जिल्ह्यातील चक खेरावाला हे शुभमनचे मूळ गाव. त्याचे वडील लखविंदरही क्रिकेटपटू होते. गावात सुविधा नव्हत्या, त्यामुळे लखविंदर यांचे क्रिकेट बहरू शकले नाही, पण मुलाला दर्जेदार क्रिकेटपटू करण्याची जिद्द त्यांनी बाळगली. क्रिकेटच्या अद्ययावत सुविधा असलेले चंदीगडनजीकचे मोहाली त्यांच्या गावापासून सुमारे तीनशे किलोमीटर दूर. लखविंदर यांनी कुटुंबासह गावाला रामराम केला आणि मोहालीत दाखल झाले. तेथे शुभमनच्या नैसर्गिक क्रिकेट गुणवत्तेस धुमारे फुटले. वडील लखविंदर हेच शुभमनवचे पहिले गुरू. नऊ-दहा वर्षांचा असल्यामुळे वडिलांनी मुलाला आखूड टप्प्यांच्या गोलंदाजीचा सराव दिला. शुभमनला कणखर फलंदाज करण्यावर लखविंदर यांनी भर दिला. 

द्रविड यांचे मार्गदर्शन मोलाचे
भारताचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांच्या आदर्शवत आणि स्फूर्तिदायक मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेटमध्ये एक पिढी तयार झाली आहे, त्यात शुभमनचाही समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले. त्यावेळी शुभमनने धावांचा रतीब टाकत यशात महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. स्पर्धावीर किताब पटकाविताना त्याने ३७२ धावा केल्या, त्यात पाकिस्तानविरुद्ध उपांत्य लढतीत झळकाविलेल्या नाबाद शतकाचा (१०२) समावेश होता. तेव्हा या संघाचे प्रशिक्षक असलेल्या द्रविड यांचा कानमंत्र शुभमनसाठी प्रेरणादायी ठरला. ‘चेंडू हवेतून मारायचा नाही, मैदानी फटक्यांवर भर द्यायचा,’ या द्रविड यांच्या सल्ल्याला दिशादर्शक मानत शुभमनने वाटचाल राखली, त्याचे गोड फळ त्याला चाखायला मिळाले आहे.

संबंधित बातम्या